लातूरची सत्ता टिकविण्याचे कॉंग्रेस समोर आव्हान

congress
वाढत्या सोशल मीडियाच्या जमान्यात गड, किल्ले, गढ्या, वाडे हे शब्द इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. राजकारणातही पूर्वी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, हा भाजपाचा गड आहे अशा शब्दांचा वापरस सर्रास केला जात असे. परंतु वाढत्या नवमतदार आणि सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेता सत्ता टिकविणे भल्या भल्यांना आव्हानात्मक वाटत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपाचे डॉ. सुनील गायकवाड हे २००९ च्या निवडणुकीत काही हजार मतांनी पराभूत झाले होते. त्याच वर्षी झालेल्या लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या राहत्या घरातील वॉर्डात अवघी ४८ मते मिळाली होती. परंतु मोदी लाट आणि चक्क २ लाख ५७ हजार मतांनी त्यांनी राहुल गांधींच्या प्रायमरीमधून निवडले गेलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शुद्ध चारित्र्याचे, दांडगा जनसंपर्क असलेल्या परंतु कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला आहे आणि हा इतिहास अजून ताजा आहे. त्यामुळेच असाच पराभव कॉंग्रेस आघाडीचा होईल आणि महायुती विजयी होईल असे आज सांगता येणार नाही. कारण मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. कॉंग्रेसला ओहोटी लागलेली आहे.

महायुतीतील पक्षांना भरती आली आहे. त्यामुळे नेमका उमेदवार कोण असेल यावर लढाईचे स्वरूप ठरेल. तरी परंतु कॉंग्रेस आघाडीला सत्ता टिकविण्याचे आव्हान जनतेतून आणि पक्षातूनही आहे. लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील लातूर अमित विलासराव देशमुख – कॉंग्रेस, लातूर ग्रामीण वैजनाथराव शिंदे – कॉंग्रेस, औसा बस्वराज पाटील – कॉंग्रेस, निलंगा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर – कॉंग्रेस, उदगीर सुधाकर भालेराव – भाजपा, अहमदपूर बाबासाहेब पाटील – राष्ट्रवादी कॉंग्रेस असे पक्षीय बलाबल आहे.

अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी रिडालोसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. विजयानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या बदल्यात त्यांना बालाघाट सहकारी साखर कारखाना विकत मिळालेला आहे. त्यामुळे आता अहमदपूरवर हक्क कोणाचा, असा तिढा निर्माण झालेला आहे. हा मतदारसंघ महायुतीत भाजपाकडे असून सध्या तिथे किमान २२ नेते शड्डू ठोकून तयार आहेत. त्या २२ इच्छुकांमध्ये प्रामुख्याने जातीय गणिताचा विचार केला तर मराठा समाजाचे दिलीपराव देशमुख, येलम रेड्डी समाजाचे आणि माजी आमदार बब्रुवान खंदाडे, धनगर समाजाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके हे प्रमुख दावेदार समजले जातात. त्यामुळे कॉंग्रेसला जागा मिळवणे आणि राष्ट्रवादीला राखणे हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महायुतीपुढे जातीय समीकरण साधण्याचे आव्हान आहे.

लातूर शहर मतदारसंघ हा नेहमी कोणाला विजयी करायचे यापेक्षा कोणाला पराभूत करायचे यावर जास्त भर देणारा आणि वार्‍यापेक्षाही जास्त वेगाने अफवांचा बाजार तेजीत आणणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे. मागच्यावेळी पप्पू कुलकर्णी यांनी निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांचे डिपॉझीट जप्त झाले होते. यावेळी तर आमदार अमित देशमुख यांना राज्यमंत्रीपद मिळाले असले तरी शहरातील कचर्‍याची समस्या, दहा दिवसाला एक वेळ येणारे पाणी, शहरातील वाढती अतिक्रमणे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांच्याशी होत असलेली तुलना हा अमित देशमुखांना भेडसावणारा विषय आहे. त्याच्या स्वभावाचे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे किती भांडवल केले जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचे पाप-पुण्य त्यांनाच भोगावे लागणार आहे. भाजपानेही या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला असून त्या आशेने शैलेश लाहोटी यांनी कॉंग्रेसला राम राम करून भाजपात प्रवेश केला आहे.

