शिरच्छेदात सौदीने आयएसआयएसला टाकले मागे

isis
दुबई – अत्यंत निर्दयपणे माणसांची मुंडकी उडविणार्‍या आणि क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या इराक आणि सिरीयात उच्छाद मांडलेल्या आयएसआयएस संघटनेचा जगभरातून धिक्कार केला जात आहे. मात्र प्रायव्हेट आय वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार माणसांची डोकी उडविण्यात या संघटनेला सौदी सरकारने मागे टाकले आहे.

अमेरिकन पत्रकार जेम्स फोले याला या दहशतवादी संघटनेने नोव्हेंबर २०१२ मध्ये बंधक बनविले होते व त्यानंतर २१ महिन्यांनी त्याचा शिरच्छेद केला गेला. याच काळात सौदीमध्ये ११३ जणांना शिरच्छेदाची शिक्षा दिली गेली. अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार २०१३ सालात सौदीत ७९ जणांची डोकी उडविली गेली तर १८ ऑगस्ट २०१४ पर्यत ३४ जणांना याच पद्धतीने ठार केले गेले आहे. विशेष म्हणजे या शिक्षा सार्वजनिक ठिकाणी दिल्या जातात. रियादच्या चॉपचॉप चौकात अशा शिक्षा दिल्या जातात.

सौदीत देवाची निंदा करणे, अमली पदार्थ तस्करी, राजद्रोह, व्याभिचार यासाठी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा अथवा शिरच्छेदाची शिक्षा दिली जाते. ऑगस्टमध्ये सर्वाधिक शिरच्छेद केले गेले असून १५ दिवसांत १९ जणांना ही शिक्षा दिली गेली आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटन हे बलाढ्य देश त्याविषयी कांहीही बोलत नाहीत. सौदीतून होणारा तेल पुरवठा कायम राहावा आणि या देशाशी संबंध बिघडू नयेत अशीच काळजी हे दोन्ही देश घेतात. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याच वर्षात सौदीचे राजे अब्दुल्ला याची भेट घेतल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.