राष्ट्रवादी काँग्रेसला १२४ जागा अमान्य- प्रफुल्ल पटेल

praful-patel
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने देऊ केलेल्या १२४ जागांचा प्रस्ताव मान्य नाही. आम्ही १४४ जागांची मागणी केली आहे पण काँग्रेसने यावर प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्याने उद्या दिवसभरात जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या अन्यथा सोमवारी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला इशारा दिला.

पटेल यांनी मुंबईत आज सायंकाळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा आहे पण बदलत्या राजकीय परिस्थितीवरून आता आम्हाला जास्त जागा द्यायला हव्यात अशी भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस पक्षाला नेहमीच राष्ट्रवादीने साथ दिली आहे. आमची मागील १५ वर्षापासून आघाडी आहे. केंद्रात-राज्यात आम्ही काँग्रेससोबत मनापासून काम केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभागणी होऊ नये यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी एक पाऊल मागे घेत प्रसंगी तडजोडी केल्या. २००४ साली आम्ही १२४ जागा लढवल्या. त्यावेळी पक्षाने ७१ जागा जिंकल्या होत्या तर, काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या आग्रहास्तव आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे बदलत्या परिस्थितीवरून दोन्ही पक्षांची पावले पडायला हवीत.

Leave a Comment