बिहारात वारे बदलत आहे

election
गेल्या मे महिन्यात मोदी लाट होती पण आता लालूप्रसाद यादव यांच्या प्रयत्नामुळे बिहारात तरी या वादळाचे आव्हान कमी झाले आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीने तसे दाखवून दिले आहे. जुलैमध्ये उत्तराखंडात झालेल्या विधानसभेच्या चार पोटनिवडणुकांतही तशी सूचना मिळाली होती. तीन जागा कॉंग्रेसला मिळाल्या आणि एक जागा भाजपाला मिळाली. या घटनेनंतर आता काल झालेल्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याही पोट निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा कमी झाल्याचे दिसले आहे. पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांत पोटनिवडणुका झाल्या. त्यांचे निर्णय भाजपाला फार आनंददायक नाहीत. मोदी लाटेत भाजपाचे सगळेच विरोधक वाहून गेले होते. पण आता झालेल्या पोटनिवडणुकांत तसे घडले नाही. पंजाबात एक जागा अकाली दलाला आणि एक जागा कॉंग्रेसला मिळाली आहे. कर्नाटकात तीन पैकी एक जागा भाजपाला आणि दोन जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. मध्य प्रदेशातल्या तीन पैकी दोन जागा भाजपाला आणि एक जागा कॉंग्रेसला मिळाली आहे.

बिहारच्या निकालाने देशात मोठी खळबळ माजली आहे. तिथे १० विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होती. त्यातल्या सहा जागा कॉंग्रेस, जनता दल (यू) आणि कॉंग्रेस या युतीला मिळाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यातल्या आठ जागांवर भाजपाला सर्वात जास्त मते मिळाली होती. भाजपाला या आठ जागा मिळाल्या असत्या तर मोदी लाट टिकली आहे असे म्हणता आले असते. भाजपाचा हा पराभव आहे आणि मोदी लाट ओसरली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. भाजपाच्या नेत्यांचे काही मुद्दे पुढे येऊ शकतात. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला बिहारातल्या लोकसभेच्या ४० पैकी ३१ जागा मिळाल्या होत्या. गेल्या आठवडयात इंडिया टुडे या इंग्रजी साप्ताहिकाने एक सर्वेक्षण केले आणि त्याचे निष्कर्ष एका वृत्तवाहिनीवरून जाहीर केले. आता लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाला ३४ जागा मिळतील असा या सर्वेक्षणाचा दावा होता. याचा अर्थ या सर्वेक्षणातून मोदींची लोकप्रियता वाढल्याचे दिसत होते पण आता लागलेले पोटनिवणुकीचे निकाल या अंदाजाशी मेळ बसणारे नाहीत. आता यावर काही लोकांची मखलाशी आहे की मोदींची लोकप्रियता आणि लोकांनी मोदींना दिलेली पसंती ही लोकसभेसाठी हाेती. विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा कमी मिळाल्या याचा मोदींच्या लोकप्रियतेशी काही संबंध नाही.

हे म्हणणे मान्य करतानाच आपल्याला एक प्रश्‍न भाजपाच्या नेत्यांना विचारता येईल की, असे जर आहे तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोदीची जादू चालणार नाही असे समजायचे का ? बिहारच्या पोट निवडणुकांच्या निकालातला एक मुद्दा मात्र विचारात घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे दोन प्रतिस्पर्धी गळ्यात गळे घालून कॉंगेसला सोबत घेऊन मैदानात उतरले होते. तेव्हा कुठे त्यांना भाजपाचा रथ अडवता आला आहे. पण हे होण्यासाठी लालू आणि नितीश यांना एकत्र यावे लागले. १९९० च्या दशकात ते एकत्रच होते पण १९९६ साली लालूंनी आपला स्वतंत्र पक्ष काढला. जनता दलाचे विघटन होऊन अनेक पक्ष अस्तित्वात आले. नंतर नितीशकुमार आणि लालूप्रसाद हे एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. आता मोदींचा प्रभाव बघून या दोघांनाही याचा साक्षात्कार झाला की आपण आता जुने वैर विसरून एकत्र आलो नाहीत तर आपण दोघेही राजकारणातून संपून जाणार आहोत म्हणून आपण आता सारे काही विसरून एक झाले पाहिजे. मरता क्या न करता असे म्हणतात ते काही खोटे नाही. या तीन पक्षांनी मोदींचा प्रभाव कमी करण्याचा चंग बांधला तेव्हा कुठे दहा पैकी सहा जागा या त्रिकुटाला मिळाल्या.

आता ही मैत्री फायद्याची ठरत असल्याचे दिसत आहे आणि आता लालू आणि नितीश या दोघांनीही ‘ए दोसती हम नही छोडेंगे’ हे गाणे म्हणायला सुरूवात केली आहे. तेव्हा त्यातल्या त्यात भाजपाला एक दिलासा आहे. की मोदींचा प्रभाव कमी झाला आहे पण त्यासाठी या तिघांना मोदी विरोधी महा आघाडी तयार करावी लागली आहे. हा म्हटले तर दिलासा आहे आणि म्हटले तर आत्मचिंतनाचा मुद्दा आहे. आता हे तिघे आता तरी आनंदात आहेत आणि बिहार विधानसभेची निवडणूक २०१५ साली व्हायची आहे. या निवडणुकीत ही महायुती झाली तर ती भाजपाला चांगलेच रोखण्यात यशस्वी होणार आहे. या निकालावरून महाराष्ट्रालाही काही संकेत मिळत आहे त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण महाराष्ट्रात मोदी लाट टिकून राहिली आहे का असा प्रश्‍न विचारला जात आहे. कोणतेही अंदाज नेहमी खरे ठरतात असे नाही. बिहारात मोदी लाट कायम टिकली नाही म्हणून ती महाराष्ट्रातही टिकणारच नाही असेही काही सांगता येत नाही. मोदी लाट टिकणेच काय पण तिच्यापेक्षा भारी कॉंग्रेस लाट निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने इमाने इतबारे केलेलेच आहे. तेव्हा आधी महाराष्ट्राच्या आणि नंतर बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय घडते ते पाहू या.

Leave a Comment