आर आर आबा संकटात

r-r-patil
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून ज्यांचा गवगवा केला जातो ते आर. आर. पाटील आपल्या मतदारसंघात नेहमीच संकटात असतात. कारण त्यांच्या तासगाव तालुक्यात एकमुखी वर्चस्व नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर किंवा शरद पवार यांच्या वजनावर ते थोड्याबहुत मताधिक्क्याने तिथून निवडून येत असतात. अर्थात अशा पद्धतीने का होईना ते १९८९ सालपासून सातत्याने निवडून येत गेले आहेत. यावेळी त्यांची अवस्था थोडी वाईट झालेली आहे आणि त्यांची जागा धोक्यात आलेली आहे. त्यांच्याच तासगाव मतदारसंघाचा समावेश असलेल्या तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात त्यांच्या विरोधात मातबर उमेदवार उभा करून त्यांना पराभूत करण्याची फिल्डिंग लावली जात आहे. सर्वांनीच या मतदारसंघाला लक्ष्य करायचे ठरवले आहे. म्हणून १३ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी सभा तासगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नितीन गडकरी उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत श्री. अजित घोरपडे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत आणि तेच बहुतेक करून आर. आर. आबांच्या विरोधातील उमेदवार असणार आहेत.

आर. आर. पाटील यांना आव्हान देणारे अजित घोरपडे हे भाजपामध्ये येणार आहेत, ते तसे कॉंग्रेसशी जवळीक असलेले, परंतु अधूनमधून बाहेर पडून कधी कॉंग्रेस, कधी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर कधी अपक्ष असे निवडणुका लढवत आलेले आहेत. १९९५ च्या भाजपा-सेना युतीच्या सरकारला पाठींबा दिलेल्या अपक्ष आमदारांत त्यांचा समावेश होता आणि ते त्याकाळी राज्यमंत्री होते. आता ते भाजपात येणार आहेत, पण तासगाव मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे आहे. तेव्हा अजित घोरपडे आर.आर. आबांना आव्हान देणार तरी कसे, असा प्रश्‍न आहे. मात्र सांगली जिल्ह्यातली शिराळ्याची जागा भाजपा शिवसेनेला देईल आणि शिवसेना तासगावची जागा भाजपाला देईल अशा आदलाबदलीत तासगाव भाजपाकडे येऊन आर.आर. आबा आणि अजित घोरपडे यांची लक्षणीय लढत होईल, अशी शक्यता आहे. आर. आर. आबांना भाजपाने खासकरून लक्ष्य करायचे ठरवले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे मंत्री पराभूत होण्याची अधिक शक्यता वाटते त्यात आर. आर. आबा आघाडीवर आहेत. तेव्हा या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आघाडीचा एक प्रतिष्ठित मंत्री पाडल्याचे श्रेय आपल्याला मिळावे असा भाजपाचा डाव आहे. आर.आर. पाटील निसटत्या मताधिक्क्याने निवडून येत असतात.

पुण्याच्या एका जाहीर सभेत तर अजित पवार यांनी आर. आर. पाटलांची याबद्दल टिंगल केली होती. आम्ही कसे प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतो तसे तुम्ही का येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी आर. आर. पाटलांना लक्ष्य केले होते. शिवाय याच सभेत आर.आर. पाटलांच्या तंबाखू खाण्यावरून त्यांची चेष्टाही केली होती. आबांनी ही चेष्टा सहन केली नाही आणि थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. अलीकडे तर अजित पवार यांनी आर.आर. पाटलांचा उल्लेख तो बुटका माणूस अशा शब्दात केला. त्यालाही आबांनी उत्तर दिले. कोणी विचाराने उंच असतो तर कोणी शरीराने उंच असतो, असे त्यांचे उत्तर अजित पवारांना झोंबणारेच होते. त्यामुळे त्यांना काही प्रत्त्युत्तर देता आले नाही. मात्र अजित पवारांच्या तोंडाळपणाला आर.आर. आबा उत्तर देत असतात याचा पवारांना राग असतो. म्हणून अजित पवार आर.आर. पाटलांना पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. पुढे चालून मुख्यमंत्रीपद मिळवायचे असेल तर आपल्याला आर.आर. पाटलांंशी स्पर्धा करावी लागेल याची जाणीव अजित पवारांना आहे. त्यामुळेही त्यांची माणसे आर.आर. पाटलांच्या विरोधात छुपा प्रचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर. आर. पाटलांना जयंत पाटील यांचाही विरोध असतो. गेल्या निवडणुकीत तर जयंत पाटील यांनी त्यांच्या विरोधात आपला माणूस उभा केला होता आणि आबांना पाडण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीत हा विषय निघाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा स्टार प्रचारक कोण, असा प्रश्‍न विचारला असता, सर्वांनी आर.आर. पाटील हेच उत्तर दिले. पण आर.आर. प्रचाराला जायला तयार नव्हते. कारण ते आपल्या मतदारसंघात संकटात होते. त्यांनी प्रचाराला जायचे कबुल केले, पण आपल्या मतदारसंघात निवडून आणण्याची खात्री पवारांनी द्यावी अशी अट घातली. त्या अटींमुळे आर. आर. प्रचारक म्हणून फिरले आणि शरद पवारांनी त्यांना तासगावमधून निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकली. आता तशी स्थिती नाही. जयंत पाटील आणि अजित पवार आर. आर. पाटलांना पाडण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यांचा फायदा अजित घोरपडे घेऊ शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील निवडून आले आहेत. त्यांनी कै. वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव केला आहे. तासगाव मतदारसंघात त्यांनाच लीड मिळालेला आहे. एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आर.आर. पाटील संकटात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे राजकारण संपविण्यास टपलेले आहेत.

Leave a Comment