महायुुतीतला महागोंधळ

mahayuti
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना यांच्यातल्या जागा वाटपाच्या चढाओढीला गती आली असतानाच या दोन पक्षातील वैर वाढणार्‍या घटना घडत आहेत. नारायण राणे यांना भाजपमध्ये घेऊ नये ही शिवसेनेची अट भाजपाने मान्य केली. परंतु नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील अनेक शिवसैनिकात भाजपात प्रवेश दिला आहे. यातून निर्माण होणारा तणाव भारतीय जनता पार्टी कसा निपटणार आहे हा विषय मोठा गंभीर झाला आहे. दरम्यान, जागा वाटपावरून सुद्धा कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा अधिक कटुतापूर्ण सवाल-जवाब सुरू झाले आहेत. निवडणुका मोदी लाटेत होत आहेत आणि तिचा फायदा भाजपाच्या सोबत सेनेलाही होत आहेे. शिवाय गेल्या काही वर्षात शिवसेनेला गळती लागली असल्याने आता शिवसेनेने भाजपाच्या मागणीला मान द्यावा अशी अपेक्षा भाजपा नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. ही गोष्ट खरी होती आणि तरीही भाजपाने फार वरचढपणा केला नव्हता. त्यांच्या वाट्याला नेहमी ११९ जागा येतात. आता त्यांनी १६ जागा जादा मागितल्या होत्या. त्यातल्याही काही जागा अन्य मित्रपक्षाला सोडायला भाजपा नेते तयार होते. ही मागणी काही फार अवाजवी नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे नेते तसे गप्प होते पण बिहारमध्ये भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि हरियाणात एक मित्र पक्ष भाजपापासून फुटून निघाला या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला.

या दोन घटनांनी भाजपाचे नेते धास्तावले असतील असे मानून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चेपायचे ठरवले. आधी तर त्यांनी भाजपाला चिमटा काढला. भाजपाचे नाव न घेता किंवा नरेन्द्र मोदी यांचा संदर्भ न घेता पण त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे गरजले. केवळ हवेवर निवडणुका लढवता आणि जिंकता येत नसतात, असे ते म्हणाले. याचा अर्थ काय होता ? भाजपाने लोकसभा निवडणुकीत हवेवर विजय मिळवला आहे आणि आता ती हवा विरत चालली आहे. तेव्हा फार वरचढपणा न दाखवता मुकाटपणे आम्ही म्हणतो तसे वागा. आमची दादागिरी सहन करा. ठाकरे एवढे म्हणून थांबले नाहीत. भाजपाची हवा संपलीच आहे असे समजून त्यांनी भाजपाला नेहमीच्या ११९ जागाही द्यायला नकार दिला. पाहिजे तर भाजपाने १०९ जागा लढवाव्यात आणि त्यातूनच काही जागा आपल्या मित्र पक्षांना द्याव्यात असे त्यांनी जाहीर केले. भाजपाचे सारे अवसान आता गळालेच आहे असे मानून त्यांनी हा पेच टाकला खरा पण तो भाजपाला फारच अपमानकारक ठरणारा होता. शिवसेनेची ही मन:स्थिती उचित नव्हती. म्हणून भाजपाच्या नेत्यांनी त्यांना तसेच उत्तर दिले आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची पूर्णच फेरआखणी केली पाहिजे असे म्हटले.

भाजपाचे हे उत्तर सडेतोड होते. बिहार आणि हरियाणातच्या घटनांनी आपले मनोधैर्य काही घसरलेले नाही आणि शिवसेनेने तशा समजुतीत राहू नये असे भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना समजावले. त्यावर शिवसेनेचे नेते जरा नरमले आहेत. खरे तर शिवसेना नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, हवा कमी झाली असेल तर ती काही केवळ भाजपाची झालेली नाही. शिवसेनेचीही हवा ओसरली आहे. लोकसभेच्या २४ जागा भाजपाला मिळाल्या त्या हवेवर मिळाल्या आहेत आणि शिवसेनेला मिळालेल्या १८ जागा काय स्वकर्तृत्वावर मिळाल्या आहेत का ? बिहारात जे काही झाले आहे ते जसे भाजपाला धोक्याचा इशारा देणारे आहे तसेच ते शिवसेनेलाही इशारा देणारे आहेत. बिहारात काही घडले म्हणून शिवसेनेने भाजपाची कोंडी करावी आणि त्याला नेहमीच्याही जागा देण्यास नकार द्यावा एवढा काही भाजपाचा र्‍हास झालेला नाही आणि झाला आहे असे मानले तरीही शिवसेनेचाही फार प्रभाव पडलेला नाही हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यायला हवे.

कै. बाळासाहेब ठाकरे हयात असताना युतीच्या व्यवहारात पारदर्शकता होती. फार डावपेचांना वाव नव्हता. प्रमोद महाजन आणि बाळसाहेब यांच्यात एक अंडरस्टँँडिंग होती. ती आता उरलेली नाही. आपण सरळ वागलो तर भाजपाचे नेते आपल्याला निष्प्रभ करतील असा काही तरी गंड शिवसेना नेत्यांच्या मनात निर्माण झाला आहेे. त्यातून ते छक्के पंजे खेळायला लागले आहेत. भाजपाच्या नेत्यांनीही तसाच प्रकार सुरू केला आहे. त्यांना शिवसेनेशी युती नको असेल तर त्यांनी उघडपणे तसे सांगून युती मोडायला काही हरकत नाही. पण तसे होत नाही. कदाचित असे वाटते की, दोघांनीही परस्परांना खडाखडीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपाचे नेते ऐन निवडणुका जवळ आल्या की युती मोडून मनसेशी युती करतील अशी भीती शिवसेनेला वाटते. तसे होऊ नये म्हणून एका बाजूला जागावाटपात नम्रपणे बोलायचे आणि प्रत्यक्षात त्यांना पाहिजे तेवढ्या जागाही आपल्या कडे घ्यायच्या असा शिवसेनेचा विचार असावा असे वाटते. या दोन पक्षांनी जवळपास २७ वर्षे युती टिकवली आहे. ती टिकवणे दोघांच्याही लाभाचे आहे. पण आता युतीची गरज शिवसेनेपेक्षा भाजपाला जादा आहे. याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांनी केला पाहिजे. युती मोडली जाऊ नये यासाठी नमते घेतले पाहिजे.

Leave a Comment