आयएसआयएची रोजची कमाई ६ लाख पौंड

isis
लंडन- सिरीया आणि इराकच्या अनेक भागावर कब्जा केलेल्या इस्लामिक स्टेटचा प्रभाव जगभरात अनेक ठिकाणी वाढतानाच दिसून येत असताना या संटनेनेने व्यापलेला भाग ब्रिटनच्या आकाराइतका झाला असल्याचे दिसून येत आहे. या संघटनेने इराकमधील तेल विहिरी ताब्यात घेऊन तेल विक्रीतून रोजची ६ लाख पौंडाची कमाई करण्यास सुरवात केली असल्याचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवाय या कमाईत खंडण्या आणि नागरिकांवर लादले गेलेले विविध कर यामुळे भरच पडते आहे असेही हा अहवाल सांगतो.

इस्लामिक स्टेटकडे सध्या किमान १० हजार लढवय्ये आहेत. सिरिया आणि इराक मधील कमजोर शासन आणि अंतर्गत बंडाळ्यांमुळे या संघटनेला त्यांचे हातपाय पसरण्यास चांगलीच संधी मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. गतवर्षात सिरीयापुरती मर्यादित असलेली ही संघटना आता इराकमध्येही हातपाय पसरते आहे. मोसुलचा ताबा घेण्यापूर्वी या संघटनेकडे ८७५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५१५ दशलक्ष पौंडाची मालमत्ता होती. या संघटनेने बँक लुटणे, खंडण्या, चोर्‍या, डाके घालून आणि तेल विक्री करून त्यात १.५ अब्ज डॉलर्सची वाढ केली आहे. सध्या या संघटनेची मालमत्ता २ अब्ज पौंडापेक्षाही अधिक आहे. ही संघटना त्यांच्या लढवय्यांना दरमहा ४०० डॉलर्स पगार देते शिवाय कपडे, बूट, शस्त्रे अशा अन्य सुविधाही पुरविते.

अमेरिकेला या संघटनेने थेट आव्हान दिले असून तिच्या बिमोडासाठी अमेरिकेने इराकवर आत्तापर्यंत ११५ विमान हल्ले केले आहेत.

Leave a Comment