युतीचा पाया ढासळला

yuti
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एक दिवसाचा मुंबईचा दौरा केला आणि दौर्‍याच्या शेवटी या दोन पक्षातली युती अभंग आहे अशी ग्वाही दिली. ही युती अभंग असल्याची ग्वाही द्यावी लागते याचाच अर्थ युतीचा पाया ढासळला आहे असा होतो. अमित शहा यांनी स्वत:हून मातोश्रीवर जावे की निमंत्रण आल्यानंतरच जावे यावरून डावपेच झाले, पोस्टरबाजी झाली. याचाच अर्थ असा होतो की, या दोन पक्षाच्या युतीत असलेला कौटुंबिक आधार कोठे तरी कमी होत आहे. हा पाया अजूनही भक्कम असता तर अमित शहा यांच्या दौर्‍यात दिवसभर ज्या घटना घडल्या आणि माध्यमांना या दोन पक्षांच्या संबंधात उलट सुलट चर्चा करण्याची संधी मिळाली, ती मिळाली नसती आणि सारा प्रकार टळला असता. तणाव वाढू न देऊन दोन्ही पक्षांनी परिपक्वता दाखवली, परंतु यापेक्षा अधिक परिपक्वता दाखवली असती तर बरे झाले असते. किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल की, या दोन पक्षाची युती झाल्यानंतरच्या वीस वर्षात प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जो सौहार्द्राचा संबंध होतो तो तसाच पुढे चालू राहिला असता तरीही हा अप्रिय प्रकार टळला असता. पण तो त्यांना टाळता आला नाही, हे काही बरोबर झाले नाही.

शिवसेना आणि भाजपातला हा तणाव मोठा भाऊ कोण आहे, या विषयावरून निर्माण झालेला आहे. शिवसेनेला मोठा भाऊ ही भूमिका टिकवायची आहे. अडवाणी-वाजपेयींसह भाजपाचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत. त्यामुळे शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा म्हणजे गरजवंत लहान भाऊ असे चित्र निर्माण झाले होते. बाळासाहेब हयात असताना भाजपाच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन पायधूळ झाडायची अशी जी प्रथा पडली होती तीच पुढे कायम राहील असे सांगता येत नाही, असे भाजपाच्या नेत्यांना सूचित करायचे होते. त्यामागची त्यांची भूमिका योग्य होती. कारण भाजपाच्या अध्यक्षांनी शिवसेना प्रमुखांच्या घरी निमंत्रण नसताना जाण्याइतकी भाजपाची अवस्था काही बिघडलेली नाही. अमित शहा यांना हेच दाखवून द्यायचे होते. त्यामुळे कालच्या त्यांच्या दौर्‍यात मातोश्रीच्या भेटीचा कार्यक्रमाचा समावेश नव्हता. याचा अर्थ त्यांना शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा किंवा उद्धव ठाकरे यांचा अपमान करायचा होता असा नाही. त्यांना त्यांचा अपमान करायचाही नव्हता पण आपला स्वाभीमान मात्र टिकवायचा होता, दाखवून द्यायचा होता. अमित शहा यांची ही भूमिका योग्यच होती. कारण अशाच एका प्रकरणात पूवर्ी लालकृष्ण अडवाणी यांचा अपमान झाला होता.

भाजपाचे नेते निमंत्रण नसताना आपल्या घरी येऊन जातात यातून ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेनेला काही दाखवून द्यायची इच्छा असेल तर तिला आपण बळी पडता कामा नये ही अमित शहा यांची भूमिका योग्यच होती. त्यांनी निमंत्रण नसताना भेट तर दिली नाहीच, पण बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली, त्यांचा आणि शिवसेनेचा गौरवाने उल्लेख सुद्धा केला. त्यांच्या मनात काही नाही हे त्यांनी दाखवून दिले. अशा वर्तनातून आणि जाण्या न जाण्यातून आपल्याला जागा वाटपाचे कसलेही राजकारण करायचे नाही हे त्यांनी पुरतेपणी स्पष्ट केले. अमित शहा न बोलवता मातोश्रीवर येत नाहीत असे दिसायला लागल्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांनी फोनवरून आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते मात्र अमित शहा यांनी दिलदारपणे स्वीकारले आणि फोनवरच्या निमंत्रणावरून त्यांच्या घराला भेट सुद्धा दिली. अमित शहा यांनी राजकीय परिपक्वता दाखवली. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ती दाखवली आणि भाजपाच्या अध्यक्षांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. यात त्यांचीही परिपक्वता आहे. मात्र गडबड केली ती काही शिवसैनिकांनी.

अमित शहा यांनी आपल्या दौर्‍याच्या कार्यक्रमात मातोश्रीच्या भेटीचा समावेश केलेला नाही हे लक्षात येताच काही शिवसैनिकांनी पोस्टर्स लावले आणि त्या पोस्टरमधून नको तो संदेश गेला. उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण असो की नसो पण अमित शहा यांनी स्वत:हून त्यांच्या घराला भेट दिली पाहिजे, त्यातच शहाणपणा आहे असे या पोस्टर्समध्ये सूचित करण्यात आले होते. त्यातून तणाव वाढला. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना निमंत्रण दिले पण ते उशीरा दिले. अमित शहा यांचा मुंबई दौरा ठरला त्याच वेळी उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण त्यांना जायला हवे होते. पण उद्धव ठाकरे सुद्धा अमित शहा स्वत:हून आपल्या घरी येतील याची वाट पहात बसले. इथे त्यांचा परिपक्वपणा थोडा कमी दिसला. तो त्यांनी उशीरा दाखवला, त्याऐवजी लवकर दाखवायला हवा होता आणि दरम्यानच्या काळात पोस्टर्स चिटकवणार्‍या शिवसैनिकांना तसा वाव द्यायला नको होता. अमित शहा राजकीय दृष्ट्या करेक्ट ठरले. उद्धव ठाकरे सुद्धा पास झाले, पण ते मुख्य पेपरात पास झाले नाहीत. नंतर उत्तर पत्रिकेला लावलेल्या पुरवणीत पास झाले. भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये जागा वाटपावरून तणाव आहे, परंतु पक्षाध्यक्षाच्या दौर्‍यामध्ये त्या तणावात भर पडायला नको होती. ती पडली. या प्रकरणात दोन्ही पक्षांचे नेते कमी पडले. खरे म्हणजे हा विषय राजकारणाचा आणि डावपेचाचा होणे हे चुकीचे होते. ही युती देशातली सर्वाधिक काळ टिकलेली युती आहे, हा युतीच्या नेत्यांचा दावा खरा असेल तर त्या युतीचा जो मूळ आधार आहे तो आधार म्हणजे घरगुती संबंध, तो टिकायला हवा आहे.

Leave a Comment