शरीफ बचावतील

nawaz-sharif
पाकिस्तानात सध्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन जारी आहे. हे आंदोलन करणारे नेते राजकीय प्रभावाचा विचार केला असता अगदीच नगण्य आहे. परंतु त्यांना लष्कराचा पाठींबा असल्याची चर्चा होती. म्हणून जगभरातले लोक या आंदोलनाकडे गांभीर्याने पहायला लागले होते. काल तर लष्कराने शरीफ यांना तीन महिन्यांसाठी राजीनामा देण्याचा सल्ला दिला असल्याची अफवा पसरली. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला. परंतु रात्री लष्करप्रमुखाने या आंदोलनाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता आंदोलनातला जोर ओसरणार असून शरीफ या आंदोलनाच्या धक्क्यातून सावरण्याची शक्यता आहे. वास्तविक या आंदोलनात काही दम नाही. परंतु काही माध्यमांनी हे आंदोलन उचलून धरल्याने ते फार जोरदारपणे सुरू असल्याचे दृश्य तरी उभे राहिले. लोकशाहीत कोणी आपल्या अनुयायांसह पंतप्रधानांच्या कार्यालयावर चालून जायला लागला आणि मध्ययुगीन राजेशाहीत शोभेल अशा रितीने पंतप्रधानांना सिंहासन खाली करायला सांगायला लागला तर त्याला आंदोलन म्हणावे का हाच प्रश्‍न येतो. पाकिस्तानात असाच प्रकार जारी आहे.

पाकिस्तान तहेरिके इन्साफ या पार्टीचे नेते माजी क्रिकेट कर्णधार इम्रानखान यांनी स्वातंत्र्य दिनापासून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा आग्रह धरला आहे. त्यांचे हजारो समर्थक नॅशनल असेंब्लीच्या समोर धरणे धरून बसले होते. पण केवळ धरण्याने शरीफ राजीनामा देत नाहीत असे दिसायला लागल्यावर त्यांनी या सभागृहावर हल्ला केला आहे. आता असा हल्ला करून ते काय करणार आहेत हे काही माहीत नाही. कारण अशी चाल करून सभागृह ताब्यात घेता येईल, त्यांनी सरकारी वृत्त वाहिनीवरही हल्ला करून तीही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. या यंत्रणा ताब्यात घेतल्या म्हणजे देशाचा कारभार हाती येत नसतो हे त्यांना कळणार कसे ? राजीनाम्याच्या मागणीशिवाय आंदोलकांनी अन्यही काही मागण्या पुढे केल्या होत्या पण त्या आता मागे पडल्या आहेत आणि केवळ राजीनामा हीच मागणी कायम आहे. त्यांच्या या आंदोलनाला धर्मगुरू म्हणवल्या जाणार्‍या ताहीरुल कादरी यांच्या समर्थकांचे बळ मिळाले आहे. या संबंधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे आंदोलन अवैध ठरवावे अशी मागणी केली पण परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांना बळ मिळाले. त्यांनी आधी राजीनामाच हवा असा हट्ट धरला आहे पण या आंदोलनात काही तर्कशुद्धता नाही. बराच अपरिपक्वपणा दिसत आहे. तसा इम्रानखान हा काही मोठा राजकारणी माणूस नाही. त्याने एक २० वर्षांपूर्वी राजकीय पक्ष स्थापन केला आहे आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ एक कर्क रुग्णालय उभे करण्याचे घोषित केले आहे.

क्रिकेटच्या क्षेत्रातली आपली लोकप्रियता राजकारणामध्ये एनकॅश करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला आजवर तरी फार यश आलेले नाही. त्याच्या पक्षाने आजवर दोन वेळा जनरल असेंब्लीची निवडणूक लढवली. मात्र नागालँडएवढ्या एका छोट्या राज्यात संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याएवढी ताकद मिळविण्यापलीकडे इम्रानखानला राजकारणात यश मिळालेले नाही. नॅशनल असेंब्लीत तर त्यांचा एक सदस्य आहे.इम्रानखान अधूनमधून एखादे आंदोलन छेडतो आणि विरोधी पक्ष असल्याचे कर्तव्य बजावतो. इम्रानखानचे नेमके वर्णन करायचे झाले तर थोड्याबहुत फरकाने तो पाकिस्तानचा अरविंद केजरीवाल आहे. पाकिस्तानच्या जनरल असेंब्लीच्या निवडणुका होऊन दोन वर्षे झाली आहेत आणि त्या निवडणुकीत नवाज शरीफ यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला याचा साक्षात्कार इम्रानखानला आता झाला आहे. तो तसा आरोप करून पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहे. पण राजीनाम्याची मागणी करण्याची ही पद्धत कोणत्या लोकशाहीत बसते? त्यासाठी आरोपाला पुष्टी देणारे पुरावे सादर केले पाहिजेत आणि तो आरोप न्यायालयात सिद्ध झाला पाहिजे मग राजीनाम्याची मागणी करायला काही हरकत नाही. तेव्हा धर्मगुरू कादरी आणि इम्रानखान या आरोपाच्या बाबतीत मनमानी करीत आहेत.

त्यांच्या असल्या आंदोलनाने नवाज शरीफ राजीनामा देणार नाहीत. मात्र ताहेरूल कादरी यांच्या पाठींब्यामुळे आंदोलनाला थोेडेसे बळ आले आहे. ताहेरूल कादरी हा माणूस सुद्धा असाच हंगामी राजकारणी आहे. तो मुळात राहतो कॅनडामध्ये आणि कधी तरी लहर आली की पाकिस्तानात येऊन कसले तरी आंदोलन करतो. मागच्या निवडणुकीत त्याने अशाच पद्धतीने एक लॉंगमार्च काढला होता. भरपूर हवा निर्माण झाली. माध्यमांनी आंदोलन उचलून धरले आणि काही दिवसांनी सारे काही शांत झाले. कादरी कॅनडात निघून गेले. नंतर त्यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन केले. कादरी पाकिस्तानात सत्तांतर घडविणार की काय, अशी चर्चा सुरू झाली पण कादरी यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आणि ते पुन्हा कॅनडात जाऊन बसले. आता पुन्हा एकदा ते पाकिस्तानात आंदोलन करायला आले आहेत. त्यांना मानणारा एक वर्ग पाकिस्तानात आहे आणि तो त्यांच्या हाकेला ओ देत असतो. एवढीच त्यांची शक्ती आहे. त्या पलीकडे त्यांना त्या राजकारणात काही घडवता येत नाही. परंतु ते आव मात्र मोठा आणतात. अशा प्रकारे दोन दिखाऊ राजकारण्यांनी पाकिस्तान सरकार समोर एक मोठे आव्हान निमर्ाण केल्याचे दृश्य उभे केले आहे. तिथे अराजक माजलेले आहे अशी प्रतिमा निर्माण झाली आहे परंतु आता सुरू असलेले हे आंदोलन लवकरच शमलेले दिसणार आहे.

Leave a Comment