आता आघाडीच्या वाटपाचा घोळ

aagahdi
आता महाराष्ट्रातली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे कारण या दोघांत जागा वाटपाचा वाद रंगायला लागला आहे. आघाडी तुटते की काय वाटावे इतके ताण निर्माण होत आहेत. जागावाटपाच्या या गुंत्यात अपक्षांच्या जागा आणि तसेच मुख्यमंत्रीपदाची विभागणी करण्याचा आग्रह यांची भर पडली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे त्रांगडे संपले आहे. त्यामुळे तिकडचे लक्ष आता आघाडीकडे वळले आहे. युतीचे त्रांगडे संपले पण अजून महायुतीचे त्रांगडे संपायचे आहे. तेही संपेल कारण ज्यांच्यामुळे युतीला महायुतीचे रूप आले होते ते छोटे छोटे पक्ष जागांसाठी अडून बसलेले नाहीत. भाजपा आणि शिवसेना यांनी युती लवकरात लवकर तयार करावी, चर्चेचे गुर्‍हाळ फार लांबवून आपली शोभा करून घेऊ नये उलट जमल्यास आमच्या जागा घ्याव्यात पण चर्चेचा घोळ लवकर संपवावा असा या छोट्या पक्षांचाच तगादा होता. म्हणजे त्यांच्यामुळे काही अडचणी येणार नाहीत. युती नक्की होणार असे ठरले आहे म्हणजे महायुतीही नक्कीच होणार हे ठरलेले आहे.

तिकडचा प्रश्‍न संपला आता इकडचा म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीा प्रश्‍न शिल्लक आहे. आजवर या आघाडीतल्या घोळाबाबत लोकांचा असा अंदाज होता की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद उगाच वाढवला जात आहे. मुळात तो तसा नाही. पण युतीचे त्रांगडे सुटले की आघाडीचा गुंताही आपोआप सुटेल. म्हणूनच लोकांना असे वाटत होते की, एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचा निकाल लागला आणि ती होणार हे स्पष्ट झाले की मग कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले लटके, खोटे भांडण आपोआप मिटेल . भाजपा-सेना युतीचा झगडा पक्ष पंधरवडा होताच मिटला आहे. तसा आघाडीला हा मुहूर्त मान्य नाही की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे कारण आघाडीतले गुर्‍हाळ अजून जारी आहे. गुर्‍हाळातले पक्ष वेगळे असले तरीही मागण्या सामान्यत: त्याच आहेत आणि मागणीचा आग्रहही तसाच लटका आहे. कोणत्याही क्षणी आघाडी मोडली तरी हरकत नाही, एकट्याने २८८ जागा लढवण्यास तयार आहे अशा वल्गनाही केल्या जात आहेत आणि परस्परांना धमक्या देणे सुरू आहे. सर्वच्या सर्व २८८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करून त्या सर्व जागा लढवण्यास तयार असल्याचा देखावा करून एकमेकांना भेडसावण्याचे नाटकही सुरू आहे. दोघांचेही हे नाटकच आहे हेही दोघांना माहीत आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात कितीही हातापायी झाली असली तरीही शेवटी युती होणार हे जसे सर्वांना माहीत होते तसेच या दोन पक्षांची आघाडी होणार हे सर्वांना चांगलेच माहीत आहे.

आघाडी आणि युतीतल्या भांडणात काही फरक आहेत. युतीतले भांडण जागावाटपाचे होते. निदान तसे दाखवले तरी जात होते. मुळात तिथेही मुख्यमंत्रिपदाचा वाद होताच पण तो तसा जाहीरपणे दाखवला गेला नाही. आघाडीत मात्र निव्वळ जागांचे वाद नाहीत. राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी आहेच पण आता त्यात काही नव्या मागणीची भर पडली आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडालाच काही अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खरे तर यातले बहुसंख्य आमदार मुळात राष्ट्रवादीचे आहेत. पण पक्षात रुसून बाहेर पडून अपक्ष झालेले आहेत. किंवा ते ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्या जागा आघाडीतल्या वाटपात कॉंग्रेसच्या वाट्याला आले होते आणि या अपक्ष आमदारांनी तिथून बंडखोरी करून अपक्ष म्हणून जिंकली आहे. हे आमदार आता राष्ट्रवादीत आले असले तरीही त्यांचे ते मतदारसंघ २००९ सालच्या निवडणुकीत आघाडीतल्या जागावाटपात कॉंग्रेसच्या वाट्याला गेले होते. तेव्हा ते मतदारसंघ आताही कॉंग्रेसच्याच वाट्याला येणार आहेत.

कारण मागच्या वेळी तिथे कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरीही तिथे राष्ट्रवादी कॉंगे्रेस नाहीच आणि पराभूत झाला असला तरी कॉंग्रेसचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होता. या नात्याने आता हे मतदारसंघ कॉंग्रेसलाच लढवायला मिळणार आहेत. पण राष्ट्रवादीने नवा पेच निर्माण केला आहे. साधारणत: ज्या मतदारसंघात निवडून आलेला आमदार असतो तो मतदारसंघ त्या पक्षाला दिला जात असतो. आता या अपक्षांबाबत राष्ट्रवादीने सिटिंग आमदार आपले असल्याचा दावा करून हेही मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी मागणी केली आहे. आता तिथे सिटिंग आमदार आहेत पण ते काही राष्ट्रवादीचे म्हणून निवडून आलेले नाहीत मग तिथे राष्ट्रवादीला तिकीट देण्याचे काही कारण नाही. कॉंगे्रसने तसे म्हटलेही आहे. पण राष्ट्रवादीचे नेते, निवडून येण्याची शक्यता म्हणून आपल्या या आमदारांना उमेदवारी द्यावी आणि हे मतदारसंघ आपल्यालाच द्यावेत असा आग्रह धरत आहेत. कॉंग्रेस पक्षाने फार वाद न घालता राष्ट्रवादी कॉंग्रेसला फार तर १० जागा वाढवून देऊ म्हणजे १२४ जागा देऊ अशी तयारी दाखवली आहे. यावर राष्ट्रवादीचे समाधान नाही. त्यांना हे मतदारसंघ तर हवे आहेतच पण तरीही कॉंग्रेसच्या बरोबरीने १४४ जागा हव्या आहेत. शिवाय एवढ्यावरही समाधान नाही. राज्यात बहुमत झाल्यास आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि कॉंग्रेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी वाटणी व्हावी अशीही राष्ट्रवादीची मागणी आहे.

Leave a Comment