चवली कमावली, पावली गमावली

vidhan-sabha
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये समाजवादी आणि डाव्या चळवळीतले महाराष्ट्रातले नेते निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या जागांवरून नेहमी संघर्ष करत असत. जसा आज भाजपा आणि शिवसेनेत चालला आहे. तेव्हा आचार्य अत्रे त्या संघर्षातला फोलपणा दाखविण्यासाठी एक म्हण वापरत असत, ‘चवली (चार आणे) च्या भांडणापायी पावली (आठ आणे) गमावणे.’ आचार्य अत्रे यांचे ते म्हणणे भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी खरे करून दाखवले आहे. या दोन पक्षांचे भांडण नेमके सहा किंवा सात जागांसाठी आहे परंतु त्यापायी अहंकाराने बोलून दोघांनीही सत्तेची संधी गमावलेली आहे. या दोघातले भांडण नेमके आहे तरी किती जागांचे? याचा हिशोब केला तर ते जेमतेम पाच-सहा जागांचे किंवा फार तर दहा जागांचे आहे. परंतु या छोट्या स्वार्थापायी या दोन्ही पक्षांनी अविचाराने वागून या दहाही जागा दोघांनाही न मिळता कॉंग्रेसलाच मिळतील अशी व्यवस्था केली आहे. या दोघांनीही समजुतीचे धोरण स्वीकारले असते आणि भाजपा काय किंंवा शिवसेनेला काय शेवटी जागा आपल्यालाच मिळणार आहेत असा विचार केला असता तर पायावर धोंडा पाडून घेण्याची ही वेळ आली नसती.

या दोन्ही पक्षांमध्ये परिपक्वतेचा पूर्ण अभाव दिसून आला. शिवसेनेत तर सतरा दीड शहाणे सल्लागार आहेत आणि एक अर्धवट शहाणा नेता आहे. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा जागा वाटप आणि महायुती करण्याविषयीचे डावपेच नीट लढवता आले नाहीत. परिणामी आता २५ वर्षांची युती मोडीत काढून दोन्ही पक्षांची स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. या दोघांचेही नेमके काय चुकले, याचा एकदा नीट बारकाईने विचार झाला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या हीच एक मोठी चूक झाली. या १८ जागांचे विश्‍लेषण शिवसेनेला नीट करता आले नाही. तामिळनाडूत जयललिता, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि ओरिसामध्ये नवीन पटनायक या तीन नेत्यांनी मोदींची डाळ शिजू दिली नाही आणि आपला करिश्मा दाखवला. तसा महाराष्ट्रामध्ये मोदींचा करिश्मा भाजपाला उपयोगी पडला आहे आणि आपल्याला मिळालेल्या १८ जागा या आपल्याच म्हणजे शिवसेनेच्याच आहेत. त्या १८ जागांसाठी मोदी लाटेचा उपयोग झालेला नाही असे उद्धव ठाकरे यांचे विश्‍लेषण आहे. म्हणून त्यांनी मुख्यमंत्री आपणच झाले पाहिजे असे मनावर घेतले आणि त्या भ्रमाखाली पुढच्या वाटाघाटी झाल्या आहेत आणि पुढची सगळी वक्तव्ये, हालचाली या भ्रमापोेटीच होत गेल्या आहेत.

अन्यथा दर निवडणुकांत भारतीय जनता पार्टी शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळवत असतानाही शिवसेनेने भाजपाला दुय्यम वागणूक दिली पाहिजे असा वेडा विचार उद्धव ठाकरे यांनी केलाच नसता. आपण या आघाडीमध्ये ज्येष्ठ आहोत आणि भाजपा कनिष्ठ आहे हे दाखविण्याची उद्धव ठाकरे यांनी एवढी पराकाष्टा केली की, त्यापोेटी आपण काय कमावत आहोत आणि काय गमावत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. जयललिता, ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्याशी उद्धव ठाकरे यांची तुलना करावी असा उद्धव ठाकरे यांनी गेल्या पंधरा वर्षात काही केलेले नाही. एवढे असूनही भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना जास्त किंमत द्यायला गेले आणि त्यांच्याकडे जागा ‘मागायला’ लागले. हे जागा वाटप म्हणजे वाटप न होता शिवसेनेने भाजपाला जागा देणे होत गेले. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा हा मुद्दा लावून धरला ही गोष्ट चांगलीच झाली. परंतु त्याच्यामागचे डावपेच हे युतीच्याच फायद्याचे आहेत हे पटवून देणे त्यांना शक्य झाले नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या मेंदूत तो ५९ जागांचा हिशोब काही शिरता शिरेना.

त्यामुळे आणि त्याच्या संबंधात मुद्याला धरून दोघात चर्चाच झाली नाही. त्यामुळे फिसकटत गेले आणि या संबंधातल्या ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चांमध्ये भाजपाने मुद्दा तर उद्धव ठाकरे यांनी अहंकार पणाला लावायला सुरुवात केली. मग पुढे पुढे तर हा सारा विषय डावपेचांचा न होता अहंकाराचाच होत गेला. आधीच तर उद्धव ठाकरे यांचा अहंकार चुकीचा आणि त्यात तेल ओतणारे जास्त. त्यामुळे त्या अहंकाराचा भडका वाढतच गेला आणि त्यात युतीचा बळी गेला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकाराला आळा घातला असता तर काही तरी चांगले घडले असते. प्रमोद महाजन हयात असताना अशा वाटाघाटींच्यावेळी फार नेमका आणि मार्मिक मुद्दा उपस्थित करत असत. भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेवर चिडलेले असत. पाच-सहा जागांचा मुद्दा पणाला लागलेला असे. या जागा शिवसेना आपल्याला देत नाही, त्यामुळे युती मोडावी अशी मागणी कोणी तरी करत असे. त्यावेळी प्रमोद महाजन म्हणत, ‘या सहा जागांसाठी युती मोडली तर त्या सहाही जागा आपल्याला लढवायला मिळतील, कदाचित जिंकायलाही मिळतील. परंतु युती मोडल्यामुळे आपल्याला किती जागांवर पाणी सोडावे लागेल याचा विचार तुम्ही केला आहे का?’ आता सुद्धा भाजपाने त्या ५९ जागांतल्या १०-१२ जागा पदरात पाडून घेण्याचा विचार केलाही असेल, परंतु त्या १०-१२ जागांसाठी त्यांनी आणि शिवसेनेने मिळून युती मोडून कमीत कमी ५० जागांवर पाणी सोडलेले आहे.

Leave a Comment