नरेंद्र मोदींचे शंभर दिवस

narendra-modi
दोन सप्टेंबरला नरेंद्र मोदी सरकारच्या राज्यारोहणाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. शंभर दिवसांमध्ये त्यांनी देशाचे रूप पालटून टाकायला पाहिजे अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. तशी अपेक्षा कोणताही जाणकार सामान्य माणूस करणारच नाही. शंभर दिवसात रामराज्य आणण्याचे वचन कोणी देऊ शकत नाही आणि तसे रामराज्य आणूही शकत नाही. आजच्या काळातला कोणताही राज्यकर्ताच काय पण खुद्द प्रभू रामचंद्राला सुद्धा आपले रामराज्य शंभर दिवसात आणता आलेले नव्हते. पण नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने पछाडलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी शंभर दिवसात देशाचे पूर्ण वाटोळे झाले असा आक्रोश करायला सुरुवात केली आहे. त्यांचा मोदीविरोधी प्रचार आणि त्यांचे एकेक आरोप ऐकले म्हणजे आपण, देव त्यांना क्षमा करो एवढी प्रार्थनाच फक्त करू शकतो. कारण या खोटारडेपणाला उत्तर द्यावे एवढीही त्याची लायकी नाही. हे सगळे आरोप, हा सारा आक्रोश आपल्या हातातून सत्ता निसटल्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून निर्माण झालेला आहे. तो प्रामाणिक असता तर त्याची चर्चा करण्याइतपत तरी लायकी राहिली असती. पण तेवढेही स्थान त्याला देता येत नाही.

कॉंग्रेसच्या या आरोपामध्ये शंभरनंबरी खोटेपणा तर आहेच, परंतु असे बेलगाम आरोप केल्यामुळे कॉंग्रेसचे नेते मोदीप्रेमी भारतीय जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरत चालले आहेत. गेली चार वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शंभर दिवसाच्या कारकिर्दीवरून नरेंद्र मोदी यांना काही तरी बोल लावावा हाच एक मोठा विनोद आहे. वास्तविक पाहता नरेंद्र मोदी यांनी शंंभर दिवसांमध्ये इतके गतीमान काम केलेले आहे की, एवढी गती घ्यायला पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाराष्ट्र सरकारला आणि मनमोहनसिंग यांच्या यूपीए सरकारला एक हजार दिवस सुद्धा पुरले नसते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या हाताशी आलेल्या फायली कशा वेगाने निकाली काढता येतात याचा आदर्श घालून दिलेला आहे. फायलींवर खुडूक कोंबडीसारखे बसून फायली उबवणार्‍या पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगवान निर्णय कसे करावेत हे शिकण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे शिकवणी लावायला हरकत नाही. या शिकवणीच्या सूचनेला शरद पवार तर नक्कीच दुजोरा देतील. एखादे सरकार सत्तेवर आले म्हणजे ते चांगले काम केल्याचा दावा करतेच. अशावेळी विरोधी पक्षांनीही त्यांच्या सुरात सूर न मिसळता सत्ताधार्‍यांच्या कामातील त्रुटी दाखवून दिल्या पाहिजेत, ते त्यांचे कर्तव्यच असते. ही गोष्ट खरी, परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांना अशा त्रुटी दाखविण्याची सुद्धा संधी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली नाही.

भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, लालफीतशाही आणि अल्पसंख्यकांच्या संबंधातील चुकीचा दृष्टीकोन यांच्यामुळे सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. समाजातल्या या दुष्प्रवृत्ती शंभर दिवसांत नष्ट करणे परमेश्‍वरालाही शक्य नाही. कारण त्यासाठी प्रदीर्घ काळ चांगली धोरणे राबवावी लागतात आणि ती प्रक्रिया मोठा वेळ खाणारी असते. परंतु शंभर दिवसात देशातला भ्रष्टाचार पूर्ण नष्ट झालाच नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत, दंगली सुरू आहेत म्हणून मोदी सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप कोणी करत असेल तर त्यांना मोदी सरकारही कळलेले नाही आणि त्यांना या सामाजिक प्रश्‍नांचे आकलनही झालेले नाही असे म्हणावे लागेल. देशातला भ्रष्टाचार शंभर दिवसात संपला नाही असा आरोप कॉंग्रेसचे नेते करीत आहेत हा या शतकातला सर्वात मोठा विनोद आहे. ज्या कॉंग्रेसवाल्यानी ६० वर्षे भ्रष्टाचाराला खतपाणी घालून त्याचा महावृक्ष केला, तोे महावृक्ष नरेंद्र मोदींनी मुळासकट १०० दिवसांत उखडून टाकला पाहिजे अशी अपेक्षा कॉंग्रेसवालेच करत आहेत. मोदींना हा वृक्ष उखडून टाकला नसला तरी त्याच्या मुळावर मात्र घाव घालायला सुरुवात केली आहे.

भ्रष्टाचाराची सुरुवात केंद्रीय मंत्रिमंडळात होते. हे मंत्रिमंडळ एकदा स्वच्छ झाले की, देशातल्या भ्रष्टाचाराची मुळे हलायला लागतात. हे हेरून नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पी.ए. कोण आहेत यावर बारीक लक्ष ठेवले आहे. कोणत्याही मंत्र्याने आपले परिचित किंवा नातेवाईक यांना आपल्या कारभारात स्थान देऊ नये, असा कडक नियम मोदींनी केला आहे. खरे म्हणजे असा नियम पूर्वीही होता. परंतु कॉंग्रेसच्या कोणत्याही पंतप्रधानाने या नियमाची अंमलबजावणी केली नव्हती. रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी तर रेल्वे मंत्री झाल्याबरोबर आपले जावई, पुतणे आणि मेहुणे यांनाच रेल्वे मंत्रालयात मोक्याच्या जागेवर बसवले होते. कॉंग्रेसच्या या मंत्र्याच्या भाईभतिजेगिरीमुळे रेल्वे मंत्रालयात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. या गोष्टींवर मोदींचा कटाक्ष आहे. त्यामुळे देशातला भ्रष्टाचार कमी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे असा विश्‍वास लोकांना पटला आहे. कॉंग्रेसवाल्यांनाही तो पटला आहे, परंतु विरोधी पक्ष म्हणून आपण काहीच करत नाही असे कोणी म्हणू नये म्हणून त्यांनी शंभराव्या दिवशी खरे-खोटे सगळे आरोप एकत्र करून मोदींची शंभर दिवसांची राजवट निराशाजनक असल्याचे खोटे िचत्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे आरोप करणार्‍या एकाही कॉंग्रेस नेत्याने आपल्या आरोपासाठी पुराव्याचा एक कागद सुद्धा पेश केलेला नाही.

Leave a Comment