मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बनावट फेसबुक आणि ट्वीटर अकौंट त्वरीत बंद केले जावे यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे समजते. मनसेचे मिडीया संयोजक सचिन मोरे यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या नावाने कुणीतरी मुद्दाम बनावट फेसबुक आणि ट्वीटर अकौंट सुरू केले असून त्यावरून आक्षेपार्ह आणि वादास कारणीभूत ठरतील अशी विधाने पोस्ट केली जात आहेत. हे अकौंट चालविणारी व्यक्ती स्वतः राज ठाकरेच असल्याचा भ्रम निर्माण करते आहे त्यामुळे पोलिसांनी त्याची त्वरीत दखल घेऊन ही अकौंट बंद करावीत आणि ही अकौंट ऑपरेट करत असलेल्या व्यक्तीला अटक करावी अशी मागणी करून तशी तक्रार नोंदविली आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ सालात राज यांची मुले अमित आणि उर्वशी यांचीही अशीच बनावट फेसबुक अकौंट सुरू केली गेली होती. त्याविरोधात पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी कारवाई करून ती तत्काळ बंद केली होती असेही समजते.