मुख्यमंत्र्यांचा पळ

prithviraj-chavan
कॉंग्रेस श्रेष्ठींनी आपल्या मुख्यमंत्र्यांना नरेन्द्र मोदी यांच्या सभांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नरेंद्र मोदी यांच्या नागपूरमधील कार्यक्रमांपासून दूर राहिले. मुख्यमंत्री मोदींच्या सोबत व्यासपीठावर उपस्थित राहिले तर त्यांची फजिती होईल म्हणून त्यांनी दूर रहावे, असा सल्ला त्यांना श्रेष्ठींनी दिला आहे. ही एक विसंगती आहे हे कोणाच्या लक्षात आलेले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधी अनेक वेळा नरेंद्र मोदी यांना एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले होते. आता मात्र अशी समोरासमोर येण्याची संधी मिळत असताना ते तिच्यापासून दूर रहात आहेत. गुजरातपेक्षा महाराष्ट्र अधिक विकसित आहे असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी समोरासमोर यावे असे आव्हान ते देत आहेत, पण प्रत्यक्षात ते मोदींच्या सोबत एका व्यासपीठावर आले तेव्हा मात्र त्यांंनी महाराष्ट्राच्या विकासाच्या सकारात्मक गोष्टी सांगण्याऐवजी महाराष्ट्रातले किती सेझ प्रकल्प किती दिवसांपासून रखडले आहेत याचे रडगाणे गाणे पसंत केले.

गुजरातपेक्षा महाराष्ट्र अधिक प्रगतीशील आहे असे दावे अन्यत्र करायचे आणि समोर आल्यावर महाराष्ट्र कसा अधिक प्रगत आहे हे सांगण्याऐवजी रडगाणे गायचे हा काय प्रकार आहे ? त्यांनी महाराष्ट्र भकास होत असतानाही विकासाच्या डरकाळ्या फोडल्या आहेत. आता मोदींच्या समोर या डरकाळ्या चालणार नाहीत म्हणून त्यांच्या सभांपासून पळ काढायला सुरूवात केली आहे. बोलताना मात्र आपण त्यांच्या सभांवर बहिष्कार घालत आहोत अशा बढाया मारल्या आहेत. खरे तर हा बहिष्कार नसून मोदींच्या सभेपासून काढलेला पळ आहे. काल नवे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नागपूरला भेट दिली. त्यांनी शेतकरी कुटुंबाला भेट दिली नाही पण, त्यांच्या मनात विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची काळजी होती. ते केवळ ती काळजी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी या आत्महत्या रोखण्याचा उपाय जाणला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. मोदी या गोष्टी बोलत असतील तर पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या समोर व्यासपीठावर येणारच नाहीत कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याच कार्यकाळात विदर्भातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत. आता आता तर मराठवाडयातले शेतकरीही त्याच मार्गाने जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी अवर्षण आणि कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या करीत आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या सभेत उपस्थित राहण्याचा काही नैतिक अधिकारच नाही. विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची मनमोहनसिंग यांच्याही सरकारने कधी दखल घेतली नव्हती. या दोन पंतप्रधानांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीतला हा फरक फार चटकन लक्षात येतो कारण मनमोहनसिंग यांना आत्महत्येच्या कारणाची जाणीवही नव्हती. मोदी मात्र त्याच्या मूलभूत कारणांचा विचार करीत आहेत. त्यांची वाटचाल फार विचारपूर्वक आणि निश्‍चित दिशेने सुरू आहे. त्यांनी नागपूर शहरातल्या मेट्रो प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पार पाडला. या प्रकल्पाला केवळ दोन महिन्यात मंजुरी मिळाली आहे. मोदी सरकारच्या निर्णय घेण्याबाबतच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलेली मोदी लाट अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. काही वेळा महाराष्ट्रातल्या काही कॉंगे्रेस नेत्यांना आता मोदी लाट ओसरली असावी असे वाटते. पण त्यांचा भ्रम दूर होत आहे. मोदी यांना बघायला अजूनही लोक येत आहेत. लोक त्यांचे भाषण कानात प्राण आणून ऐकत आहेत. म्हणूनच हरियाणा, झारखंड आणि हरियाणात झालेल्या त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळत आहे. हे लोक केवळ मोदी यांना बघायला अाणि ऐकायला येत आहेत.

ते जोपर्यंत व्यासपीठावर येत नाहीत तोपर्यंत हे मोदीप्रेमी लोक दुसर्‍या कोणाचीही भाषणे ऐकतात पण एकदा मोदी व्यासपीठावर आले की, लोक त्यांचे भाषण ऐकायला आतुर होतात. त्या वेळी अन्य कोणी भाषण केले तर त्यांना ते ऐकायचे नसते. म्हणून अशा वक्त्याला ते आरडा ओरडा करून खाली बसवतात. आता कॉंग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना मोदी पासून दोन हात दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मोदींच्या आक्रमकतेचा कॉंग्रेसने धसकाच घेतला आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांना जनता खाली बसवत आहे. कारण आज लोकांना कॉंग्रसच्या नेत्यांचे भाषण ऐकायचे नाही. कॉंग्रेसचे नेते या प्रकाराबद्दल मोदी यांना आणि भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत.

खरे तर या प्रकाराशी भारतीय जनता पाटींचा काही संंबंध नाही. त्यांना आपल्या मुख्यमंत्र्यांची इभ्रत प्यारी असेल तर त्यांनी या मुख्यमंत्र्यांना मोदीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्याऐवजी त्या सभांत भाषणे न करण्याचा आणि भाषण केलेच तर मर्यादेत करण्याचा सल्ला दिला पाहिजे. उगाच पक्षीय मुद्दा काढून त्यांनी मोदींची खोडी काढता कामा नये आणि त्यांना चिमटे वगैरे घेता कामा नये. अशा सभांत केवळ मोदी बोलले तर कॉंग्रेसने काहीही तक्रार करण्याचे कारण नाही. कारण कॉंग्रेसचीही अशीच परंपरा आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या पंतप्रधान म्हणून किंवा पक्षाच्या अध्यक्षा म्हणून कोठे सभेला गेल्या तर त्यांच्या व्यासपीठावर एक किंवा दोघांनाच प्रवेश असे आणि त्यांच्या उपस्थितीत अन्य कोणीही भाषण करायचे नाही असा दंडक असे. हाच नियम सोनिया गांधीही पाळतात. मोदी तसे करीत नाहीत आणि ज्या ठिकाणी जाऊ तिथल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या सोबत घेतात. त्यांना व्यासपीठावर पाचारण करतात पण या मोकळेपणाचा कोणी गैरफायदा घेत असतील तर त्यांना टोला लगावलाच पाहिजे.

Leave a Comment