
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ‘एकला चलो रे’ – पटेल
पटेल यांनी मुंबईत काही पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह असल्यामुळे पक्षाने त्या दृष्टीनेही तयारी ठेवली असल्याचे सांगितले.
जागा वाटपाच्या मुद्यावर आम्ही तडजोड करायला तयार नाही, आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तसे झाले नाही, तर आमची स्वबळाची तयारी असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
