भाजपाला फटके

bjp1
काल झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांनी भारतीय जनता पार्टीला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे कारण मोदी लाटेत त्याला प्रचंड यश मिळाल्याला अजून चार महिनेही झाले नाहीत. त्यातल्या त्यात विचार करायला लावणारी एक बाब म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून झालेल्या प्रत्येक पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला आहे. आधी उत्तराखंडात भाजपाने चारही जागा गमावल्या. नंतर बिहारात झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाने काही जागा गमावल्या. आता उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान यासह सहा राज्यांत भाजपाला पुन्हा धक्का बसला असून मोदी मॅजिक संपत आले असल्याचा संकेत दिला आहे. शिवाय मोेदींनी लोकसभेच्या निवडणुकीत मिळवलेल्या स्पृहणीय यशाचा करिष्मा संपत आला असल्याचे सूचित केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या २८५ या सदस्य संख्येला सर्वात मोठा हातभार उत्तर प्रदेशाच्या ७४ जागांचा लाभला होता पण आता याच राज्यात भाजपाला अनेक जागा गमवाव्या लागल्या आहेत.

उत्तर प्रदेशात ११ पोट निवडणुका झाल्या. त्यातल्या आठ जागा समाजवादी पार्टीने तर तीन जागा भाजपाने मिळवल्या. भाजपाचे नेते आगामी काळात उत्तर प्रदेशात शत प्रतिशत भाजपाचे स्वप्न पहात होते. त्याला मोठा सुरूंग तर लागला आहेच पण समाजवादी पार्टीला एवढे बदनाम करूनही अखिलेश सिंग यांनी आपले सामर्थ्य सिद्ध करून दिले आहे. मुलायमसिंग यांचा वट्ट अजूनही आहे हे दिसून आले आहे. गुजरातेतून कोणी जाईल आणि सर्व स्थानिक नेत्यांना संपवून भाजपाचा भगवा फडकवेल हे काही शक्य नाही असेही आता कळून चुकले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या मागासवर्गीय मतदारांनी मोदींना मतदान केले होते. आता त्यांनी स्थानिक निवडणुकीत मोदी फॅक्टर दिसत नसल्याने समाजवादी पार्टीला पाठींबा दिला आहे. या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना भाजपाने स्टार प्रचारक म्हणून पुढे केले होते पण त्यांना मतदारांना फार प्रभावित करता आले नाही. गुजरातेत लोकसभा निवडणुकीत सर्व जागा भाजपाला मिळाल्या होत्या पण आता विधानसभा पोटनिवडणुकीत ९ पैकी सहा जागा भाजपाला आणि तीन जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपाला सहा जागा मिळाल्या हे खरे पण कॉंग्रेसने जिंकलेल्या तीन जागांत भाजपाचे बालेकिल्ले आहेत. ते राखण्यात भाजपाला अपयश आले आहे.

गुजरातेत नरेन्द्र मोदी यांनी रिकाम्या केलेल्या वडोदरा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रंजनबेन भट्ट या तीन लाख २९ हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आल्या. हे यश कौतुकास्पद आहे पण याच मतदारसंघात मोदी पाच लाख ७० हजार मतांनी निवडून आले होते हे विसरता येणार नाही. या निकालांना एक मोठा संदर्भ आहे. गुजरातेत नरेन्द्र मोदी यांनी जबरदस्त वर्चस्व निर्माण केले होते. त्यांच्या जागी मुख्यमंत्री झालेल्या आनंदीबेन पटेल त्यांच्यासारखा हा गड शाबूत ठेवू शकतील की नाही असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्या पहिल्याच परीक्षेत नापास झाल्या आहेत. राजस्थानात भाजपाला बसलेला धक्का जास्त मोठा आहे कारण तिथे झालेल्या चारपैकी तीन जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. हा निकाल कॉंग्रेस पक्षाचा आत्मविश्‍वास वाढवणारा ठरेल असा विश्‍वास वाटतो. तिथला कॉंग्रेस पक्षाचा हा विजय तिथे गेल्या दोन निवडणुकांत झालेल्या त्याच्या दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर झाला आहे ही बाब विचारात घ्यावी लागते. तिथे कॉंग्रेसने अशोक गहेलोत यांना हटवून सचिन पायलट यांच्या हातात सूत्रे दिल्यामुळे कॉंग्रेसला विजय मिळाला आहे.

या सगळ्या धक्क्यांनी भाजपात चिंता व्यक्त केली जात असतानाच प. बंगालात मात्र भाजपाने सर्वांना धक्का दिला आहे. कारण, प. बंगालात भाजपाला आजवर एकाही विधानसभा मतदारसंघ जिंकता आला नव्हता. आता एक जिंकला आहे. राज्यात दोन विधानसभा मतदारसंघात निवडणुका झाल्या. त्यातले बसीरहाट दक्षिण ही जागा भाजपाने जिंकली आहे. भाजपाचा हा विजय कोणाशीही युती न करता मिळवलेला आहे. दुसर्‍या चौरंगी या मतदार संघात भाजपाचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला. लोकसभा निवडणुुकीत मोदी लाट होती पण ती तामिळनाडू आणि प. बंगाल मध्ये चालली नाही. हे सर्वांना माहीत आहे. पण आता सार्‍या देशातली मोदी लाट ओसरत असताना त्यांचा करिष्मा नेमका प. बंगालातच दिसून आला आहे. आसामातही भाजपाला दिलासा मिळाला आहे. तिथे भाजपाने सिल्चर मतदारसंघ कॉंग्रेसकडून खेचून घेतला आहे. तेलंगणातल्या एका जागेवर तेलंगण राष्ट्र समिती आणि आंध्रातल्या एका जागेवर तेलुुगु देसम या पक्षाने जिंकली. तिथे काही आश्‍चर्य घडले नाही. कॉंग्रेसने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, समाजात विघटन घडवून आणून मते मिळत नाहीत हे भाजपाने समजून घेतले पाहिजे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने व्यक्त केली तर भाजपाने हे विश्‍लेषण नाकारून या पोटनिवडणुका स्थानिक प्रश्‍नावर झाल्या आहेत हे कॉंग्रेसच्या नजरेस आणून दिले आहे. अर्थात या दोन्ही विश्‍लेषणात काही अर्थ नाही. भाजपाने आत्मपरीक्षण केले पाहिजे हे मात्र खरे आहे.

Leave a Comment