
मुंबई – आज सत्र न्यायालयात हिट अँड रनप्रकरणी गहाळ झालेली मूळ कागदपत्रे आणि केस डायरी सापडली असून संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली. तसेच अभिनेता सलमान खानवरील हा खटला २४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तांकडे गहाळ कागदपत्रांची चौकशी झाली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आल्याचे यावेळी न्यायालयात सांगण्यात आले.
२४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार सलमानवरील खटला
सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात साक्ष दिलेल्या साक्षीदारांची गहाळ झालेली ६३ मूळ कागदपत्रे आणि केस डायरी सादर करण्यात आली. मात्र या कागदपत्रांत रिजवान या साक्षीदाराच्या जवाबाची प्रत नसल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. पोलिसांच्या ताब्यातून गहाळ झालेल्या या कागदपत्रांची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजीराव कोलेकर यांनी केली असून चौकशीचा अहवाल मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना सादर करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे वांद्रे पोलिस ठाण्यात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.
