तुटेपर्यंत ताणू नका

yuti
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीमध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला आहे. दोघेही काही विशिष्ट जागांवर आग्रही आहेत. तो आग्रह व्यक्त करताना ते टोकाची भाषा वापरत आहेत. मात्र तशी ती वापरतानाच युती तुटणार नाही अशी ग्वाहीही देत आहेत. म्हणजे युतीची दोघांनाही गरज आहे हे दोघांनाही मान्य आहे. पण तरी सुद्धा ते करत असतानाच परस्परांवर मात करण्याचा विचार त्यांना सोडून देता येत नाही. या दोन पक्षातला जागा वाटपाचा हा संघर्ष एवढ्या हास्यास्पद पातळीवर आला आहे की या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता कितीही तडजोड केली तरी त्यांच्या समर्थकांना आता त्यांच्या ओढाताणीचा उबग आला आहे. आता एक लाट आहे म्हणून नाहीतर या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात जेमतेमच स्थान आहे. गेली १५ वर्षे त्यांना सत्तेच्या आसपासही जाता आलेले नाही पण सत्तेची थोडीशी चाहूल लागताच त्यांंनी ती मिळालीच आहे असे मानून ओढाताण सुरू केली आहे. निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख दोन दिवसांवर आली तरीही त्यांना अजून जागावाटपाचा घोळ मिटवता आलेला नाही.

चार दोन जागा कमी जास्त देऊन तडजोड करावी आणि एकदाचा हा घोळ संपवावा एवढी क्षमता त्यांच्यात नाही हे दिसत असल्याने जनतेच्या मनात त्यांच्या विषयी अनादर वाढत आहे. पण त्यांना या गोष्टीची काही तमा नाही. भाजपाा-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून जागावाटपावर वाद जारी आहेत पण त्यांना ते नीट करता येत नसेल तर असे लोक राज्यातली सत्ता कशी सांभाळणार आहेत असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. जागा वाटप तसे अवघड नाही कारण कोणत्या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ही गोष्ट काही गोपनीय नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना तीन आठवडे मंत्रिमंडळ तयार करता आले नव्हते. सुमारे तीन आठवडे त्याचा घोळ चालला होता. आता या चारही पक्षांनी आपल्याला आपापसातले वाद मिटवता येत नाहीत हे दाखवून दिले आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातला वाद दुर्दैवी आहे पण सकारण आहे. कारण भाजपाने शिवसेनेला धारेवर धरले आहे. या दोन पक्षांत २५ वर्षांपासून युती आहे. पण म्हणून या युतीच्या जागावाटपात कायम शिवसेनेचीच मर्जी चालावी असे काही म्हणता येणार नाही. समीकरणे बदलली आणि देशाचे राजकारण बदलले तरी भाजपाने शिवसेनेकडे जागा मागायच्या का ? असा सवाल भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्भवला आहे. तो रास्त आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेकडून मिळालेल्या ११९ जागा लढवल्या आणि त्यातल्या शिवसेनेपेक्षाही अधिक जागा मिळवल्या. शिवसेनेने १६९ जागा लढवून भाजपापेक्षा कमी आमदार निवडून आणले.

दरम्यानच्या काळात शिवसेनेतून राणे, राज ठाकरे बाहेर पडले. पक्षाचा प्रभाव कमी झाला. अनेक बालेकिल्ले ढासळले. या स्थितीतही भाजपाने लहान भाऊ म्हणून वागावे आणि मोठ्या भावाच्या आज्ञेत रहावे असे म्हणता येत नाही. त्यामुळे भाजपाला ११९ पेक्षा सोळा जागा जादा हव्या आहेत. या मागणीत काहीही गैर नाही.पण, भाजपाच्या नेत्यांनी हा १३५ जागांचा दावा सप्रमाण मांडायला हवा. भाजपाची ही बाजू त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे पण तिचा विचार भाजपाने शिवसेनेच्या नजरेतून करायला हवा. कारण भाजपाला १३५ जागा एकुणात नको आहेत. चार मित्रपक्षांना वाटून झालेल्या जागांतून ज्या जागा उरतील त्यातून १३५ जागा हव्या आहेत. तसा विचार केला तर शिवसेनेला मिळणार्‍या जागांची संख्याही १३५ एवढीच होते. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की, शिवसेना १६९ वरून १३५ वर खाली येणार आणि भाजपार्टी ११९ वरून १३५ वर वर जाणार. शिवसेना आणि भाजपाने समसमान जागा घ्याव्यात. शिवसेेनेने हे मागणे फेटाळले आहे. त्यामागेही कारण आहे.

शिवसेनेने यामागची कारण मीमांसा जाहीरपणे मांडली नसली तरीही भाजपाची ताकद वाढल्याचा दावा शिवसेनेने निर्विवादपणे मान्य करावा अशीही स्थिती नाही. कारण राज्यात लाट असली तरी तिचे लाभ पदरात पाडून घेण्याची क्षमता अंगात असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या नेत्याची भाजपात कमतरता आहे. त्यामुळे १३५ च्या ऐवजी १२५ जागांवर भाजपाने तडजोड करायला हवी. तसे झाल्यास शिवसेनेला १४५ जागा मिळतात. अर्थात ही वाटणी अशीच व्हावी असे आज ठामपणे म्हणता येत नाही कारण शिवसेनेला मोठ्या भावाची भूमिका सोडायची नाही. कारण त्यावर मुख्यमंत्रीपद अवलंबून आहे. याही बाबतीत शिवसेनेला काही सल्ला देण्याची गरज आहे. अगदी २५ वर्षात प्रत्येकवेळी झालेल्या चर्चेवरून असे वाटते की, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा व्हावा असे नाव काही नक्की झालेले नाही. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांना हे पद मिळावे असे ठरले आहे. तसे ठरलेले असल्यास कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यावर आता वाद होण्याचे काही कारणच नाही. निवडणुका होऊ द्याव्यात आणि ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री ठरवावा हे उत्तम. पण तरीही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नावाची द्वाही फिरवत आहेत हे काही ठीक नाही.

Leave a Comment