नंदनवनातील ८ हजार कोटींचा सफरचंद व्यवसाय धोक्यात

safarchand
जम्मू काश्मीर – गेले कांही दिवस पुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या जम्मू काश्मीर राज्यातील सफरचंद उद्योगालाही चांगलीच झळ बसली आहे. सफरचंद उद्योगात या राज्यातील सुमारे ६० टक्के लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या जोडलेले आहेत. पुरामुळे हा ८ हजार कोटींचा व्यवसाय बरबाद झाला आहे.

जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा सफरचंद व्यवसाय हा मुख्य कणा मानला जातो. दरवर्षाला या उद्योगाची उलाढाल ८ हजार कोटींच्या जवळपास असते. दरवर्षी येथून साधारणपणे १६ लाख मेट्रीक टन सफरचंद उत्पादन होते. म्हणजे हे उत्पादन साधारणपणे १५ कोटी पेट्या इतके असते आणि प्रतिपेटी त्याला १२०० रूपयांपर्यंत दर मिळत असतो. बाजारतज्ञांच्या मते यंदाच्या जीवघेण्या पुरामुळे व्यवसायाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. हा पूर ऐन सफरचंद काढणीच्या काळात आला असल्याने नुकसानाचा आकडा मोठा आहे.

या व्यवसायात सफरचंद उत्पादक शेतकर्‍यांबरोबरच ट्रान्स्पोर्ट करणारे, बागेतील मजूर, फळांचे सॉटिंग करणारे, पॅकेजिंग करणारे, होलसेलर, रिटेलर, सफरचंदांपासून अन्य उत्पादने बनविणारे असे अनेक लोक जोडलेले आहेत. त्या सर्वांनाच या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सोसावा लागणार आहे. शिवाय देशाच्या बाजारात सफरचंदाचा पुरवठा घटणार असल्याने भाववाढ होण्याची शक्यताही आहे.

Leave a Comment