जिनपिंग भेटीचे फलित काय?

modi
चिनच्या अध्यक्षांच्या भारत दौर्‍यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे समझोते होण्याचा दिवस काल पार पडला. आता राहिलेला एक दिवस काही अनौपचारिक कार्यक्रमांनी आणि संयुक्त पत्रकार परिषदेने संपेल. १९६० साली हिंदी चिनी भाई भाई म्हणत नेहरुंनी चीनशी मैत्री करार केला आणि दोन-तीन वर्षातच चीनने भारतावर आक्रमण केले. ही गोष्ट आपल्या मनातून अजून जात नाही. चीन हा देश हिंदी -चिनी भाई भाई म्हणत पाठीत खंजीर खुपसत असतो असा आपला कायमचा समज आहे. चीनकडून दोन देशांच्या सीमेवर सातत्याने छोटे छोटे हल्ले होत असतात. त्यामुळे चीनच्या कुटिलतेविषयी आपल्या मनातले शल्य कायमच होत असते. आताही चीनचे अध्यक्ष भारताच्या दौर्‍यावर आहेत. त्यांचा दौरा सुरू होण्याच्या आधी दोन दिवस आणि दौरा सुरू असताना दोन दिवस दररोज चिनी सैन्याच्या हल्ल्यांच्या बातम्या येतच आहेत. अशा परिस्थिततही आपले पंतप्रधान त्यांच्याशी हस्तांदोलन करीत आहेत. त्यांच्याशी करार करत आहेत. आपल्या परराष्ट्र नीतीत चीन हा सर्वात मोठा विषय आहे कारण आशिया खंडात आपलेही वर्चस्व वाढत आहे आणि चीनलाही या खंडात आपला दरारा निर्माण करायचा आहे. आपले संबंध वाढवण्याचे प्रयत्न होत असले तरीही त्या निमित्ताने होणार्‍या प्रत्येक चर्चेला आणि उपक्रमाला चीनशी असलेल्या स्पर्धेचा संदर्भ आहेच.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केलेल्या सर्वच परराष्ट्रविषयक हालचालींचा चीन हाच अजेंडा आहे. मोदी यांनी जपानला भेट दिली. आधी भूतान आणि नेपाळला भेट दिली. नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली. या सर्व भेटीत चीनलाच कसे लक्ष्य केले होते हे राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटलेले नाही. उदाहरणार्थ भूतान आणि नेपाळच्या भेटीत मोदी यांनी ज्या गुंतवणुकीचे करार केले. ते करार चीनकडून होण्याची शक्यता होती. पण भारताने ते करार चीनच्या आधी तर केलेच पण या दोन देशातली आपली गुंतवणूक वाढवली. आपल्याला विजेची गरज आहे आणि या दोन देशांत स्वस्त वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे हे माहीत होते पण आपल्या मनमोहनसिंग सरकारने या कामात फार काही तत्परता दाखवली नाही. म्हणून चीन त्यांच्यात आपली गुंतवणूक वाढवण्याच्या विचारात होता. पण त्याच्या आतच भारताने बाजी मारली. हे चीनला अनपेक्षित होते. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला पण तो व्यक्त करता येत नाही. आज चीनचे पंतप्रधान भारताशी करार करीत आहेत. ते किती डॉलर्सचे आहेत आणि कशाकशात होत आहेत याचे तपशील सर्वांना माहीत होतीलच पण या करारांत एक गोष्ट मोठीच सूचक आहे.

चीन आणि भारत या परिसरातल्या विकासाला चालना देणारे एंजिन म्हणून संयुक्तपणे काम करतील असे या दोन देशांत झालेल्या १२ करारातल्या पहिल्या करारात म्हटले आहे. ही गोष्ट मोठी सूचक आहे. चीनचे भारताविषयीचे आकलन वाढले असल्याचे ते लक्षण आहे. कारण १९९८ साली भारताने पाच अणुचाचण्या केल्या तेव्हा चीनने काही प्रश्‍न निर्माण केले होते. मुळात ‘भारता’सारख्या देशाने ४० टक्के लोकसंख्येला खायला मिळत नसताना या भानगडीत पडायचे कशाला अशी पृच्छा चीनने केली होती. आता मात्र चीनला आशिया खंंडातल्या विकासात भारत हा आपला भागीदार वाटतो. ही प्रगती आहे. ती आपल्याला सुखावणारी आहे पण तिला दुसरी एक बाजू आहे. चीनने आपल्याला हे मोठेपण दिले आहे ते शाब्दिक आहे. हे मोठेपण एखाद्या निर्णयात किंवा एखाद्या वादात निर्णय घेताना दाखवले जाणार आहे का ? हा मुख्य प्रश्‍न आहे. भारत आणि चीन यांच्यात झालेले १२ करार मोठे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये काही करार हे तंत्रज्ञानविषयक देवाण घेवाणीचे आहेत. नरेन्द्र मोदी यांनी याबाबत जपानचा वापर केला आहे. जपानच्या दौर्‍यात त्यांनी जपाने गुंतवणूकदारांना लालटेप नाही तर लाल कार्पेटचा अनुभव येईल असे म्हटले होते. त्यामागचा हेतू जपान आणि चीन यांच्यात स्पर्धा वाढवणे हा होता. याबाबत नरेन्द्र मोदी यांची हुशारी मान्य करावी लागेल पण शेवटी चीनची कूटनीती फार अनाकलनीय असते हे मोदी यांनी विसरू नये.

त्या निमित्ताने काही जुन्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. १९६२ च्या युद्धानंतर काही वर्षे चीन आणि भारत यांच्यातले संंंबंध ताणलेलेच होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी सार्‍या घटनांना नाट्यमय वळण देत १९७८ साली चीनशी बोलणी सुरू केली. चीन बरोबरच पाकिस्तानशीही त्यांनी चर्चा सुरू केली. या दोन देशांशी असलेले आपले सीमाविषयक वाद फार जुने आहेत आणि कमालीचे गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ते लवकर सुटत नाहीत म्हणून सगळेच संबंध संपुष्टात आणावेत असे काही नाही. दरम्यान व्यापारी संबंध वाढवून सर्वांचेच आर्थिक हित साधले पाहिजे आणि यथावकाश सीमा प्रश्‍नही सोडवण्यासाठी चर्चा सुरू ठेवली पाहिजे. वाजपेयी यांचे म्हणणे बरोबर होते. पण त्यांनी तसे म्हणूनही आता ३६ वर्षे झाली आहेत. व्यापारी देवाण घेवाण सुरू आहे, आपल्यापेक्षा त्यात चीनला जास्त लाभ होत आहे. सीमा प्रश्‍न मात्र इंचभरानेही सुटण्याची चिन्हे नाहीत. उलट तो अधिक गंभीर होत आहे. याचा आपण आता विचार केला पाहिजे.

Leave a Comment