राष्ट्रवादीत नैराश्य

sharadpawar
राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रचाराचा शुभारंभ करणारी सभा काल पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागलेली आहे. आधीच तर पक्ष भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे, त्यातच ही गळती लागल्यामुळे पक्षात मोठे नैराश्याचे वातावरण आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पक्षातून बाहेर पडणार्‍यांवर तोंडसुख घेत आहेत. त्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत. परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचे हे परिणाम आहेत. खरे म्हणजे आपल्या पक्षातून कोणी तरी बाहेर पडत आहे ही गोष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी तरी दु:खाची किंवा वेदनेची असता कामा नये. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षच मुळात पवारांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून स्थापन केलेला आणि अनेक पक्षातले छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करून वाढवलेला पक्ष आहे. तेव्हा ज्या पक्षाचा धर्मच फुटणे, गद्दारी, पक्षांतर हा आहे त्या पक्षाच्या कोण्या नेत्याने आपल्या पक्षातून कोणी बाहेर पडले म्हणून हाय हाय करावी हे काही योग्य नाही. पण तरी सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या नारळ फोडण्याच्या प्रचार सभेत डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. अर्थात तसे लक्ष्य करून कोणावरही टीका करण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाही. अर्थात नैतिक या शब्दाशीच त्यांचा काहीच संबंध नाही.

राष्ट्रवादीबरोबरच अन्यही पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. आपापल्या परीने युक्तीवाद मांडून आणि युक्तीवाद संपतात तिथे जातींचा आधार घेऊन जो तो पक्ष प्रचाराला वेग देत आहे. माननीय शरद पवार हे जुने-जाणते चाणाक्ष नेते आहेत पण त्यांना आता नेमकी कोणती दिशा पकडावी याबाबत विलक्षण संभ्रम पडलेला आहे. गेली अनेक वर्षे संघ, हिंदुत्व आणि ब्राह्मण यांच्याविषयी थेट किंवा अप्रत्यक्षपणे द्वेष निर्माण करून त्यांनी मतांची बेगमी केलेली आहे. या मुद्यांवरून जनतेची दिशाभूल करून सत्ता प्राप्त केलेली आहे. मात्र हाती आलेली सत्ता त्यांना नीट सांभाळता आलेली नाही. त्यामुळे शरद पवार हे निवडणुकांमध्ये कधीच यशस्वी झालेले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तीन वेळा मिळवले, पण त्यांनी सातत्याने पक्षबदलूपणा केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणूक झाली आहे असे एकदाच घडले आहे. पण त्यांनी फोडाफोडी करून आणि टोपी बदलून चार वेळा मुख्यमंत्रीपद प्राप्त केले आहे. एका इंग्रजी साप्ताहिकाने पवारांच्या राजकीय कारकिर्दीतला हा एक लपून राहिलेला पैलू नुकताच प्रकट केला आहे. त्यावर नजर टाकल्यास पवारांचा संधीसाधूपणा उघड होतो. शरद पवार १९७८ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली झाली नव्हती. वसंतदादांच्या नेतृत्वाखाली ती झाली होती आणि दादा मुख्यमंत्री झाले होते. पवारांनी मात्र त्यांच्या सरकारमध्ये फाडाफोड करून मुख्यमंत्रीपद मिळवले होते.

पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बरेच नेते आता भाजपामध्ये येत आहेत. ज्या संघ परिवाराच्या द्वेषावर आपल्या राजकारणाची इमारत उभी केली त्याच पक्षात आपले कार्यकर्ते जात आहेत हा आपल्यावर काळाने उगवलेला एक चांगलाच सूड आहे याची जाणीव होऊन पवार अस्वस्थ झाले आहेत आणि चिडून जाऊन त्यांनी आपल्या राजकारणातले संघद्वेषाचे जुने अस्त्र बाहेर काढले आहे. आपल्या पक्षातून गेलेले ते सारे नेते खाकी चड्डीत कसे दिसतात हे आपल्याला बघायचे आहे असे ते उपरोधाने म्हणत आहेत. पण पवारांना अर्धी खाकी चड्डी तशी काही नवीन नाही. आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले तेव्हा आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या पाठीत खंजीर खुपसून अर्ध्या चड्डीवाल्यांचीच मदत घेतली होती. आता या घटनेला ३६ वर्षे झाली आहेत. परंतु जनतेचा स्मरणशक्तीशी छत्तीसाचा आकडा असतो हे पवारांना चांगले माहीत आहे. म्हणून ते आता अर्ध्या चड्डीचा असा उपरोधाने उल्लेख करत आहेत. पण १९७८ सालच्या त्या पवारांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची माहिती अजून सगळ्यांच्या विस्मरणात गेलेली नाही.

पवारांचे हे पहिले मुख्यमंत्रीपद असे संघाच्याच आशिर्वादानेच प्राप्त केले होते. १९८० साली कॉंग्रेसने अंतुुलेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता प्राप्त केली. १९८५ साली शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने निवडणूक जिंकली आणि १९८६ साली त्या सत्तेवर शरद पवार ‘आयत्या बिळावर नागोबा’ म्हणून बसले. १९९० सालच्या निवडणुका मात्र पवारांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि त्यात कॉंग्रेसला निसटते बहुमत मिळाले. एवढी एकच निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकली गेली. १९९५ साली त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली, तिच्यात त्यांचा पराभव झाला आणि भाजपा-सेना युती सत्तेवर आली. नंतर १९९९, २००४ आणि २००९ या तिन्ही निवडणुकांत पवारांनी कॉंग्रेसशी हातमिळवणू करून तत्वाला मुरड घालून सत्ता मिळवली. आता पवार चौथ्यांदा सत्ता मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत आहेत. परंतु त्यांना त्याविषयी पूर्ण खात्री नाही. म्हणून ते शेवटचा उपाय म्हणून आपली जुनी हत्यारे पुन्हा बाहेर काढत आहेत. पण राज्यातले जुने वातावरण बदलले आहे. पवारांचा जमाना संपलेला आहे. त्यांचा जमाना होता तेव्हाच त्यांना कधी यश मिळाले नाही, आता कोठून मिळणार आहे? आजवर ज्यांच्याशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली तो कॉंग्रेस पक्षच आता पराभवाच्या खोल गर्तेत सापडलेला आहे.