कोल्हापूर जिल्हा कोणाकडे ?

vidhansabha
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात या विधानसभा निवडणुकीत फार चुरस दिसून येणार आहे. राज्यात मोदी लाट असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात या लाटेविषयी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत म्हणावी तशी भीती नाही. कारण या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत राट्रवादी कॉंग्रेसने मोदी लाट अडवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या चार जागांत कोल्हापूर ही एक जागा आहे. या जागेवर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते फॉर्मात आहेत. या विजयाच्या जोरावर त्यांनी आता कॉंग्रेसशीही मस्ती करायला सुरूवात केली आहे. या विधानसभा निवडणुुकीत आता कॉंग्रेसने आपल्याला जादा जागा सोडल्या पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेसकडे केली आहे कारण त्यांनी मोदी लाट अडवून लोकसभेची जागा मिळवली आहे. या जिल्हयात राष्ट्रवादीचे नेते म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. ते राज्याच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री आहेत आणि कागल मतदारसंघातून निवडून आले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही जिंकून दाखवलेली जागा म्हणून राष्ट्रवादीचे नेते या मतदारसंघाकडे विजयी मतदारसंघ म्हणून पहात आहेत आणि येत्या १६ तारखेला तिथे मोठा मेळावा घेऊन निवडणूक प्रचाराला सुरूवात करण्याचा त्यांचा मानस आहे. या मेळाव्याची जाहीरात करतानाच हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीला जादा जागा सोडाव्यात अशी मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला तीन जागा देण्यात आल्या होत्या पण त्या तिनही जागा आपण जिंकल्या. कॉंग्रेसने मात्र सात जागा लढवून केवळ दोन जागा जिंकल्या. उर्वरित पाच जागांपैकी भाजपा आणि जनसुराज्य पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. आपण लढवल्या त्या तिन्ही जागा जिंकल्या असल्याने आणि लोकसभेचीही निवडणूक जिंकली असल्याने कॉंग्रेसने आता आपल्यासाठी किमान सहा जागा सोडाव्यात आणि स्वत: चार जागा लढवाव्यात अशी मुश्रीफ यांनी मागणी केली आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या आक्रमक धोरणातूनच या मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच आधी संघर्ष पेटणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीने चार जागा जिंकल्या होत्या. त्यांचा आता जास्त जागा जिंकण्याचा निर्धार आहे. हे चित्र पाहिल्यानंतर आश्‍चर्य वाटते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांत या जिल्ह्यात शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता. प. महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यात भाजपा- सेना युतीचे स्थान नगण्य होते.

प. महाराष्ट्र हा भाग युतीसाठी नाहीच, त्यांनी अन्य भागांत जास्त जागा मिळवल्या तरच त्यांना राज्यात काही स्थान मिळवून सत्ता प्राप्त करण्याची संधी मिळेल, त्यांनी या चार जिल्ह्यात शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये असे कॉंग्रेसचे नेते बजावत असत. एवढे या भागात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. पण १९९० साली सोलापूर शहरातल्या उत्तर सोलापूर मतदारसंघात भाजपाचे लिंगराज वल्याळ हे निवडून आले. प. महाराष्ट्रातले ते पहिले भाजपा आमदार ठरले. नंतर स्थिती सुधारत गेली पण १९९० च्या पार्श्‍वभूमीवर ा भागाचा विचार केला तर कॉंग्रेसची किती घसरण झाली आणि भाजपा-सेना युतीचे प्राबल्य कसे निर्माण झाले हे लक्षात येईल. आता कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीतल्या विजयाच्या जोरावर कितीही बढाया मारत असले तरीही लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाचे विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र पाहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फार आनंद मानावा अशी स्थिती नाही. कारण या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघाशी निगडित असलेल्या विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीला फार मोठे मताधिक्य मिळालेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातले शिरोळ, इचलकरंजी, हातकंणगले आणि शाहूवाडी-पन्हाळा हे चार विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात. या चारही विधानसभा निवडणुकांत महायुतीतल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडून आले आहेत आणि त्यांनी या चारही मतदारसंघात मताधिक्य मिळवलेले आहे. उर्वरित सहापैकी तीन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महडिकांना आघाडी मिळाली आहे तर उर्वरित तीन मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेले आहे. याचा अर्थ या मतदारसंघात राष्ट्रवादीचेही प्राबल्य फार निर्विवाद नाही. या मताधिक्क्याचा विचार केला तर येत्या निवडणुकीत महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सात जागा मिळवता येतात तर राष्ट्रवादीला फार तर तीन जागा मिळू शकतात. हे गणित लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावरून मांडले आहेे. कॉंग्रेसचे सतेज पाटील हे मातबर उमेदवार आहेत आणि त्यांना पराभूत करणे अवघड आहे. या मतदारसंघासह पूर्ण जिल्हयातल्या उमेदवारांवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातही काही कमी वाद नाहीत पण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या मानाने हे वाद कमी आहेत. एकंदरीत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत झाली तरी ज्या ठिकाणी त्यांना काही आशा आहेत अशा ठिकाणात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करावा लागेल.

Leave a Comment