
इस्लामाबाद – प्राईड ऑफ पाकिस्तान म्हणून ओळख असलेल्या मलाला युसुफझाई हिच्यावर गोळ्या झाडून तिला गंभीर जखमी करणार्या दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याचे पाकिस्तान संरक्षण दलाच्या प्रेस विभागाचे प्रमुख असीम बाजवा यांनी जाहीर केले आहे. मलालावर हल्ला केल्याप्रकरणी १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून ते सर्व तहरिक ए तालिबान संघटनेशी संबंधित आहेत.
मलाला युसुफझाईचे हल्लेखोर पकडले गेले
मिळालेल्या माहितीनुसार या दहा जणांच्या व्यतिरिक्त आणखी २२ संशयितांचा शोधही घेतला जात आहे. या दहा जणांवर खटला दाखल केला जाणार आहे. मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी झटणार्या मलाला या १५ वर्षीय युवतीवर या दहशतवाद्यांनी शाळेत जात असताना हल्ला करून तिच्या डोक्यात जवळून गोळ्या घातल्या होत्या. गंभीर जखमी मलाला हिला पुढील उपचारांसाठी ब्रिटनला नेले गेले आणि ती अजूनही तेथेच राहते आहे. पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीने आणि वारंवार मिळत असलेल्या धमक्यांमुळे ती पाकिस्तानला परतू शकत नाही.
मात्र या हल्ल्यानंतर मलाला जगभरातील दहशतवादी विरोधी लढाईचे प्रतीक बनली आहे. तिला युरोपिय मानवाधिकार पुरस्काराने गौरविले गेले आहे तसेच शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी तिला नामांकनही दिले गेले होते.
