वातावरण बदलेल

election
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुका आणि त्यातल्या त्यात बिहारमधील पोटनिवडणुकांचा निकाल सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून अतीशय निराश अवस्थेत कालक्रमण करणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आपला पक्ष अगदीच काही गाळात नाही अशी त्यांची भावना झाली आहे. विशेषत: सर्वांच्या नजरा ज्या बिहारकडे लागल्या होत्या त्या बिहारात लालूप्रसाद यादव यांच्या राजनीतीला यश आले आहे. मोदी वादळाचे आव्हान कमी झालेले दिसले आहे. लालूप्रसाद हा माणूस कसा आहे हे आपल्याला माहीत आहे. पराभवाच्या खाईत असला तरीही आक्रमकपणे बोलत असतो. आता तर काय आपण मोदी लाट अडवली असल्याचा दावा करता येईल अशी स्थिती आहे. आता तर खुशीत आहेतच. त्यांनी नितीशकुमार यांचा जनता दल (यू) शी युती केली होती आणि या युतीत कॉंग्रेस पक्षही होता. पण लालूप्रसाद यांच्याएवढा कॉंगे्रसच्या नेत्यांना आनंद झालेला नाही.

बिहारच्या पोटनिवडणुकांत लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे दोन प्रतिस्पर्धी गळ्यात गळे घालून कॉंगेसला सोबत घेऊन मैदानात उतरले होते. तेव्हा कुठे त्यांना भाजपाचा रथ अडवता आला आहे. या गोष्टीची चर्चा आता महाराष्ट्रात होणे अपरिहार्य आहे कारण महाराष्ट्रातले भाजपा-शिवसेना युतीचे नेते सत्ता हाती आल्याच्या आनंदात वागत होते. काही वाहिन्यांनी महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर युतीला २१० जागा मिळतील असे अंदाज व्यक्त केले आहेत. या गोष्टीने सुद्धा भाजपाच्या नेत्यांना सत्ता आता दोन बोटे उरली असल्याचा भास व्हायला लागला होता. खरे म्हणजे असे अंदाज किती खरे असतात आणि किती खोटे असतात याचा अनुभव आपण घेतला आहे. तेव्हा युतीच्या आणि महायुतीच्या नेत्यांनी आताच हा अंदाज खरा ठरला आहे असे मानून चालता कामा नये. कारण निवडणूक अजून दूर आहे आणि मोदी लाटेचा महिमा कमी होत आहे. आता बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर काही भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना या निवडणुकीशी मोदींचा काय संबंध, असा सवाल केला आहे. या निवडणुकीचा निकाल लोकसभेसारखा लागला नाही हे त्यांना मान्य आहे पण, त्या त्या राज्यातल्या भाजपा नेत्यांचा पराभव आहे. मोदींचा या निवडणुकीशी काही संबंध नसल्याने या निकालावरून मोदी यांच्या विषयी काही टिप्पणी करण्याचे काही कारण नाही असे त्यांना म्हणायचे आहे.

आता महाराष्ट्रात हाच मुद्दा पणाला लागणार आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचे नेते मोदी लाटेवर सवार होऊनच सत्ता प्राप्त करण्याची स्वप्ने पहात आहेत. पण मोदी यांचा या निवडणुकीशी काही संंबंधच नसेल तर त्यांची लाट महाराष्ट्रात त्यांना सत्ता कशी मिळवून देणार आहे? मोदी लाटेबाबत असे सोय असेल तसे बोलून चालणार नाही. मोदींचा काय संबंध हे वाक्य कॉंग्रेसच्या विश्‍लेषणासारखे वाटायला लागले आहे. विजय मिळाला तर गांधी घराण्याचा करिश्मा आणि पराभव झाला तर तो कार्यकर्त्यांमुळे असे तिथेही बोलले जाते. तेव्हा भाजपामध्ये विजय झाला तर मोदींची लाट आणि पराभव झाला तर मोदींचा काय संबंध? असे विश्‍लेषण व्हायला लागले आहे. ते चुकीचे आहे. तेव्हा प्रामाणिकपणे विश्‍लेषण करून पिछेहाट झाली तरीही ती मोदींमुळेच झाली असे म्हणायला पाहिजे.

बिहारातला निकाल आणखी एक परीने चर्चेला आला आहे. बिहारात मोदी लाट अडवायला मोदीच्या विरोधातल्या सर्वांची युती करावी लागली. ज्यांनी एकमेकांची तोंडे न बघण्याची प्रतिज्ञा केली होती ते लालू आणि नितीश यांना गळ्यात गळा घालावा लागला. त्यात कॉंग्रेस पक्षही सहभागी झाला. चारा घोटाळ्यात अपात्र ठरलेले लालूप्रसाद आणि कॉंग्रेस यांची हातमिळवणी झाली. कॉंगे्रेसच्या नेत्यांना कोणत्याही युतीत दुय्यम स्थान घेण्याची सवय नाही पण बिहारात त्यांना तिय्यम स्थान आहे. पण अशा सार्‍या तडजोडी करून हे सगळे लोक एकत्र आले तेव्हा कोठे मोदींची लाट अडवता आली आहे. आता महाराष्ट्रात मोदी लाट अडवायची असेल तर निदान राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी एका तोेंडाने बोलावे लागेल. पण ते त्यांना अजूनही समजत नाही आणि उमजतही नाही. ते उमजले नाही तर मोदी लाट आपला प्रभाव दाखवणार आहे. निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजाबाबत मोठे सोयीस्कर विश्‍लेषण केले जात असते. बिहारात ऑगस्टमध्ये निवडणुका झाल्या आणि मे महिन्यातली हवा ओसरली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे नेते आनंदी आहेत. पण त्यांना हे सांगावे लागेल की, मे मधील हवा ऑगस्टमध्ये चालत नाही, तशी ऑगस्टमधली हवा ऑक्टोबरमध्ये सुद्धा चालणार नाही. बिहारमध्ये जसे झाले तसेच ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होईल हेही समजणे चुकीचे आहे. कारण महाराष्ट्रात मोदींचा लाट नसली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातली लाट नक्कीच अस्तित्वात आहे. कदाचित त्या विरोधी लाटेमुळे कॉंग्रेसची एवढी वाताहत होऊ शकते की, जिचा अंदाज सुद्धा कोणी केलेला नाही.

Leave a Comment