नव्या पिढीहाती भाजपा

amit-shah
भारतीय जनता पार्टीचे वृध्द नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना सांसदीय बोर्डात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे काही माध्यमांतून आणि वृत्तपत्रांतून टीकेचा सूर आळवला जात आहे. खरे म्हणजे ही टीका रास्त नाही. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला हा बदल योग्यच आहे. जेव्हा अडवाणी फॉर्मात होते तेव्हा त्यांनीही बलराज मधोक, उत्तमराव पाटील, हशू अडवाणी अशा कितीतरी जुन्या नेत्यांना मागे टाकलेले होते. आता अमित शहा यांनी सरकारचे आणि पक्षाचे धोरण निश्‍चित करण्यात ज्यांचा महत्वाचा वाटा आहे अशा अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, अनंतकुमार इत्यादी नेत्यांचा समावेश सांसदीय मंडळात केला आहे. वाजपेयी, अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांचा समावेश मात्र मार्गदर्शक मंडळात केला आहे आणि पाच सदस्यांच्या या मार्गदर्शक मंडळात मोदी आणि राजनाथसिंह या दोघांचाही समावेश झालेला आहे. यावरून माध्यमात जी चर्चा सुरू आहे ती पाहिली म्हणजे मोठे आश्‍चर्य वाटते. विविध माध्यमांनी अडवाणींना अडगळीत टाकण्यात आले, वाजपेयींना बाद करण्यात आले आणि डॉ. जोशी यांना डच्चू दिला, पत्ता काटला असे शब्द वापरून या नव्या रचनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

२००९ साली भारतीय जनता पार्टीचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी निवडणुकीची यंत्रणा आणि पक्ष या दोन्ही गोष्टींवर लालकृष्ण अडवाणी यांचाच वरचष्मा होता परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला फार चांगले यश मिळवता आले नाही. २००४ साली वाजपेयींच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली होती आणि तिच्यात सुद्धा फारसे यश मिळाले नव्हते. २००४ सालची परिस्थिती भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला फारशी अनुकूल नव्हती आणि वाजपेयी सरकारच्या विरोधात प्रस्थापित विरोधी भावना थोडी तयार झाली होती. त्यामुळे वाजपेयींच्या नेतृत्वाखाली २००४ साली पराभव झाला, तो एका परीने साहजिक होता आणि त्यावेळी कॉंग्रेसलाही फार देदिप्यमान यश मिळाले नव्हते. भारतीय जनता पार्टीला १३७ आणि कॉंग्रेसला १४३ जागा मिळाल्या होत्या. पण २००९ साली कॉंग्रेस पराभूत व्हायला पाहिजे होती. कारण तसे वातावरण होते. मात्र अडवाणींच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्या निवडणुकीत अडवाणी पक्षाला यश मिळवून देऊ शकले नाहीत. उलट कॉंग्रेसच्या जागा १४३ वरून २०६ झाल्या आणि भाजपाच्या जागा १३७ वरून ११२ पर्यंत खाली आल्या. २००९ साली संधी असून ज्या अडवाणींना पक्षाला सत्ता मिळवून देता आली नाही तेच अडवाणी अजूनही २०१४ साली आपल्यालाच महत्वाची भूमिका मिळावी असा अट्टाहास करत आहेत. स्वत:हून सन्मानाने पक्षाच्या दैनंदिन व्यवहारातून निवृत्त होण्याऐवजी सत्तेची हाव धरून बसले आहेत.

अडवाणींना निवृत्त व्हावेसे वाटत नाही आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक डावलावे लागत आहे आणि माध्यमांना अडवाणींना डावलले, अडवाणींना अडगळीत टाकले असे मथळे देण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे माध्यमे सुद्धा त्यांची दया आल्यागत त्यांच्या डावलण्यावर आक्रोश करायला लागले आहेत. २००९ नंतर याच माध्यमांनी काय चर्चा केल्या होत्या याचा नमुना पाहिला तर हसू आल्याशिवाय रहात नाही. २०१० च्या सुमारास राहुल गांधी थोडे आक्रमक व्हायला लागले होते आणि माध्यमांमधून २०१४ ची लढत कशी होईल यावर काही अंदाज बांधले जायला लागले होते. त्या सर्वांनी २०१४ च्या निवडणुकीत मोठे मोठे मथळे देऊन २०१४ सालची निवडणूक ८६ वर्षीय अडवाणी विरुद्ध ४० वर्षीय राहुल गांधी यांच्यात असेल असे प्रतिपादन केले होते आणि त्या प्रतिपादनात अडवाणींचा उपहास केलेला होता. निवृत्तीच्या वयात अडवाणी दंड थोपटून उभे आहेत आणि ते हास्यास्पद आहे असे प्रतिपादन माध्यमे करत होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हा घटक पुढे आलेला नव्हता आणि अडवाणीशिवाय पक्षाला कोणी नेता नाही असे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे अडवाणीच नेते होणार असे समजून त्यांची टवाळी केली जात होती.

आता नरेंद्र मोदी यांनी पक्षाला उज्ज्वल यश मिळवून दिले आहे. ज्या राज्यात भाजपाला पाय ठेवायलाही जागा नाही असे म्हटले जात होते. तिथे भाजपाने पाय रोवले आहेत. एकंदरीत संघटना आणि सरकार या दोन्ही पातळ्यांवर अडवाणींना जे जमले नाही ते मोदी करत आहेत. अशावेळी पक्षावर ३० वर्षे वर्चस्व असलेली जुनी पिढी बाजूला सरकवली जात असेल तर त्यात वावगे काय? पक्षात जुनी पिढी बाजूला सरकून नव्या पिढीच्या हाती सूत्रे यावीत यात जगावेगळे काही घडत आहे की काय? भाजपाला चांगली दिशा देण्याची क्षमता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकर्‍यांत असताना त्यांनी पुन्हा नव्वदी गाठणारे अडवाणी आणि घराच्या बाहेर पडू न शकणारे वाजपेयी यांनाच मानाची पदे द्यावीत की काय याचे उत्तर माध्यमांनी दिले पाहिजे. दुसर्‍या पक्षात अशावेळी काय घडते. कॉंग्रेसमध्ये किती जुने नेते अडगळीत टाकले गेले आहेत. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदावरून उतरले त्यानंतर त्यांच्या घरी त्यांना भेटायलासुध्दा कोणी गेले नाही. जनता दलातले जॉर्ज फर्नांडिस कोठे आहेत? कोणत्याही राजकीय पक्षाला दर पिढीमागे नेतृत्वाची सूत्रे नव्या पिढीला द्यावीच लागतात. अशावेळी थोडीशी खळबळ माजते. जुने लोक कुरकुर करतात परंतु जेव्हा आगगाडी रुळ बदलते तेव्हा थोडा खडखडाट होतच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Comment