जपान भेटीचे औचित्य

modi1
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी या दौर्‍यासाठी जपानची निवड केली. दक्षिण आशियाई देशातील भूतान आणि नेपाळचा दौरा त्यांनी नुकताच पूर्ण केला आणि त्यानंतर लगेच जपानची निवड केली. आता ते चीन आणि अमेरिकेला जाणार आहेत. भूतान आणि नेपाळमधून आपल्याला वीज मिळू शकते. जपानमधून आपल्या देशातल्या पायाभूत सोयींना मोठी मदत मिळू शकते. अमेरिका आणि चीन यांच्याकडूनही विकासाच्या संदर्भातच भागीदारीचे संकेत मिळू शकतात. म्हणजे या देशांची निवड करण्यामागे विकासाला चालना देण्याचा दृष्टीकोन आहे. गेली दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने या पातळीवर फार वाईट कामगिरी बजावली. ती चूक दुरुस्त करीत विकासाला चालना देण्यावर नरेंद्र मोदी यांचा जोर आहे आणि त्यांच्या या विशिष्ट देशांच्या दौर्‍यामागे त्यांचा हा पसंतीक्रम अधोरेखित झाला आहे. जपानचे महत्व तर फारच आहे. भारतातील बुलेट रेल्वे आणि वाराणसी शहराचा विकास यासह पायाभूत सोयी वाढविण्याच्या अनेक योजनांमध्ये जपान आपल्याला सहकार्य करणार आहे. त्याशिवाय जपानकडून भारताला युरेनियम हे अणु ऊर्जेसाठी आवश्यक असलेले इंधनही प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने भारत आणि जपान यांच्यात काही करार होण्याची शक्यता आहे.

जपानने भारताला मदत करावी हे साहजिक आहे, कारण जपान हा जगातला औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहे. परंतु जपान हा देश आहे केवढा? तो जेमतेम महाराष्ट्राएवढा आहे. त्याची लोकसंख्या सुद्धा महाराष्ट्रा एवढीच आहे. पण उत्पन मात्र भारताच्या कैकपट जास्त आहे. जपान हे एक बेट आहे. शेती करण्यायोग्य जमीन तिथे कमी आहे. ज्वालामुखी आणि भूकंप यांच्या संकटाशी सतत सामना करणारा हा देश जगाच्या पूर्वेला असल्यामुळे त्याला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. हा देश तसा पूर्वीपासूनच औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश म्हणून ओळखला जातो. परंतु दुसर्‍या महायुद्धात त्याने अमेरिकेशी चढाओढ करण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या महायुद्धाचा जपानशी काही संबंध नव्हता, अमेरिकेशीही नव्हता. परंतु युद्धाच्या उत्तरार्धामध्ये हे दोन देश प्रामुख्याने यूरोपीय देशात सुरू असलेल्या या युद्धात ओढले गेले. यूरोपातल्या देशांची युद्धाची क्षमता कमी झाली, परंतु जपान मात्र चिवटपणे झुंजत होता. त्याचा खातमा केल्याशिवाय दुसरे महायुद्ध संपणार नाही याची खात्री झाल्यामुळे अमेरिकेने त्या काळात बनवलेल्या पहिल्या वहिल्या महासंहारक अणुबॉम्बचा स्फोट जपानवर केला. दोन स्फोटांमध्ये सुमारे काही मिनिटात दोन लाखांवर लोक मारले गेले आणि त्यापेक्षाही अधिक लोक जायबंदी होऊन शापित जीवन जगायला लागले. हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन औद्योगिक शहरे बेचिराख झाली. पण या राखेतून सुद्धा जपानने अशी काही विलक्षण प्रगती केली की, महायुद्धानंतरच्या चाळीस वर्षात जपान हे चिमुकले राष्ट्र जगातली दुसर्‍या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनले. भारतासारखा मोठा देश आज जपानकडून मदत घेत आहे हे भारतासाठी जेवढे लाजीरवाणे आहे तेवढे जपानसाठी गौरवाचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍याच्या निमित्ताने आपली स्थिती आणि जपानची स्थिती यांच्या संबंधाने भारतीयांनी काही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे वाटते.

जपान आपल्यापुढे का केला? साधारण दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच भारतही स्वतंत्र झाला आणि त्याच वेळी जपान राखेतून उठण्याचा प्रयत्न करत होता. साधारण साठ वर्षांची वाटचाल दोन्ही देशांनी केली आहे. पण जपान भारतापेक्षा श्रीमंत आहे, कारण तिथल्या लोकांची प्रखर देशभक्ती. आपल्या देशाला आता विध्वंसाकडून समृद्धीकडे जायचे आहे हे तिथल्या लोकांना कळले, तेव्हा त्यांनी आपला पैसा आणि श्रम या दोन्हींचा वापर देशाच्या पुनरउभारणीसाठीच करायचा अशी प्रतिज्ञाच केली आणि ती तडीस नेली. जपानमध्ये कधीही संप होत नाहीत. याचा अर्थ तिथले कारखानदार कामगारांच्या सगळ्याच मागण्या मान्य करतात असे नाही. पण एखाद्या कारखान्यातील कामगारांना आपला असंतोष व्यक्तच करायचा असेल तर ते काम बंद करून, संप करून तो व्यक्त करत नाहीत. तिथल्या कामगारांची संप करण्याची एक वेगळी पद्धत आहे. ते नेहमीच्या नियमापेक्षा अधिक काम करून आपला असंतोष व्यक्त करतात. त्यामुळे कामगारांचे गार्‍हाणे तर कारखानदाराला कळतेच, पण देशाच्या उत्पादनाला खीळ बसत नाही. याला म्हणतात देशभक्ती. तिथले कामगार काम करताना चुकारपणा करत नाहीत. त्यामुळे जपानमध्ये तयार झालेल्या कोणत्याही वस्तू तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निदार्ेष असतात आणि यासाठी जपानचे जगभर नाव आहे.

जपानमध्ये धातूचे शुद्धीकरण आणि मिश्रधातूंची निर्मिती यावर खूप संशोधन केले गेले आहे. भारतात ते झालेले नाही. भारतात कच्चे धातू खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात, परंतु त्यापासून पक्का धातू करण्याचे तंत्रज्ञान आणि उद्योग भारतात नाहीत. त्यामुळे भारतातले हे कच्चे धातू किंवा खनिज जपानमध्ये अगदी नगण्या किंमतीला पाठविले जातात. ज्यामध्ये सुमारे ४० टक्के धातू असतो अशी ही खनिज माती जपानला पाच रुपये किलो या दराने पाठवली जाते. जपानमध्ये त्याचे शुद्धीकरण करून धातू तयार होतो, तोच धातू भारताला ५० रुपये किलोने विकला जातो. मिश्र धातूंचे विविध यंत्रातले सुटे भाग तर दोन हजार रुपये किलो या भावाने भारताला विकले जातात. म्हणजे या धातूंच्या शुद्धीकरणातून त्यांची जी किंमत वाढली तिचा लाभ जपानला मिळाला. भारत मात्र कच्ची खनिजे विकून गरीब झाला. जपान तंत्रज्ञानामुळे आपल्यापेक्षा आघाडीवर आहे. आपण कष्ट, देशभक्ती, उद्योजकीय प्रवृत्ती, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात जपानच्या मागे आहोत. या सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागत नाहीत. त्या माणसाच्या आत असतात. त्या फक्त वाढवाव्या लागतात. त्यालाही पैसा लागत नाही. पण त्याच्या योगाने आपण जपानसारखे पुढे जाऊ शकतो. हे एकदा आपण समजून घेतले पाहिजे.

Leave a Comment