गणित शिवसेनेचे

shivsena
सहा राज्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होताच त्या निवडणुका जिंकणार्‍या समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसचा तर आवाज वाढलाच पण महाराष्ट्रात शिवसेेनेचाही आवाज एकदम वाढला. त्यांनी भाजपाला टोले लगवायला सुरूवात केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या दुर्मुखलेल्या चेहर्‍यांवर काही स्मित रेषा उमटल्या. त्यांनी अगदीच आशा सोडली होती. आता त्यांना आपला फार धुव्वा उडणार नाही असे वाटायला लागले आहे. ते साहजिक आहे. अर्थात कॉंग्रेसच्या नेत्यांचा आनंद साहजिक आहे कारण गुजरात आणि राजस्थानात त्यांची कामगिरी छान झाली आहे. राष्ट्रवादीला आनंद वाटण्याचे काही कारण नाही. या पोट निवडणुकांत राष्ट्रवादीचे घड्याळ कोठेच नव्हते. पण या निकालांनी कॉंग्रेसचा प्रभाव दिसून आल्याने महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रवादीवर डोळे वटारायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेस हाच मोठा पक्ष आहे तेव्हा आम्ही सांगू तेवढ्या जागा घेऊन गप्प बसा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कारण पोटनिवडणुकांचे निकाल कसेही लागले तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या मिशांना पिळ देण्याचे काही कारण नाही. तसाच प्रकार शिवसेना आणि भाजपाची झाली आहे.

भाजपा नेत्यांचे चेहरे पडले आहेत. त्यांच्या या मनस्थितीचा विचार करून शिवसेनेने भाजपाला दमात घ्यायला सुरूवात केली आहे. आता तर जमिनीवर पाय टेकवा. फार वरचढपणा करू नका नाहीतर जनता उलटे टांगून सालटी काढायला मागे पुढे पाहणार नाही. शिवसेनेने भारतीय जनता पाटींला एवढे दमात घ्यावे असे भाजपाच्या नेत्यांनी काय पाप केले आहे आणि कोठे दादागिरी केली आहे हे काही समजत नाही. भाजपाचे नेते जमिनीवर पाय ठेवूनच चालत आहेत. मग शिवसेना सामना मधून भाजपाला सातत्याने एवढे का ठेचत आहे ? भाजपाच्या नेत्यांनी हवेत वावरून काय केले आहे ? काही केलेले नाही. केवळ शिवसेनेकडे जादा जागा मागितल्या आहेत. म्हणजे शिवसेेना सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला टोले लगावत आहे ते केवळ शिवसेनेकडे जादा जागा मागितल्या म्हणून. आता भाजपाने ताळ्यावर यावे आणि जमिनीला पाय टेकवावेत म्हणजे काय ? तर शिवसेना सांगेल तेवढया जागा घ्याव्यात. भाजपाला पोटनिवडणुकीत टोले बसत आहेत ते काही शिवसेनेमुळे बसत नाहीत. किंवा ते शिवसेनेेनेही मारलेले नाहीत. शिवसेना भाजपाला केवळ सामना दैनिकातल्या अग्रलेखातच टोले मारत आहे. बाहेरच्या राज्यात भाजपाला समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने टोले दिले म्हणून भाजपाने शिवसेनेशी नम्रपणे वागण्याचे कारण काय?

त्या टोल्याने भाजपाचे वजन कमी झाले आहे पण तिथे शिवसेनेचे वजन काही वाढलेले नाही. जागावाटपातले प्लस मायनस हा शिवसेना आणि भाजपा यांच्यातला मामला आहे. त्याच्यावर भाजपाचा उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यात पराभव होण्याचा परिणाम होण्याचे कारण काय ? म्हणून भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या टोल्यांना काही किंमत न देता त्याना १३५ जागांवर अडवले. भाजपाचे नेते वरचढपणा करतात कारण लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेवर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. मोदी हे भाजपाचे नेते आहेत आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे जागावाटप होताना भाजपाने दुय्यमपणाची वागणूक स्वीकारण्याचे काही कारण नाही असे भाजपाचे नेते म्हणत आहेत. त्यावर शिवसेनेचा युक्तिवाद मोठा मासलेवाईक आहे. लोकसभेच्या निवडणुकीवर केवळ मोदी लाटेचाच नाही तर शिवसेनेसह महायुतीतल्या अन्य पक्षांचाही प्रभाव आहे. भाजपाने मोदी मोदी करीत बसू नये, असे शिवसेनेला वाटते. यात शिवसेनेचा आणि सामनाचा दुटप्पीपणा दिसतो. सामना विजयाचे श्रेय घेतो पण पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मात्र केवळ भाजपाला टोले लगावतो. हा काही न्याय नाही. विजय केवळ मोदींचा नसून शिवसेनेचाही असेल तर पराभवही भाजपा बरोबर शिवसेनेचाही आहे.

पण शिवसेनेला आता मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यांना आपल्या हातून ते पद जाईल असे काहीही नको आहे. ते पद हवे आहे म्हणून जादा जागा लढवायच्या आहेत आणि जादा जागा मिळवायच्या आहेत. त्यांना जादा हाच शब्द माहीत आहे. बाकीचे आकडे ऐकायला ते तयार नाहीत. कालच संजय राऊत यांनी आकड्यांची थट्टा केली. आकडे वगैरे आम्हाला काही नको आहे. आम्हाला केवळ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार आणि उद्धवजी मुख्यमंत्री हवे आहेत असे ते म्हणाले. भाजपाला आकडे महत्त्वाचे वाटतात. त्यात शिवसेनेला चोपावे असे काही भाजपाचे म्हणणे नाही. युती झाल्यापासून शिवसेनेच्या ५९ जागा आणि भाजपाच्या १९ जागा कधीच जिंकल्या गेलेल्या नाहीत. त्यांचा फेरविचार व्हावा असे भाजपाचे म्हणणे आहे. फेरविचार व्हावा याचाही अर्थ त्या ५९ जागा भाजपाला द्या असे काही म्हणणे नाही. यातल्या काही जागांवर भाजपाने काही प्रगती केली असेल तर त्या जागा भाजपाला द्याव्यात. नाहीतर त्या शिवसेनेकडेच रहाव्यात असे भाजपाचे म्हणणे आहे. या ५९ आणि १९ अशा ७८ जागा वगळल्यास राहिलेल्या जागांत भाजपाच्या १०० आणि सेनेच्या ११० जागा पक्क्याच आहेत. तेव्हा सतत गमावलेल्या ७८ जागांत शिवसेनेला काही गमवायचे नाही मग उगाच त्यातल्या चार दोन जागांची अदलाबदल होत असेल तर शिवसेनेने त्यासाठी युती पणाला लावण्याची आणि उगाच भाजपाला टोले लगावण्याचे कारण काय ?

Leave a Comment