कॉंग्रेसचा तिळपापड

congress
कॉंग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे, असे कॉंग्रेसचे नेते वारंवार सांगत असतात आणि त्यांच्या या थापांना बळी पडून करोडो गरीब लोक कॉंग्रेसला मतदान करत असतात. अशा गरीब लोकांच्या नावावर कॉंग्रेसने साठ वर्षे राजकारण केले आणि सत्ता मिळवून त्या गरीब माणसाला कायम गरीब ठेवले. त्याच्या गरिबीवर दया दाखवून सातत्याने त्याची मते मिळवली. हे गरीब लोक कायम गरीब राहणे हे कॉंग्रेसच्या फायद्याचे होते. कारण ते तसे गरीब राहिले तरच कॉंग्रेसला गरिबांच्या तथाकथित कल्याणाच्या नावावर राजकारण करता येणार होते. म्हणून कॉंग्रेसने या लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी या गरिबांना गरिबीच्या बाहेर काढणारा सर्वात क्रांतीकारक निर्णय घेऊन देशातल्या ४० कोटी गरिबांची बँक खाती काढणारी जनधन योजना सुरू केली. मोदी सरकारने पहिल्या शंंभर दिवसात सुरू केलेल्या या एकाच योजनेचे एवढे दूरगामी परिणाम होणार आहेत की, त्यामुळे जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन येणार आहे.

खरे म्हणजे केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने शंभर दिवसात आपण काय करू याचे आश्‍वासन दिले होते हे कुठेच नोंदलेले नाही. मुळात या सरकारने जनतेला शंभर दिवसांचे आश्‍वासन दिलेले नव्हते. आपल्या मंत्र्यांना महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची ती समयसीमा आखलेली होती. परंतु कॉंग्रेस पक्षाने जणू काही नरेंद्र मोदींनी शंभर दिवसात रामराज्य आणण्याची घोषणा केली होती असे भासवत या शंभर दिवसावर एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे आणि तिच्यात सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. कॉंग्रेस पक्ष सत्तेपासून दूर गेल्यामुळे किती निराश झाला आहे आणि नरेंद्र मोदींच्या उपक्रमशीलतेमुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांची कशी पोटदुखी सुरू झालेली आहे हे या पुस्तिकेतून लक्षात येते. नरेंद्र मोदी यांच्या शंभर दिवसांच्या वायद्यांवर अशा प्रकारची टीका-टिप्पणी करणारी पुस्तिका आजवर सत्तेत कधीच न आलेल्या एखाद्या पक्षाने प्रसिद्ध केली असती तर त्या पक्षाला उलटा जाब कोणी विचारला नसता. पण कॉंग्रेसची खरी पंचाईत हीच आहे. त्यांनी मोदी सरकारवर एखादा जरी आरोप केला तरी लोक कॉंग्रेसने याबाबत काय केले होते असा प्रश्‍न विचारणार आहे आणि तिथे कॉंग्रेसची पंचाईत होणार आहे.

शंभर दिवसात मोदींनी काहीच केले नाही, असा आरोप करणार्‍या कॉंग्रेस सरकारने मोदींच्या शंभर दिवसांपेक्षा १८० पट जादा दिवस म्हणजे ६० वर्षे देशावर राज्य केलेले आहे. त्यांना एवढ्या प्रदीर्घ काळात देशासमोरचे जे प्रश्‍न सोडवता आले नाहीत तेच प्रश्‍न नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसात का सोडवले नाहीत, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे नेते करत आहेत. या परता निलाजरेपणा दुसरा काय असेल?
नरेंद्र मोदींनी आश्‍वासने दिली आहेत, पण ती शंभर दिवसात पूर्ण होतील असे कधी म्हटले नव्हते. कॉंग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारला दहा वर्षे ज्या धोरण लकव्याने जखडून टाकले होते तो लकवा कमी करण्याचे आश्‍वासन मात्र मोदींनी दिले होते आणि ते पूर्ण केलेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड गती मिळेल असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या सरकारने शंभर दिवसांत घेतले आहेत. कार्यक्षमता असेल तर शंभर दिवसात निर्णय घेता येतात. पण त्यांचे परिणाम मात्र शंभर दिवसात दिसत नसतात. तशी अपेक्षा करणेही मूर्खपणाचे असते. आम्ही झाड लावण्याचे आश्‍वासन दिले आहे, शंभर दिवसात आम्ही झाड लावू शकतो, पण कोणी अती शहाणा माणूस शंभर दिवसात त्या झाडाला फळ का लागले नाही आणि मनसोक्त फळे खाऊन आम्हाला ढेकर का आली नाही असा प्रश्‍न विचारायला लागला तर त्याला दोन्ही हात कोपरापासून जोडून नमस्कार करण्या शिवाय आपण काहीच करू शकत नाही.

परदेशात गुंतवलेला काळा पैसा शंभर दिवसात परत का आणला नाही, असा एक वेडगळ प्रश्‍न कॉंग्रेसच्या या पुस्तिकेत विचारण्यात आला आहे. परदेशातला पैसा आणायचा म्हणजे नरेंद्र मोदी यांनी रिकाम्या सुटकेस घेऊन स्वित्झर्लंडला जायचे आहे आणि तिथून काळ्या पैशाच्या नोटा वरून विमानाने परत दिल्लीला यायचे आहे अशी कॉंग्रेसवाल्यांची कल्पना दिसते किंवा लोकांची तशी कल्पना असेल तर तसा युक्तिवाद करून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल आणि काळा पैसा शंभर दिवसात प्रत्यक्षात परत येणार असता तर कॉंग्रेसवाल्यांनी तो त्यांच्या दहा वर्षात का परत आणला नाही? काळ्या पैशाच्या बाबतीत कॉंग्रेसच्या सरकारने जे केले नाही ते नरेंद्र मोदींनी शंंभर दिवसात केले आहे. काळा पैसा परत आणण्याची कारवाई सरकारच्या हातात नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. या कारवाईसाठी केंद्र सरकारने एक समिती नेमावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मनमोहनसिंग यांना दिला होता, परंतु मनमोहनसिंग यांना काळा पैसा आणायचाच नव्हता. त्यामुळे त्यांनी अशी समिती नेमण्याच्या बाबतीत तीन वर्षे चालढकल केली होती. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय ही समिती नेमण्याचा घेतलेला आहे. परंतु काळ्या पैशाबाबत सतत दिरंगाई करणारे कॉंग्रेसचे नेते नरेंद्र मोदींनाच सवाल करत आहेत ही किती हास्यास्पद गोष्ट आहे? नरेंद्र मोदी यांनी टोमॅटो आणि पेट्रोलचे भाव एक केले असा एक आरोप या पुस्तिकेत करण्यात आला आहे. पण कॉंग्रेसची ही पुस्तिका काढणार्‍या टवाळांना पेट्रोल लिटरने मोजत असतात आणि टोमॅटो किलोने मोजत असतात एवढीही साधी अक्कल नाही. प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून पेट्रोलचे दर तीन वेळा कमी केले आहेत आणि गेल्या दहा वर्षात महागाईचा दर सर्वात कमी करून दाखवला आहे.

Leave a Comment