जन-धन योजनेचा धडाका

modi
या पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदींची कार्यशैली काय राहणार आहे याची एक झलक काल बघायला मिळाली. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा थोडा उतरला आहे अशी एक चर्चा माध्यमात सुरू करून देण्यात आली होती आणि बिहारमधल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने तसे वातावरण तयार व्हायला लागले होते. दिल्लीमध्ये काही वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अस्वस्थता निर्माण करणार्‍या खोट्या बातम्या पेरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिनाभरात केंद्रातल्या ३ ज्येष्ठ मंत्र्यांना या गोष्टीचा फटका बसला. अरुण जेटली यांच्या एका वाक्यातल्या एका शब्दावरून रण माजवण्यात आले. नितीन गडकरी यांच्या घरी हेरगिरीची साधने पेरण्यात आल्याची बातमी छापण्यात आली. त्या साधनांचे पुढे काय झाले याबद्दल पुन्हा त्या पत्रकाराने काहीच छापले नाही. अर्थात ही बातमी खोटी होती हे आपोआपच सिध्द झाले. मात्र सरकारच्या पातळीवर सारे काही छान चाललेले नाही असे वातावरण निर्माण करण्यात त्या माध्यमाला अल्पसे का होईना पण यश आले आणि त्याचा आधार घेत कॉंग्रेसवाल्यांनीसुध्दा पत्रकार परिषदा, निदर्शने आदी प्रकार सुरू केले. राजनाथ सिंह याच्याबाबतीसुध्दा असाच प्रकार घडला. असे सगळे प्रकार सुरू असूनही खुद्द पंतप्रधान नरंेंद्र मोदी हे शांतपणे बसून आपला ठरलेला कार्यक्रम निर्धाराने अंमलात आणत आहेत. त्याचेच प्रत्यंतर काल जन-धन योजनेमध्ये आले.

ही एक उत्तम आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन आणणारी योजना आहे. या पुढच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या अशा धडाकेबाज योजना पुढे येत राहणार आहेत. एवढेच नव्हे तर त्या योजनांच्या अंमलबजावणीत खास नरेंद्र मोदी यांचा संघटनात्मक स्पर्श दिसून येणार आहे. त्यांच्या हस्ते काल या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी या योजनेची सुरूवात मोठ्या कल्पकतेने केली आहे. आजवरच्या पंतप्रधानांप्रमाणे त्यांनी हे उद्घाटन केलेले नाही. नाही तर दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन करायचे आणि ज्या ठिकाणी योजना राबवली जाणार आहे तिथे सारी सामसूम असायची. तिथे काही चौकशी केली तर तिथल्या अधिकार्‍यांनी उत्तर द्यायचे, अजून आम्हाला वरून काही कळवलेले नाही आणि जेव्हा त्यांना वरून काही कळवले जाईल तेव्हा लोकांचा उत्साह मावळलेला असे. असे होऊ नये म्हणून नरेंद्र मोदी यांनी स्वतः उद्घाटन करतानाच गावागावांमध्ये जन-धन योजनेचा सोहळाच करून टाकला.

जवळपास ७७ हजार ठिकाणी नवीन खाती उघडण्याची शिबिरे घेतली गेली आणि ६०० ठिकाणी या योजनेच्या उद्घाटनाचे समारंभ झाले. नरेंद्र मोदी नवीन योजना सुरू करत आहेतच पण त्या योजनेत जनतेचा सहभाग मोठा असावा आणि अंमलबजावणी करणार्‍यांच्या तसेच राजकीय पातळीवरसुध्दा तिच्या संबंधाने उत्साह दिसून यावा याबाबत दक्ष आहेत. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदी यांनी या योजनेची कल्पना जाहीरपणे मांडली होती आणि काल तिचे औपचारिक उद्घाटन होईपर्यंतच्या पंधरा दिवसात देशभरात मोठी यंत्रणा कार्यरत करून काल एका दिवसात या योजनेखाली दीड कोटी लोकांची बँक खाती सुरू करण्यात आली. येत्या २६ जानेवारीपर्यंत हाच माहौल कायम ठेवून साडेसात कोटी लोकांची बँक खाती उघडली जाणार आहेत. नरेंद्र मोदींनी या निमित्ताने केलेल्या भाषणात देशातले आर्थिक अस्पृश्यता संपवण्यासाठी ही योजना असल्याचे म्हटले आहे. जनतेला राजकीय लोकशाही बरोबरच आर्थिक लोकशाहीही मिळाली पाहिजे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हीच गोष्ट हेरून व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तत्पूर्वी सामान्य माणसाचा बँकेशी काहीही संबंध येत नसे. पण राष्ट्रीयीकरणामुळे कनिष्ठ मध्यमवर्गसुध्दा बँकेत जायला लागला. बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करायला लागला.

असे असूनही त्याही खालचा वर्ग म्हणून मानला गेलेला ४० टक्के समाज बँकेपासून दूरच होता. देशाचे ४० टक्के मनुष्यबळ आर्थिक प्रवाहापासून दूर असेल तर देशाचा विकास होणे शक्य नाही. म्हणून विकासाला चालना देणारी एक योजना म्हणूनही तिच्याकडे पाहता येईल. तिचा आणखी एक फायदा होईल. बँकेशी संबंध नसलेला हा वर्ग आपल्या जवळचे पैसे नेहमी गाडग्या मडक्यात आणि डब्यात साठवत असतो. त्यांचा हा पैसा आता बँकेत राहिल्यामुळे सुरक्षित तर राहीलच पण त्यांच्याच पैशातून याच वर्गातल्या गरीब लोकांना ५ हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट मिळणार आहे. म्हणजे बँकेपासून दूर राहिलेल्या वर्गाचा पैसा त्याच वर्गामध्ये रोजगार निर्मितीसाठी वापरला जाणार असून ते पैसे ठेवणार्‍याला व्याजही मिळणार आहे. आजवर मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांनी हेच केले. त्यांचा पैसा बँकेत ठेवला गेला. त्यातून त्याच वर्गातल्या लोकांना कर्जेही मिळाली आणि या वर्गाचा पैसा आपापसात खेळता राहून, वापरात राहून त्यांच्याच उत्कर्षासाठी उपयोगी आला. हीच प्रक्रिया आता आजवर बँकांपासून दूर राहिलेल्या गरीब लोकांत वेगाने सुरू होणार आहे. मोदी यांना समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या परिस्थितीचे त्यंाना चांगले भान आहे त्यातून ही योजना पुढे आली आहे.

Leave a Comment