सारदा घोटाळ्याचे राजकीय रंग

saradha
आपल्या देशात एखादा घोटाळा उघड झाला म्हणजे असा काही होतो आणि त्याचे इतके पैलू समोर यायला लागतात की एवढा मोठा घोटाळा आजवर कधी झालाच नव्हता असे दिसायला लागते. मग तो ऐतिहासिक आणि सर्वात मोठा घोटाळा ठरतो. प. बंगालातील सारदा घोटाळा हाही असाच मोठा घोटाळा ठरला आहे. तो केवळ प. बंगालातला असेल असे वाटले होते पण आता असे लक्षात आले आहे की, या घोटाळ्याची व्याप्ती ओरिसा आणि आसाम याही राज्यांपर्यंत आहे. राजकीय वरदहस्त असल्याखेरीज एवढा मोठा घोटाळा अव्याहतपणे चालत नाही. म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती भौगोलिकही आहे आणि राजकीयही आहे. म्हणूनच रोज एका नव्या नेत्याचे नाव या घोटाळ्यात समोर येत आहे. माजी रेल्वे मंत्री कॉंग्रेसचे नेते एबीए घनीखान चौधरी यांची या प्रकरणात तीन तास चौकशी करण्यात आली होतीच. पण काल त्यांचे बंधु खासदार अबु चौधरी यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यावर पाचारण केले होते. ते काही या प्रकरणात आरोपी नाहीत पण त्यांनी नकळतपणे काही गोष्टी उघड केल्या आहेत. या चिटफंडाचे प्रकरण २०१३ साली थांबले. त्यापूर्वी त्याने बरेच पैसे गोळा केले होते. हा चिटफंड बुडेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण खासदार अबु चौधरी यांनी हा निधी बुडण्याच्या आधीच पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून अशा कंपन्यांना परवानगी कशी मिळते असा सवाल केला होता.

त्यांनी नंतर तीन महिन्यांनी आपले हे पत्र मागे घेतले. पण या पत्रातलला अशा कंपन्यांना हा उल्लेख या कंपनीबद्दल होता आणि ही कंपनी बुडणार आहे हे त्यांना आधीच कसे कळले असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. काल त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले पण, कॉंग्रेस पक्षाचा खासदार या प्रकरणात कसा काय संबंधित होता याची चौकशी पोलिसांना करायची आहे. माजी केन्द्रीय अर्थमंत्री आणि कॉंगे्रसचे नेते पी, चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना सारदा चिटफंडातून एक कोटी रुपये देण्यात आले होते. त्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात पण त्यांना या चिटफंडातून हा पैसा देण्याचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या संबंधात त्यांचीही चौकशी करण्यात येत आहेेे. सारदा चिटफंड हे प्रकरण फार मोठे आहे. सुमारे दोनशे छोट्या मोठ्या कंपन्यांचा हा भांडवल जमा करणारा हा उद्योग होता. समाजातल्या गरीब आणि श्रमिक लोकांकडून त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे पैसा जमा केला होता आणि त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्याकडे २०० अब्जापेक्षाही अधिकी रुपये जमा होते असे कळते. एके दिवशी त्यांनी दिवाळे जाहीर केले.

या प्रकरणात आजवर अटक करण्यात आलेल्या आणि ज्यांच्या घरांच्या झडत्या घेतल्या गेल्या त्यांच्या नावांची यादी पाहिली तर तिच्यात अनेक नामवंत लोक असल्याचे दिसते. म्हणजे या प्रकरणाचा लाभ अनेक मान्यवरांनी घेतला आहे आणि कंपनी बुडवणारांत अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. आसामचे सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक शंकर बरुआ यांनीही गेल्या आठवड्यात आपल्या निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. देशातली ही अलीकडच्या काळातली पोलीस अधिकार्‍याची तिसरी आत्महत्या आहे. मात्र ही आत्महत्या भ्रष्टाचाराचा आळ आल्यामुळे बदनामीला घाबरून झाली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात गेल्या वर्षभरात हळूहळू करीत एकेका उच्चपदस्थ व्यक्तीचे नाव समोर यायला लागले आहे आणि त्याच क्रमाने काही जणांना अटक झाली आहे. काही जणांच्या अटकेची तयारी सुरू आहे. काही लोकांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केलेली आहे तर काही लोकांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आजवर कॉंग्रेसचे नेते आणि आसामचे आरोग्य मंत्री हिमंत बिस्व शर्मा आणि कॉंग्रेसचे आमदार अंजान दत्ता, मनोरंजन सिन्हा आणि आसाममधील लोकप्रिय गायक सदानंद गोगोई यांच्या घरांवर धाडी पडलेल्या आहेत.

त्यांच्याच सोबत २८ ऑगस्टला बारुआ यांच्या घरावरही धाड पडली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालकीच्या काही फॉर्म हाऊसवर सुद्धा धाडी टाकण्यात आल्या होत्या. शंकर बारुआ यांचा या चिटफंड घोटाळ्यांशी नेमका संबंध काय आहे हे नक्की कळलेले नाही, मात्र या प्रकरणात आजपर्यंत ४८ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून ही कारवाई सुरू आहे. या चिटफंड घोटाळ्याचा मुख्य आरोप सुदिप्त सेन याने त्याचा तपास सुरू असताना शंकर बारुआ यांचे नाव सांगितले. एक पोलीस अधिकारी म्हणून शंकर बारुआ यांचे आपल्याला संरक्षण होते आणि त्या बदल्यात आपण त्यांना नियमितपणे काही पैसे देत होतो असे सुदिप्त सेन याने सांगितले. त्यावरून सीबीआयने शंकर बारुआ यांना आरोपी केले आणि त्यांच्या बँक लॉकर्सचा तपास केला तेव्हा त्यांना बरीच बेहिशोबी संपत्ती सापडली. सारदा सारख्या अनेक कंपन्या बंगालमध्ये जारी होत्या आणि त्यांनी हजारो कोटी रुपये जमा केले होते पण राज्यातल्या काही तागाच्या गिरण्या एकदम बंद पडल्याने अशा कंपन्यांना टाळे ठोकावे लागले. अन्यथा अनेकदा अशा अनेक कंपन्या सतत काम करीत असतात. त्या सर्वांतच असे घोटाळे होतात असे काही नाही पण त्यातला एक जण जरी बुडला तरीही त्यामुळे हजारो लोकांचे जीवन बरबाद होत असते. अनेकांना आपल्या जन्माची कमायी मातीत गेल्याचे बघायला लागते. ते पैसे परत मिळवण्यातच नंतर त्यांची सारी जिंदगी वाया जाते.

Leave a Comment