भ्रष्टाचाराचा पोलखोल

corruption
यूपीए सरकारचे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांनी निव्वळ नामधारी काम पाहिले. त्यांना आपल्या कार्यकाळात होत असलेल्या भ्रष्टाचाराची जाणीव होती पण त्यांनी आपले ते नामधारी पद टिकावे म्हणून त्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचेच काम केले. हे आता एका मागे एक पुढे येत असलेल्या पुराव्यावरून दिसून यायला लागले आहे. आता पुढे येत असलेले पुरावे हा काही गौप्यस्फोट नाहीत. त्यात नवे काही नाही. स्वत: मनमोहनसिंग यांनीच २ जी स्पेक्ट्रम प्रकरणाविषयी बोलताना ए. राजा यांना पाठीशी घातल्याचे कबूल केले होते आणि तसे केले नसते तर आपल्याला सत्ता गमवावी लागली असती हे मान्यही केले होते. त्यानंतर त्यांचेच प्रसिद्धी प्रमुख संजय बारू यांनी आपल्या अपघाती पंतप्रधान या पुस्तकात मनमोहनसिंग यांच्या बोटचेप्या धोरणाला दुजोरा दिला होता. आता महालेखापाल आणि नियंत्रक विनोद राय यांनीही एक पुस्तक लिहून मनमोहन सिंग यांच्या दुबळेपणावर प्रकाश टाकला आहे. कोळसा खाण भ्रष्टाचार प्रकरणातील काही आरोपींची नावे वगळावीत यासाठी पंतप्रधानांचे दूत आपल्याला भेटले होते असे राय यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत काही पुस्तकांनी मनमोहनसिंग यांचे चांगलेच वस्त्रहरण केले आहे. संजय बारू यांच्या आधी कोळसा विभागाचे सचिव पी.सी. पारख यांनीही, क्रुसेड ऑर कॉन्स्पिरसी, या पुस्तकात कोळसा विभागातल्या काळ्या कारभाराचे दर्शन घडवले होते. कोळसा खात्यात खाणींचे परवाने देण्याबाबत आपलेच म्हणणे ऐकावे असा दबाव आपल्यावर आणला जात होता आणि हे काम कोळसा मंत्री शिबू सोरेन हे करीत होते असे पारख यांनी म्हटले होते. कोळसा खात्याचा कारभार मनमोहनसिंग यांच्या हातात असतानाही असाच प्रकार घडत होता. हे सारे प्रकार मनमोहन सिंग यांना माहीत होते असे पारख यांनी सांगितले आहे. त्यानंतर माजी परराष्ट्र मंत्री नटवरसिंग यांनीही आपल्या आत्मनिवेदनपर ग्रंथात यूपीए सरकारचा कारभार कसा चालला होता यावर प्रकाश टाकला आहे. हे सारे पुस्तक बॉम्ब कोणा त्रयस्थ व्यक्तींनी टाकलेले नाहीत. सत्तेच्या शिखराच्या आसपास वावरलेल्या आणि अधिकृत लोकांनी टाकलेले आहेत. शिवाय निवृत्त सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनीही काही बॉंबगोळे टाकून या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पोलखोल केला आहे. कारण काटजू यांनी केलेल्या गौप्यस्फोटात तर मनमोहनसिंग यांनी आपली खुर्ची टिकावी म्हणून चक्क भ्रष्ट न्यायमूर्तीची नेमणूक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयावर दबाव टाकला आणि ते न्यायालयही त्याला बळी पडले.

या सगळ्या पुस्तकांतल्या मजकुराचा सारांश काढायचा प्रयत्न केला तर हे लक्षात येते की, गेली दहा वर्षे दिल्लीत सरकारी पैशांचा बेमुर्वतपणे वापर करणारे सरकार बसले होते. पंतप्रधानांना हा गैरवापर रोखता येत होता पण त्यांनी अत्यंत दुबळेपणाची भूमिका वठवली आणि आपले सारे अधिकार सोनिया गांधी यांच्या पायाशी अर्पण केले. कारण त्यांनाही पदाचा मोह होता आणि ते पद सोनिया गांधी यांच्या कृपेनेच टिकणार होते. या सर्व पुस्तकातून करण्यात आलेले आरोप खरे आहेत की नाही यावर खूप चर्चा झाली. एखादा पुस्तक बॉंब टाकला गेली की कॉंग्रेस पक्षाला नव्याने धक्का बसत होता आणि तिरीमिरीत कॉंग्रेसचे नेते काही तरी अतार्किक प्रतिक्रिया व्यक्त करून बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत होते. त्या प्रतिक्रियेत या पुस्तकातल्या आरोपांना कधीच थेट उत्तर दिले गेले नाही. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे मनमोहनसिंग हे नामधारी पंतप्रधान होते का? सत्तेचे खरे लाभ सोनिया गांधी आणि त्यांच्या भोवती जमलेले संधीसाधू लोकच उपभोगत होते हे खरे आहे का या प्रश्‍नाचे थेट आणि सोपे उत्तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी कधी दिले नाही.

तसे उत्तर देणे त्यांना सोयीचे नव्हते त्यामुळे त्यांनी कधी पुस्तकाच्या लेखकांवर हेत्वारोप केले. तरी कधी त्या लेखकांना संधीसाधू अशी शिवी देऊन मूळ प्रश्‍नाला बगल दिली. एवढ्यावर आपला दोष झाकला जात नाही असे दिसायला लागताच त्यांनी हे आरोप आताच का केले जात आहेत असा प्रश्‍न करून विषय बदलण्याचा प्रयत्न केला. बरे हे आरोप आताच करणे चुकीचे असेल तर ते कसे चुकीचे आहे हेेेेेेेेेेेेेेेेेेेे त्यांनीही कधी स्पष्ट केले नाही. एका लेखकाचा हेतू वाईट आहे असे मानले तरी सर्वच लेखक वाईट हेतूने लिहीत आहेत असे काही म्हणता येत नाही. या लेखकांत एक परराष्ट्र मंत्री, एक महालेखापाल, एक प्रसिद्धी प्रमुख, एक माजी सरन्यायाधीश आणि एक सचिव आहेत. हे चौघेही निरनिराळ्या खात्यांत होते. ते एकत्र काम करीत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी एकत्र बसून वाईट हेतूने काही लिखाण केले आहे असेही काही म्हणता येत नाही. उलट ते निरनिराळ्या ठिकाणी कामे करीत असल्याने मनमोहनसिंग सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे पाच सहा निरनिराळे पैलू समोर आले आहेत. यावर मनमोहनसिंग यांनी कधीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. केवळ नटवरसिंग यांच्या पुस्तकावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आपण त्यांच्या आरोपांना पुस्तक लिहूनच उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. आता सोनिया गांधी काहीतरी लिहिणार हाच विनोद आहे. उत्तर कसले देणार?

Leave a Comment