महाराष्ट्रात पंचरंगी निवडणूक?

vidhan-sabha
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि आचारसंहिता जारी झाली आहे. खरे म्हणजे विविध राजकीय पक्षांचा प्रचार आतापर्यंत जोमाने सुरू व्हायला हवा होता. परंतु प्रचार तर सुरू झालेला नाहीच, पण दोन कॉंग्रेसची आघाडी होणार की नाही आणि भाजपा-सेनेची युती टिकणार की नाही हेच प्रश्‍न अजून सुटलेले नाहीत. तशी या चार मित्र पक्षांची जागा वाटपाबाबत ओढाताण मागेपासूनच सुरू होती, परंतु एकदा निवडणुकीची तारीख जाहीर झाली की, त्यांचे जागावाटप फटक्यात होऊन जाईल असे वाटले होते. मात्र अजूनही ओढाताण जारी आहे. ही केवळ सामान्य ओढाताण नाही तर ती एवढी गंभीर आहे की, आघाडी आणि युती फुटून चारी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतील असे अजूनही वाटते. असे हे चार पक्ष आणि मनसेचा पाचवा पक्ष अशी महाराष्ट्रातली निवडणूक पंचरंगी होईल असे चिन्ह आता तरी दिसायला लागले आहे.

राज्यातल्या चारही मुख्य राजकीय पक्षांसाठी ही मोठीच खेदाची बाब ठरली आहे. जागावाटपाचा घोळ लवकर संपवला तर उमेदवारांना आपला मतदारसंघ नेमका कळेल आणि त्या त्या मतदारसंघातली तिकिटासाठीची साठमारी संपून उमेदवारांना आपला प्रचार सुरू करता येईल. पण तसे काही घडत नाही. अनेक उमेदवार किंवा इच्छुक अंधारात चाचपडत आहेत. आता एकदोन दिवसांत या बाबत वेगाने पावले टाकली जातील आणि निवडणूक ज्वर चढायला सुरूवात होईल, असे अजूनही वाटते. साधारणत: सत्ताधारी आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष यांचा विकास कामावर भर देण्याचा विचार आहे तर विरोधी महायुतीचा भर सत्ताधारी आघाडीच्या भ्रष्टाचारावर आहे. या निवडणुकीत आता एकच प्रश्‍न वारंवार विचारला जात आहे. लोकसभा निवडणुकीत होती तशी मोदी लाट आता शिल्लक आहे का? काही जाणकार सांगतात की मोदी लाट नाही. हे जाणकार खरोखरच किती जाणकार असतात यावर नेहमीच संशय व्यक्त करावा अशी स्थिती असते. आता मोदी लाट शिल्लक नाही असे म्हणणार्‍या या जाणकारांनी लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाट होती असे कधीच म्हटले नव्हते. म्हणजे ती लाट होती तेव्हा ती असल्याचे ज्यांना कळले नाही त्यांना आता ती शिल्लक नाही हे कसे कळले ? त्यांना आता मोदी लाट नाही असे वाटण्यासारख़े काय घडले आहे ? लाट ही एक अशी गोष्ट असते की ती आहे की नाही हे जो तो आपल्या सोयीनुसार सांगत असतो. आणि ज्यांना ती असायला हवी असे वाटते त्यांना ती आहे असे वाटते. तर ज्यांना ती असायला नको असे वाटते त्यांना ती नाही असे वाटते.

आता कॉंग्रेसचे नेते मोदी लाट वगैरे काही नाही असे ठामपणे सांगत आहेत तर भाजपा- सेना युतीचे नेते अजूनही लाट आहे असे ठासून सांगत आहेत. अशा वातावरणात काही लोक आपल्या स्वत:च्या समाधानासाठी काही नवी समीकरणे मांडत असतात. शरद पवार सध्या असेच समीकरण मांडून पराभवाच्या गर्तेत असलेल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धीर देत आहेत. १९९८ साली लोकांनी लोकसभेत वाजपेयी सरकारला निवडून दिले होते पण लगेच १९९९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत याच जनतेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या हातात सत्ता दिली. तसे आताही केन्द्रात जनतेने मोदी यांना निवडून दिले असले तरीही महाराष्ट्रात तसे होणार नाही. त्याच्या नेमके उलट होईल असे त्यांनी आपल्या अनुभवी मतानुसार प्रतिपादन केले आहे. पवारांचा अंदाज नीट तपासून पाहिला पाहिजे.

मुळात १९९८ साली जनतेने वाजपेयी यांच्या सरकारला फार अल्पमताने निवडून दिले होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला लोकसभेच्या केवळ १८२ जागा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र नव्हते. पवारांचा पक्ष वेगळा लढला होता. लोकांना विस्मरण होत असते पण आता त्यांना हे लक्षात आणून द्यावे लागेल की, १९९९ साली पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करून त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते आणि त्यावेळी त्यांनी बरीच कॉंग्रेस विरोेधी मते खेचली होती. अर्थात त्यांना या बंडातून काही सत्ता मिळत नाही असे लक्षात आले आणि त्यांनी लगेच सोनिया गांधी यांच्याशी तडजोड करून त्यांच्याच भागीदारीत सत्ता मिळवली. आता १९९९ सालच्या निवडणुकीचा हवाला देऊन काही उपयोग नाही. आता मोदी यांना वाजपेयी यांच्यापेक्षा तब्बल १०७ जागा जादा मिळाल्या आहेत. तो झंझावात आहे. तो निवडणुकीत कोणालाही कळला नव्हता.

महाराष्ट्रात महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा मिळतील असे कोणालाही वाटले नव्हते. तो झंझावात आता अजूनही कायम आहे. त्यात काही परिवर्तन यावे असे काहीही घडलेले नाही. मात्र कॉंग्रेसचे नेते आता मोदी लाट शिल्लक नाही असे म्हणत आहेत. एकवेळ आपण राज्यात मोदी लाट नाही असे त्यांचे म्हणणे वादासाठी खरे मानू या पण त्यामुळे स्थितीत काही फरक पडणार नाही. मोदी लाट असो की नसो पण महाराष्ट्रात या सरकारचे १५ वर्षांचे दु:शासन संपणार आहे. कारण मोदींची लाट नसली तरी या सरकारच्या विरोधातली एक जबरदस्त स्थानिक लाट राज्यात आहे. अशा वातावरणात ही निवडणूक जाहीर झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. सोनिया गांधी हे नावही कोठे वाचण्यात येईनासे झाले आहे. आपला पराभव झाला असला तरीही आपण नवा कार्यक्रम हाती घेऊन विरोधी पक्ष म्हणून राजकारण करायला तयार आहोत असे अजून तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना दाखवता आलेले नाही.

Leave a Comment