नांदेडमध्ये भाजपाला आयारामांचे बळ

bjp
नांदेड जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगले यश मिळवले होते. जिल्ह्यातल्या नऊपैकी हदगाव, भोकर, नांदेड (दक्षिण), नांदेड (उत्तर), देगलूर आणि मुखेड या सहा जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या तर किनवट आणि लोहा या दोन जागांवर राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाले होते. नायगाव मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार वसंतराव चव्हाण हे नंतर कॉंग्रेसमध्ये गेले. म्हणजे नांदेड जिल्ह्यात सात कॉंगे्रेस, दोन राष्ट्रवादी असे चित्र आहे. सध्याच्या मावळ्त्या विधानसभेत नांदेड जिल्ह्याने एकाही भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या आमदाराला निवडून दिलेले नाही. पण आता या जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला इतकी गळती लागली आहे की, या आयारामां मुळे भाजपा-सेनेचे बळ वाढून स्थिती एकदम उलटी होणार आहे. आता सध्या दिसत असलेल्या चित्रावरून तरी असे दिसते की, अशोकराव चव्हाण यांचा भोकर आणि नांदेड नॉर्थ या दोन मतदारसंघात केवळ कॉंग्रेसला यश मिळू शकेल आणि उर्वरित सात जागांवर भाजपा-सेनेचे तरी उमेदवार निवडून येतील किंवा तिथे कॉंग्रेसला अस्तित्वासाठी मोठा सामना करावा लागेल..

हे चित्र बदलण्याचे एक कारण म्हणजे राज्यातली कॉंग्रेसच्या विरोधात गेलेली हवा आणि जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांचा भाजपा प्रवेश. असा प्रवेश करणारांत तिघांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. एक आहेत माजी खासदार भास्करराव खतगावकर. ते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आहेत. ते २००९ साली खासदार म्हणून निवडून आले होते. पण त्यांना अशोकराव चव्हाण यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत गेली त्यामुळे ते नाराज होत गेले आणि आता शेवटी त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतराचा परिणाम या जिल्ह्यातल्या नायगाव, मुखेड आणि देगलूर या तीन मतदारसंघांवर परिणाम होईल. या तीन मतदारसंघांपैकी नायगावमध्ये पूर्वी एकदा भाजपाचा आमदार निवडून आला होता. पक्षांतर केलेले दुसरे नेते डॉ. माधवराव किन्हाळकर. ते मागे राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री होते. ते दोनवेळा भोकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. ते एकदा अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि नंतर राष्ट्रवादीत होते. त्यांनी गेल्या निवडणुकीत भोकरमधून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि ते पराभूत झाले होते. या निवडणुकीत चव्हाण यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असा आरोप करून डॉ. किन्हाळकर यांनी त्यांच्यावर खटला दाखल केला आणि तो पाच वर्षे चालला. आता किन्हाळकर हे पुन्हा भोकरमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून उभे राहणार का हा प्रश्‍न आहे.

भोकर मध्ये आता अशोक चव्हाण यांच्या पत्नी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार हे नक्की आहे. तिथे किन्हाळकर उभे राहिले तर या दोघांत मोठा चुरशीचा सामना होईल. असे असले तरी साधारणत: भोकर मधून सौ. चव्हाण निवडून येऊ शकतील असे चित्र आहे. या जिल्ह्यातले किनवट आणि हदगाव हे दोन मतदारसंघ तसे कॉंग्रेसला सहज न मिळणारे मानले जातात. किनवट मधून पूर्वी भाजपाचे डी. बी. पाटील हे निवडून आले होते. ते नंतर खासदारही झाले. ते मध्येच राष्ट्रवादीत गेले. आता भाजपात आहेत आणि त्यांनी आता लोकसभेची निवडणूक अशोक चव्हाण यांच्याविरोधात लढवली होती. हदगाव मतदारसंघात आता कॉंग्रेसचे माधवराच पवार निवडून आले आहेत पण येत्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेना तगडा उमेदवार देणार असेल तर माधवराव पवार यांचा पाड लागण्याची शक्यता कमी आहे. नांदेड दक्षिण या शहरातल्या मतदारसंघात आता अशोक चव्हाण यांचे समर्थक ओमप्रकाश पोकरणा हे आमदार आहेत. पण आता भाजपा -सेनेच्या शहरी मतदारांसमोर त्यांची डाळ शिजेल की नाही याचा काही भरवसा देता येत नाही.

कॉंग्रेसची ही जागा धोक्यात आहे कारण शहरात एम आय एम ही मुस्लिम संघटना बळकट असून तिने आपले ११ नगरसेवक निवडून आणले आहेत. या पक्षामुळे कॉंग्रेसचा मुस्लिम मतदार फार मोठ्या प्रमाणावर फुटणार आहे आणि त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. नांदेड जिल्ह्यातला लोहा हा मतदारसंघ फार गाजणार आहे कारण तिथे प्रतापराव चिखलीकर हे शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत. ते अशोकराव चव्हाण यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना कै. विलासराव देशमुख हे सतत संरक्षण देत असत. त्यांनी आता शिवसेनेचा आधार घेतला आहे आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्यांचा या मतदारसंघात चांगला वचक आहे. नांदेड जिल्ह्यात युतीची हवा आणि मातबर उमेदवार यांचा मेळ जमला तर नऊपैकी निदान सहा तरी आमदार युतीचे निवडून येऊ शकतात. सध्या तरी नांदेड (उत्तर) हा राज्याच्या मंत्रिमंडळातले उच्च शिक्षण मंत्री डी.पी. सावंत यांचा मतदारसंघ आणि भोकर हा चव्हाणांचा मतदारसंघ वगळला तर जिल्ह्यातले सात मतदारसंघ धोक्यात आहेत. या जिल्ह्यात कै. गोपीनाथराव मुंडे यांचा फार भर होता पण आता ते हयात नाहीत. त्याचा काही परिणाम युतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment