बीड जिल्ह्यातील गुंतागुंत

vidhan-sabha1
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक गुंतागुंतीचे राजकारण बीड जिल्ह्यात होणार आहे. कारण तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात कडो निकडीची झुंज होत आहे. १९७८ पूर्वी या जिल्ह्यामध्ये जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी यांना अजिबात स्थान नव्हते. कॉंग्रेसचे पूर्ण वर्चस्व होते आणि विरोधी पक्ष म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यरत होता. मात्र गोपीनाथराव मुंडे यांनी या जिल्ह्याचा रंग बदलला. माकपाच्या जागी भाजपाला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेस नेत्यांच्या बेदिलीचा फायदा घेऊन त्यांचेच लोक फोडून भारतीय जनता पार्टीला मोठे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या राजकारणाला अजित पवार यांनी चांगलाच शह दिला. गोपीनाथ मुंडे यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दूर गेले. त्यातले बहुसंख्य नेते राष्ट्रवादीत गेले तर काही नेते कॉंग्रेसमध्ये गेले. गोपीनाथ मुंडे यांना खरा राजकीय धक्का बसला त्यांच्या घरात. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले. त्यांच्या येण्याने गोपीनाथ मुंडे यांना मोठा धक्का बसला आणि त्याचे बक्षीस म्हणून ते विधानपरिषदेचे सदस्य झाले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांचे जिल्ह्यातले वर्चस्व कमी होत आले होते. त्यावर्षीची लोकसभेची निवडणूक त्यांनी व्यक्तिश: जिंकली, परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मोठाच सेटबॅक बसला. त्यांची कन्या पंकजा पालवे ही परळी-वैजनाथ या गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघातून कशीबशी निवडून आली. बाकीचे पाच मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाले. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपाला आणि गोपीनाथ मुंडे यांना किती त्रस्त केले होते हे लक्षात येते. आता गोपीनाथराव मुंडे हयात नाहीत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये म्हणावा तेवढा जोश राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला २००९ एवढा मोठा विजय मिळविता येईल की नाही, याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. आधीच तर मोदी लाट आहे आणि त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा खराब झाली आहे. त्यातच भर म्हणून गोपीनाथराव मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये एक सहानुभूतीची लाट आली आहे. ही लाट शरद पवार यांनीच मान्य केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदार संघाचीही पोटनिवडणूक होणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय सभेत शरद पवार यांनी या पोटनिवडणुकीत मुंडेंच्या कुटुंबियांपैकी कोणी उभे रहात असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते.

गोपीनाथराव मुंडे यांचा वारस म्हणून कोण पुढे येणार, असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यांची आमदार कन्या पंकजा पालवे ही वारस म्हणून जोरकसपणे पुढे आली आहेच. परंतु तिने खासदार होण्याच्या ऐवजी राज्याच्या राजकारणात राहण्याचे पसंत केले आहे. त्यानुसार ती विधानसभेच्या निवडणुकीला उभी राहील आणि तिची लहान बहीण प्रितम ही लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभी राहील असे दिसत आहे. तेव्हा प्रितम ही लोकसभेला उभी राहिल्यास आणि दिलेल्या शब्दानुसार पवारांनी उमेदवार न दिल्यास तिची निवड सोपी होणार आहे. मात्र पंकजा पालवे हिच्या विरोधात परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल, याच्या अटकळी रचल्या जात आहेत. सहानुभूतीची लाट आणि मोदी लाट या दोन्हींचा फायदा घेणार्‍या पंकजा मुंडेच्या विरोधात धनंजय मुंडे यांच्याशिवाय दुसरा कोणताही सक्षम उमेदवार नाही. तेव्हा परळीमध्ये धनंजय आणि पंकजा पालवे या बहीण-भावंडात मोठी चुरशीची निवडणूक होणार आहे.

बीड जिल्ह्यात या निवडणुकीत घडलेली एक महत्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रवादीचे नेते रमेश अडसकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रमेश अडसकर हे कै. बाबुराव अडसकर यांचे चिरंजीव आणि जिल्ह्याच्या राजकारणातले मोठे प्रस्थ आहेत. त्यामुळे त्यांना माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरुद्ध उभे केले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ती निवडणूक मोठी चुरशीची होईल. या जिल्ह्यातील अष्टीचे आमदार राष्ट्रवादीचे श्री. सुरेश धस हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मात्र त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे किंवा साहेबराव दरेकर यांना उभे केले जाण्याचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास सुरेश धस यांची निवडणूक म्हणावी तशी सोपी जाणार नाही. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोपे जाणारे दोन मतदारसंघ म्हणजे गेवराई आणि बीड. गेवराईचे आताचे आमदार बदामराव पंडित आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात शिवसेनेचे सक्षम उमेदवार उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दोघांची निवडणूक सोपी आहे. या जिल्ह्यातला आणखी एक गाजलेला मतदारसंघ म्हणजे केज मतदारसंघ. या मतदारसंघातून पूर्वी भाजपाच्या डॉ. विमल मुंदडा या निवडून येत असत. त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या आणि त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होऊन कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला. आता पुन्हा त्यांनाच तिकीट मिळाले तरी त्यांची निवडणूक सोपी नाही. म्हणजे या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट आहे तशी राहिली आणि मुंडे लाट वाहिली तर भाजपाला सहापैकी चार जागा मिळू शकतात.

Leave a Comment