अमरावतीत भाजपा कोठे?

bjp1
अमरावती हा विदर्भातला राजकीयदृष्ट्या अतीशय जागृत जिल्हा समजला जातो. सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपातून कडोनिकडीचा वाद जारी आहे. या वादातून तोडगा निघाला नाही तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे वेगवेगळे लढणार आहेत. भारतीय जनता पार्टीला वेगळे लढलो तरी विजय मिळेल अशी खात्री वाटत आहे. परंतु अमरावतीत तरी भाजपाचे वेगळे असे स्वतंत्र स्थान आता तरी नाही. शिवसेनेशी युती करून निवडणूक लढवून सुद्धा भारतीय जनता पार्टीला २००९ साली अमरावती जिल्ह्यात एकही विधानसभा मतदार संघ जिंकता आला नाही. त्यामुळे आता स्वतंत्रपणे लढून हा पक्ष तिथे काय मिळवणार आहे हे काही समजत नाही. अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरासह आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातले चार आमदार कॉंग्रेसचे असून शिवसेना एक आमदार आहे. भारतीय जनता पार्टीचा एक आमदार नाही. अपक्ष मात्र तीन निवडून आलेले आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादीला सुद्धा फारसे स्थान नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आर या पार म्हणत कॉंग्रेसला सोडून निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात वितुष्ट येण्याचे कारण आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत (माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव) यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शत्रुत्व ओढवून घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजय खोडके या आपल्या आमदारास पक्षातून निलंबित केले होते. त्यांच्यामागे मोठा गट आहे आणि त्याचा विचार करून शेखावत यांनी खोडके यांची मदत घेतली. विशेष म्हणजे खोडके गटाचा प्रभावही दिसून आला. परिणामी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वितुष्ट आले. अर्थात हे वितुष्ट त्यांना परवडणारे नाही. कारण या राजकारणाचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते रावसाहेब शेखावत यांच्या विरोधात काम करू शकतात आणि तसे झाल्यास अमरावती शहर मतदारसंघाची निवडणूक गतवर्षी प्रमाणेच गाजणार आहे. २००९ साली या मतदारसंघात शेखावत यांना उमेदवारी मिळाली. त्यांना पक्षातून खूप विरोध होता. तरीही ते उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले, मात्र माजी मंत्री सुनील देशमुख यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे शेखावत यांना फार कष्ट करून विजय मिळवावा लागला. आता पुन्हा ते उभे राहण्यास तयार आहेत आणि पुन्हा एकदा सुनील देशमुख त्यांच्याशी दोन हात करायला उत्सुक आहेत. अर्थात त्यासाठी त्यांना भाजपामध्ये जावे लागणार आहे आणि त्यांच्यासाठी नितीन गडकरी यांनी पुष्पहार तयारच ठेवलेले आहे.

अमरावती शहराच्या या राजकारणामुळेच बडनेरा मतदार संघातही चुरस वाढण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात अपक्ष रवि राणा हे विजयी झाले होते. यावेळी रवि राणा यांची चाल काय राहील हे काही कळत नाही. कारण ते अपक्ष आहेत आणि ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असे जाहीर झाले होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. परंतु त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला हुलकावणी दिली आणि आपले स्वत:चे वेगळे राजकारण सुरू आहे हे दाखवून दिले. रवि राणा आणि संजय खोडके या दोघांत वितुष्ट आहे. त्यामुळे संजय खोडके आणि पर्यायाने रावसाहेब शेखावत हे दोघेही रवि राणा यांना बडनेर्‍यातून पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यातूनच बडनेरा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीत रवि राणा यांच्या पत्नींना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र त्या पराभूत झाल्या. नवनीत राणा हे त्यांचे नाव. आता त्यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आनंद अडसूळ हे अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. मात्र त्यांना जिल्हा नीट सांभाळता येत नाही. त्यातूनच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. अनिल बोंडे यांनी बंडखोरी केली आणि ते मोर्शी मतदारसंघात भाजपाच्या विरोधात उभे राहिले. भाजपाचा पराभव करून ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांना शिवसेनेने पक्षातून काढून टाकले. आता मात्र ते भाजपात येऊन मोर्शीची जागा मागण्याच्या विचारात आहेत. तिवसा मतदारसंघ हा एक लक्षवेधी मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर या निवडून आलेल्या आहेत, मात्र त्यांना पक्षाच्या आतून विरोध आहे आणि त्यांना उमेदवारी मिळालीच तर त्यांची भगिनी डॉ. संयोगिता निंबाळकर ही त्यांच्या विरोधात उभे राहण्याच्या विचारात आहे. म्हणजे तिवसा मतदारसंघात बहिणींची लढत रंगणार आहे. भाजपाचे अरुण अडसळ हे नेते फार मागे पडले आहेत. मेळघाटमधून कॉंग्रेसचे केवलराव काळे हे निवडून आलेले आहेत आणि यावेळी हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. आनंद अडसूळ यांचे चिरंजीव दर्यापूरमधून निवडून आले होते. हीही जागा राखीवच आहे. काही ना काही करून जनतेचे लक्ष वेधून घेणारे अचलपूरचे आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे अचलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी मात्र ते कोणाकडून उभे राहणार याचा अंदाज आलेला नाही.

Leave a Comment