लातूर ग्रामीणमध्ये विद्यमान आमदार वैजनाथराव शिंदे यांच्यावर कोणताही आरोप करण्यासारखे त्यांनी काही केलेले नाही. त्यांनी केवळ माणसे जोडण्याचे आणि विकास योजनेच्या अंमलबजावणीचे काम केलेले आहे. तरी सुद्धा कॉंग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासारखे नेते बाशिंग बांधून तयार आहेत. आमदार दिलीपराव देशमुख यांनी १९९५ च्या चिंतन मेळाव्यात कव्हेकर यांच्या विजयाच्या शेखीचा जो समाचार घेतला त्याचा चांगला-वाईट परिणाम काय होणार तो काळच ठरविणार आहे. यातूनच पाटील-देशमुख वाद चिघळणार आहे. भाजपाकडून मागील निवडणुकीत पराभूत झालेले रमेश कराड हे आता पुन्हा जोमाने लढाईच्या तयारीत आहेत. कॉंग्रेससोबत त्यांनी शिवसेनेलाही खिंडार पाडले आहे. गावोगावी धार्मिक, सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत, जनसंपर्क यामुळे त्यांची बाजू मजबूत आहे. त्यामुळे या मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवार कोण यावरच या ठिकाणची लढाई रंगतदार ठरणार आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात तर दोन्ही निलंगेकर म्हणजे आजोबा आणि नातू हे साखर कारखान्यामुळे अडचणीत आले आहेत. आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सहकारी साखर कारखाना बंद पाडला तर त्यांचे नातू भाजपाचे महामंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भारती शुगर नावाने शेअर गोळा केले आणि कारखानाच उभारला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभय साळुंके यांनी निलंगेकर परिवारापासून जनतेला मुक्तीचा नारा दिला आहे. खेडोपाडी ‘नो शिवाजी, नो संभाजी’ चा नारा रंगत आहे. आता कॉंग्रेसकडून अशोकराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संभाजीराव पाटील रिंगणार येणार की त्यांच्या मातोश्री रुपाताई पाटील येणार हे त्यांच्यावर अवलंबून आहे. एकुणात या मतदार संघातील लढाई ही निलंगेकर कुटुंबातच होईल. या मतदारसंघात मनसेचे अभय साळुंके हे नशीब आजमावणार आहेत.

उदगीरला भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या विरुद्ध खूप काही टीका होईल असे आरोप नाहीत. त्यांनी वेळोवेळी भाजपातील नेते बदलून स्वत:चे स्थान पक्के करण्याचे काम केले असल्यामुळे कार्यकर्ते नाराज असले तरी उगवता सूर्य त्यांच्या बाजूने राहील असे त्यांचे धोरण असल्यामुळे तिथे कोण असा प्रश्‍न कायम आहे. तरी सुद्धा माजी आमदार टी.पी. कांबळे, नूतन खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे विश्‍वजित गायकवाड हे प्रमुख दावेदार आहेत. आतापर्यंत या जागेसाठी एकूण ३५ जणांनी पक्ष निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या आहेत.

उदगीर हा आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी लातूरचे संजय बनसोडे हे गावनिहाय भेटीगाठी घेत आहेत. ते सध्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस असल्यामुळे या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार हे दिल्लीतच ठरणार आहे. भाजपामध्ये मात्र बंडखोरीची शक्यता वर्तविली जात आहे. एकुणात जिल्ह्यात सर्वात सुलभ मतदारसंघ म्हणजे औसा मतदारसंघ. या मतदारसंघात कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात स्पर्धा नसल्यामुळे फारसा गाजावाजा होत नाही. विद्यमान आमदार बस्वराज पाटील मुरुमकर यांनी किल्लारीचा बंद पडलेला सहकारी साखर कारखाना विकत न घेता भाडेतत्वावर घेऊन शेतकरी, कामगार यांना दिलासा दिला आहे. हा मुद्दा त्यांच्यादृष्टीने जमेचा आहे. शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने शिवआदेशानुसार निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.

एकुणात जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, रस्त्यावरील खड्डे, उदगीर, निलंगा, नळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रश्‍न या मुद्यावरच या निवडणुकीत भर दिला जाणार असून त्या प्रश्‍नावरच वातावरण तापणार असे दिसते. महत्वाचे म्हणजे ही निवडणूक कॉंग्रेसचे विलासराव देशमुख आणि भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर होत असल्याने श्रद्धांजली कोण किती मिळवतो हे पाहण्यासारखे आहे. या सहा विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या असे – लातूर ग्रामीण २८६१०१, लातूर शहर ३१९१७३, अहमदपूर २८२६६३, उदगीर २६४३५९, निलंगा २७८३१५, औसा २५०६५३.

Leave a Comment