धांगडधिंगा कमी होईल का?

dj
गणपती विसर्जनाच्या मिरवणुका संपल्यानंतर सातार्‍यामधून चिंताजनक बातमी आली. तिथे एका मिरवणुकीतील डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे एका जुन्या घराची भिंत कोसळली आणि तिच्याखाली सापडून तिघांचा मृत्यू झाला. सर्वांना विचार करायला लावणारी ही घटना आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या मिरवणुका यातील उत्साह हा स्वागतार्हच असतो. परंतु उत्साहाचे रुपांतर हुल्लडबाजीत व्हायला लागले की, चिंता वाटायला लागते आणि ही हुल्लडबाजी थांबवली पाहिजे असे सुचवावेसे वाटते. हुल्लडबाजी कायद्याने संपेल का, हा एक प्रश्‍न आहे. पण ती कायद्याने पूर्णपणे थांबू शकत नाही. कायद्याबरोबरच प्रबोधनाचीही गरज असते. या प्रबोधनाची फार आवश्यकता असल्याचे आता जाणवायला लागले आहे. कारण काही अनावश्यक गोष्टी घडताना दिसतात. राज्यातल्या काही ठिकाणच्या विसर्जनाच्या मिरवणुका प्रदीर्घ काळ चालल्या. त्या एवढा वेळ चालतात आणि त्यात आवाजाचा धुमधडाका असतो. काही ठिकाणच्या मिरवणुका तर एकविस तास चालल्या असे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

गणेश उत्सवाचे कितीही कौतुक करायचे ठरवले तरीही या प्रदीर्घ काळ चालणार्‍या मिरवणुकांचे समर्थन करता येत नाही. हा उत्सव नसून धांगडधिंडा आहे. त्याला आळा घालण्यास कोणीच पुढे धजावत नाही ही आपली सांस्कृतिक शोकांतिका आहे. आता आता तर एक वेगळे दृश्य समोर यायला लागले आहे. गणेशोत्सवात गणपती मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपेक्षा विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या, दीर्घकाळ चालणार्‍या आणि प्रचंड प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करणार्‍या ठरत आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण अधिक होऊ नये याबाबत सरकार जागरूक झाले आहे. पण सगळ्याच ठिकाणी त्याची अंमलबजावर्णंी होत नाही. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जनाच्या आणि प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांमध्ये अधिक तीव्र आवाजाचे डी.जे. लावले जाऊ नयेत याबाबत काही नियम करण्यात आले आहेत. एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज केल्यास कारवाई केली जाईल, असे इशारे देण्यात आले आहेत. कारण फार तीव्र स्वरूपाचे आवाज काढले तर कानाचे पडदे फाटू शकतात. काही प्रकारच्या आवाजांनी तर कायमचे बहिरेपण येऊ शकते. हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍या आणि रक्तदाबाच्या रुग्णांना मोठ्या आवाजाने फार त्रास होत असतो. खरे म्हणजे गणेश मंडळांनी स्वत:हूनच या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्या मिरवणुकातील आवाजांवर स्वत:च नियंत्रण ठेवायला पाहिजे. पण तेवढे भान राहिलेले नाही आणि त्यामुळे सरकारला यावर लक्ष ठेवावे लागत आहे.

सुदैवाची एक गोष्ट अशी की, पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवले तर हा दणदणाट कमी होऊ शकतो. यंदा तसा काही ठिकाणी झालाही आहे. तो प्रामुख्याने मुंबईमधल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये दिसून आला आहेे पण बाकीच्या शहरांत तसे झालेले नाही. मुंबईत किती तीव्रतेचे डी.जे. लावले गेले याच्या नोंदी ठेवण्यात आल्या असून त्यांच्यानुसार यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दणदणाट झाला आहे. अर्थात कोणी तरी लक्ष ठेवतेय म्हणून हे पथ्य पाळले गेले आहे. आवाज फौंडेशन नावाच्या स्वयंसेवी संघटनेने मुंबई शहरात विसर्जन मिरवणुकांतील आवाजाच्या तीव्रतेच्या नोंदी केल्या आहेत. त्यांच्यानुसार या मिरवणुकांत जास्तीत जास्त तीव्र आवाज करणार्‍या मिरवणुकांमध्ये कमाल ११४ डेसीबल एवढा आवाज केला गेला. गतवर्षी ही तीव्रता कमाल १२३ डेसीबल एवढी होती. पण यंदा मात्र त्यात घट झाली आहे. याच वेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नोंदी केल्या असून त्यांच्या नोंदीनुसार कमाल ध्वनीची तीव्रता ९९ डेसीबल एवढी होती. गतवर्षी ती १०० डेसीबल नोंदली गेली होती.

एकंदरीत यावर्षी एक डेसीबलने का होईना पण आवाजाची कमाल तीव्रता कमी झाली आहे. या दोन यंत्रणांनी केलेल्या नोंदीमध्ये मात्र फरक आहे. त्यातल्या खर्‍या नोंदी कोणाच्या आणि जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध नोंदी कोणत्या याचा निर्णय करता येत नाही. परंतु आपण एवढेच म्हणू शकतो की, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत गणेश मंडळांमध्ये थोडी जागरूकता निर्माण झाली आहे आणि यावेळी ९९ ते ११४ डेसीबल या दरम्यान कोठे तरी कमाल तीव्रतेचा आवाज होता. मुंबईमध्ये अशा प्रकारच्या नोंदी तरी केल्या गेल्या, पण राज्याच्या बाकी शहरांमध्ये काय परिस्थिती होती याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते आणि त्या आवाजाची तीव्रता मोजण्याची सोय काही गावा गावांमध्ये उपलब्ध नव्हती. काही ठिकाणी आवाजाच्या तीव्रतेचे निर्बंध झुगारले गेले आणि संबंधित यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सातार्‍या-मध्ये यामुळे मोठी विपरीत घटना घडली. मुंबईमधल्या आवाजाची तीव्रता १०० च्या पुढे गेली नाही, परंतु सातार्‍यात मात्र १६० डेसीबल पर्यंतचा दणदणाट केला गेला. एवढ्या तीव्र आवाजाने कानाचे पडदेच नव्हे तर आसपासचे वातावरण सुद्धा विचलित होते. सातार्‍यामध्ये राजवाडा चौकाच्या परिसरात एका जुनाट इमारतीची खचलेली आणि पडायला आलेली भिंत या आवाजाच्या तीव्रतेने कोसळली. तिच्या अवशेषाखाली सापडून तिघे मरण पावले आणि मिरवणुकीतले सहा जण जखमी झाले. हा प्रकार पाहिल्यानंतर तरी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाजाच्या तीव्रतेचे परिणाम कळतील अशी आशा करू या.

Leave a Comment