सणासुदीच्या काळात मुंबईवर भारनियमनाचे संकट

loadshedding
मुंबई -मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रॉम्बे येथील टाटा पॉवर कंपनीच्या जनरेटिंग युनिटमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला असल्यामुळे वीजपुरवठ्यावरील ताण कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने भारनियमन केले जात आहे.

शिवडी, महालक्ष्मी, वरळी, दादर आणि आसपासच्या भागात टाटा पॉवर कंपनीच्या ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणा-या या युनिटमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. तर चेंबूर, बांद्रा, सांताक्रूझ, घाटकोपर, जुहू, साकीनाका, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी या भागात टप्प्याटप्प्याने भारनियमन केले आहे.

बिघाड दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल, हे मात्र टाटा पॉवर कंपनीचा कोणताही अधिकारी सांगू शकला नाही. बेस्टने मात्र टाटा पॉवर कंपनीच्या युनिटमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले.