उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची बाजी

vidhan-sabha1
उस्मानाबाद हा मराठवाड्यातला सर्वात उपेक्षित जिल्हा. या जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांची प्रचंड मोडतोड करून ती संख्या अवघी चारवर आणण्यात आली आहे. त्यामुळे लोकांत तशी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता फार मर्यादित झाली आहे. या चारात एक उमरगा मतदारसंघ राखीव आहे. राज्याचे माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटचे सहकारी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा उस्मानाबाद हा मतदारसंघ या चारात सर्वात चुरशीने लढवला जाण्याची शक्यता आहे. डॉ. पद्मसिंह पाटील हे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रा. रवीन्द्र गायकवाड यांच्याकडून तब्बल दोन लाख २७ हजाराच्या मताधिक्याने पराभूत झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातले वातावरण पार बदलून गेले आहे. या जिल्ह्यातले उमरगा(राखीव) आणि उस्मानाबाद हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. तर परंडा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यातली चौथी जागा तुळजापूर ही कॉंग्रेसकडे आहे. या मतदारसंघातून राज्याचे दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण हे निवडून आले आहेत. त्यांचे या मतदारसंघात वर्चस्व आहे आणि कितीही मोठी मोदी लाट आली असली तरीही चव्हाण यांना पराभूत करणे फार अवघड आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात डॉ. पद्मसिंह पाटील हे १९७८ पासून सतत निवडून येत गेले आहेत. त्यांना या मतदारसंघात कोणी आव्हान देऊ शकणार नाही असे मानले जात होते. पण त्यांनी आपल्याच हाताने ते निर्माण केले. त्यांनी पवनराजे राजे निंबाळकर या आपल्या नातेवाईकाचा आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्याचा काटा काढला असा त्यांच्यावर आरोप आहे. या घटनेने पवनराजे यांच्या कुटुंबाविषयी जिल्ह्यात सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर हे निवडून आले. त्यांनी शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यामुळे पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्वही संपले आणि शिवसेनेला उस्मानाबाद ही जागा मिळाली. त्यांनी जिल्हा परिषद आणि तेरणा साखर कारखाना या दोन संस्थानांवरही भगवा फडकवला आहे. आता कारखाना बंद पडल्याने त्यांचा प्रभाव कमी झाला असल्याचे मानले जाते पण त्यांना राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडे तगडे स्पर्धक नाहीत.

तुळजापूर मतदारसंघाला उस्मानाबाद तालुक्यातली ७० गावे जोडली आहेत. आता तिथे आमदार असलेले मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूर तालुका अनुकूल आहे पण उस्मानाबादची १० गावे या मतदारसंघातली हवा बदलू शकतात. त्या गावांच्या जोरावर निवडणुकीचे पारडे फिरवण्याची क्षमता असलेला तगडा उमेदवार शिवसेना आणि भाजपा या दोघांकडेही नाही. गेल्या निवडणुकीत सोलापूरचे भाजपाचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी चव्हाण यांना जेरीस आणले होते. पण आता देशमुख या मतदारसंघात येणार नाहीत कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत एक चूक केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करून उभे केले होते. त्याची अनामत रक्कम जप्त झाली. तेव्हापासून या जिल्ह्यातले भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांनी तुळजापुरात आपली उमेदवारी जाहीर केलीच तर त्यांना या नाराज कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध होईल. या सगळ्या राजकारणा मुळे कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे तुळजापुरात स्वस्थ आहेत. तूर्त तरी त्यांना धोका नाही.

या जिल्ह्यातला उमरगा हा मतदारसंघ शिवसेनेने दोन वेळा जिंकलेला आहे पण आता त्याची तोडफोड करण्यात आली आहे. या मतदारसंघातली काही गावे लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघाला जोडली आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचे राजकारण बदलले आहे. मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे पुन्हा निवडून येऊ शकतात. राहता राहिला चौथा मतदारसंघ परंडा. ज्यात आता राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे आमदार आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. शिवशंकर बोरकर हे ते पराभूत उमेदवार आहेत. ते या तालुक्याशी नित्य संपर्कात नसतानाही उभे होते. पराभूत झाले. १९९५ साली या मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानेश्‍वर पाटील हे विजयी झाले होते. त्यांना हा तालुका राखता आला नाही. हा मतदारसंघ आता भाजपाला सोडावा अशी भाजपातून मागणी होत आहे. तसे झाल्यास भाजपाला हा मतदारसंघ अनुकूल होईल असे अंंदाज आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेेना आणि भाजपा यांच्यातल्या जागावाटपात भाजपाला एकही जागा मिळालेली नाही आणि या दोन पक्षांची युती झाल्यापासून हा प्रकार आहे. गेल्या निवडणुकीत तुळजापुरात शिवसेनेत मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार भाजपात होता म्हणून ही जागा भाजपाला सुटली होती. आता ती सुटते की नाही यावर वाद आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यातल्या किमान दोन मतदारसंघात तरी आघाडीचे आमदार निवडून येतील. शिवसेनेचे दोन आमदार निवडून येतील असे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment