सत्तेविना तगमग

politics
लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस राजकारणात उतरतो, परंतु त्याला आपल्या मनातल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी सत्ता हवी असते. सत्तेशिवाय कल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाही. या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आणि त्या त्या पातळीवरील समाजातल्या सामान्य प्रतिनिधींच्या हातात सत्तेची सूत्रे गेली पाहिजेत. मात्र आपल्या कल्पना साकार करण्याचे सत्ता हे काही एकमेव साधन नाही. इतरही अनेक साधनांनी समाजाला वळण लावता येते. पण राजकारणात केवळ सत्तेसाठी उतरलेले लोक सत्तेचा वापर करून समाजाला वळण तर लावत नाहीतच, पण सत्ता हेच आपल्या राजकारणाचे एकमेव इप्सित आहे असे मानून ते केवळ सत्तेसाठी राजकारण करायला लागतात. सत्ता हे साधन आहे साध्य नाही. पण साध्य आणि साधनातला हा फरक ज्यांना कळत नाही ते लोक सत्तेसाठी सारे काही करत राहतात आणि ही सत्ता हातातून निसटते तेव्हा ते पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफड करायला लागतात. सत्तेविना जगणे त्यांना अशक्य होऊन बसते.

भारतात अनेक सेवाभावी राजकारण्यांनी जन्मभर संघर्षाचे आणि सेवेचे राजकारण केलेले आहे. भारतात असे कित्येक नेते आहेत की, ते जन्मभर केवळ संघर्ष करत राहिलेले आहेत. संघर्षाचा मार्ग सोडून तडजोडीचा मार्ग स्वीकारला असता तर ते सत्तेच्या फार वरच्या टोकापर्यंत जाऊन पोचले असते एवढी त्यांच्यात क्षमता आहे. परंतु त्यांनी ती तडजोड केली नाही आणि ते जन्मभर सत्तेपासून दूर राहिले. ते सत्तेवाचून जगू शकतात, कारण त्यांना सत्तेची चटक लागलेली नसते. मात्र ज्यांना सत्तेची चटक लागलेली असते त्यांना सत्तेविना जगणे मुश्कील होऊन बसते. अशा जगणे मुश्कील होत असलेल्या नेत्याची मन:स्थिती कशी असते हे शरद पवार यांनी नुकतेच दाखवून दिले. सध्या ते केंद्रात सत्तेवर नाहीत, त्यामुळे विलक्षण अस्वस्थ झाले आहेत. ते नुकतेच द्राक्ष बागायतदारांच्या मेळाव्याला हजर होते. तिथे भाषण करताना त्यांनी आपल्या हातात आता सत्ता नाही याची मोठीच खंत व्यक्त केली. द्राक्षाची दारु तयार करणार्‍या काही कारखानदारांनी नेहमीप्रमाणेच पवार समोर बसलेले असताना अडचणींचा पाढा वाचायला सुरूवात केली. पण पवारांनी भाषण करताना, आता आपल्यासमोर अडचणींचा पाढा वाचण्याचा काही उपयोग नाही असे स्पष्ट केले. आपल्या हातात सत्ता नाही. तेव्हा आपण फार तर बागायतदार आणि कारखानदार यांचा निरोप सरकारपर्यंत नेऊन पोचवण्याचे अर्थात पोस्टमनचे काम करू असे ते म्हणाले.

आता आपल्या हातात अधिकार नाही याची मोठीच खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त झाली. पवार गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. खरेच सांगायचे तर ते ५० वर्षांपासून ‘सत्ताकारणात’ आहेत. ते १९७९ ते १९८५ हा काळात विरोधी पक्ष नेते होते. तेवढा काळ वगळता ते सत्तेत आहेत आणि त्यांना सत्तेची सवय झाली आहे. ज्यांना सत्तेची सवय असते त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा वनवास सहन होत नाही. सतत हारतुरे, सतत कार्यकर्त्यांची गर्दी आणि सतत हांजी हांजी करणारे अधिकार यांचे एवढे व्यसन जडते की, या गोष्टीवाचून जगताही येत नाही. पवारांनीच काय पण कोणत्याच कॉंग्रेसवाल्यांनी कधी आंदोलन केलेले नाही. नुकतेच देशातल्या काही कॉंग्रेस नेत्यांनी महागाईच्या विरोधात घंटानाद केला. ते घंटानाद आंदोलन एवढे विनोदी होते की, महागाई कमी झाली तरीही ते जारीच होते. त्यांना भाव कमी झाले आहेत हे कळलेही नाही. शरद पवार, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सडकेवर पायही ठेवला नाही. पवारांनी आजवर केले ते सारे सत्ताकारण होते. त्यांनी राजकारण केलेले नाही.

राजकारणात सारे काही असते. सत्ताही असते पण संघर्षही असतो. खुर्च्या कधी मिळतील याची काही शाश्‍वती नसते पण मोर्चा मात्र नेहमी काढावा लागतो. चर्चा करावी लागते. सतत आदेश देण्याची सवय झालेल्यांना या गोष्टी सहन होत नाहीत. त्यांचे सारे राजकारण नेहमी सत्तेकडून सत्तेकडे जात असते. त्यांच्या चिंतनाचा विषय नेहमी सत्ता हाच असतो आणि त्यांचे सारे डावपेच सत्ता प्राप्त व्हावी यासाठीच असतात. पवारांनी महाराष्ट्रात सतत सत्ताकारणच केले आहे. सत्ता प्राप्त करताना नेहमी गोड गोड आणि खोटी आश्‍वासने द्यावी लागतात. धनगर आणि मराठा समाजाला त्यांनी अशीच आश्‍वासने दिली होती. पण ती त्या समाजाच्या हितासाठी नसून पवारांना सत्ता प्राप्त व्हावी यासाठी होती. धनगर समाजाला गोड गोड बोलून आजवर कच्छपी लावले. आता या समाजाला उपरती झाली आहे आणि त्यांना पवारांच्या खोट्या आश्‍वासनामागचे सत्य समजले आहे. मराठा समाजाला अशीच पंधरा वर्षे आरक्षणाचे आमिष दाखवले होते पण शेवटी हा समाज एवढा निकराला आला की, त्याला खरोखरच आरक्षण दिले नाही तर आपल्याला राजकारणातून बाद व्हावे लागेल अशी भीती वाटायला लागली तेव्हा आरक्षण देणे भागच पडले. कमी लोकांना थोडा काळ फसवणे शक्य होते पण मोठ्या जनसमुदायाला फार काळ फसवता येत नाही. याचा अनुभव पवारांना आणि कॉंग्रेसवाल्यांना येत आहे.

Leave a Comment