जपानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून चीनी राजदूत अटकेत

jisheng
चीनचे आईसलँडमधील राजदूत मा जिशेंग यांना जपानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून चीनच्या विदेश मंत्रालयाने अटक केली असल्याचे वृत्त मिगजिग न्यूजने दिले आहे. चीन विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मात्र या वृत्ताचा इन्कार केला असून जिशेंग कुठे आहेत याची कोणतीही माहिती त्याच्याकडे नसल्याचे सांगितले आहे.

वृत्तानुसार आईसलँडचे विदेश मंत्रालय प्रवक्ते उर्दूर गुन्नरदोतर यांनी जिशेंग मार्चपासूनच गायब असल्याचे म्हटले आहे. ते जानेवारीत चीनला गेले ते अद्यापी परतलेले नाहीत. वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी पदत्याग केल्याचे सांगितले जात असले तरी दूतावासाच्या वेबसाईटवरून त्यांचा रिझ्यूमे काढून टाकला गेला आहे. मींगजिग न्यूजने जिशेंग व त्यांची पत्नी यांना जपानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक झाली असून त्याना अज्ञातस्थळी ठेवले गेल्याचे वृत्त दिले आहे. २०१२ पासून जिशेंग आईसलँचे राजदूत होते. त्यापूर्वी १९९१ ते ९५ सालात त्यांनी टोकियो येथील दूतावासात काम केले असून राजदूत बनण्यापूर्वी ते चीनच्या विदेश मंत्रालयात माहिती विभागाचे उपसंचालक होते.

Leave a Comment