शिवसेनेचे मनसेच्या ‘थीम पार्क’ला ग्रहण?

mns
मुंबई – शिवसेना आणि मनसे कायमच संघर्षाच्या पवित्र्यात असतात आणि आता या दोघांमध्ये एक वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली असून मनसेच्या थीम पार्कला सेनेने विरोध करत त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेने मनसेचे थीम पार्क ज्या जागेवर साकारण्यात येणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार केली आहे. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

कांजूर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये शिवसेनेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. मनसे आमदार मंगेश सांगळे यांनी फक्त भांडुपेश्वर कुंडाच्या सुशोभिकरणाची परवानगी घेतली असून मतांसाठी हे अनाधिकृत थीम पार्क बनवण्याचा घाट घातला जात असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, म्हाडा आणि महापालिकेने या जागेबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच मीठागराच्या जागेबाबतच्या प्रश्नावर चर्चा होईल असे मनसेने म्हटले आहे. भूमी पूजनाच्या परवानगीला कोणीही आक्षेप घेतला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment