राष्ट्रवादी सुप्रीमो नाही करणार राहुल प्रचार

sharad-pawar
मुंबई – राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात अद्याप वैचारिक जुळणी झालेली नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शरद पवार हे राहुल गांधी यांच्यासोबत एका व्यासपीठावर येणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्पष्टपणे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखेरच्या सभेत शेवटच्या क्षणी पवारांनी उपस्थित राहण्याचे टाळले होते. या सभेला सोनिया गांधी येणार होत्या. मात्र तब्येत बरी नसल्याने ऐनवेळी त्यांच्याऐवजी राहुल गांधींनी या सभेला संबोधित केले. परंतु हे समजताच आपल्याला या सभेला राहुलशेजारी बसावे लागेल ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या पवारांनी अखेर सभेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत तरी पवार राहुल गांधींच्या सोबत प्रचार करत सारा महाराष्ट्र पिंजून काढण्याची शक्यता वर्तविली जात असताना राष्ट्रवादीने मात्र, ती साफ फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात सांगितले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते त्यांच्या समकालीन किवा ज्येष्ठ अशा कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत प्रचार करतील. राहुल गांधींसोबत राष्ट्रवादीचे युवा नेते असतील. यात काही गैर नाही. पवारांची ही पहिल्यापासूनची भूमिका आहे.

Leave a Comment