मराठवाड्याची दु:स्थिती

rain
महाराष्ट्रावर यंदा पावसाची अवकृपा झाली आहे. त्यातल्या त्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बरा पाऊस पडला असला तरी तो सरासरीपेक्षा कमीच आहे. कोकणात सरासरीच्या ८७ टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या केवळ ७० टक्के तर मराठवाड्यात ३८ टक्के इतका दयनीय पाऊस झाला आहे. महाराष्ट्राला अवर्षणाचे संकट सतावत आहेच पण विभागनिहाय विचारच करायचा झाला तर मराठवाड्यातली स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. मराठवाड्यातली शेती प्रचंड मागासलेली आहे. शेतकर्‍यांकडे जोडधंदे म्हणाव्या त्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे पावसाने ताण दिला की, केवळ एखाद्या पिकावर अवलंबून असलेला हा शेतकरी एकदम उघडा पडतो. दुष्काळाशी सामना करण्याची जेवढी ताकद प्रगत मध्य महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांमध्ये असते तेवढी ताकद मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांकडे नसते, शिवाय मराठवाडा हा औद्योगिकदृष्ट्या सुद्धा मागासलेला असल्यामुळे शेतीत राबणार्‍या माणसाला उद्योगात पर्यायी रोजगार सुद्धा मिळत नाही. त्यामुळे हा वर्ग स्थलांतर करतो.

हवामान खात्याच्या अंदाजांत देशभरात सरासरी ९० टक्के पाऊस पडेल असे सांगितले जात असले देशाच्या सगळ्या भागांत तो तेवढा नसतो. उत्तर प्रदेश, उत्तरांचल, बिहार, आसाम या राज्यांमध्ये यावर्षी आतापर्यंत तरी चांगला पाऊस झाला आहे, परंतु मराठवाडा आणि साधारणत: दक्षिणेतली सगळी राज्ये भीषण अवर्षणाचा अनुभव घेत आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्याच जलसाठ्यातील पाणी खोल गेले असून सरासरी १५ टक्के पाणी शिल्लक आहे. ऑगस्ट महिन्यातल्या उत्तरार्धातली ही परिस्थिती आहे. ऑक्टोबर पासून पुढचे सगळे महिने मराठवाड्यात पाण्यासाठी किती हायहाय होईल याचा अंदाज सुद्धा करवत नाही. आता आपण फक्त गणपतीच्या काळात आणि नवरात्रात भरपूर पाऊस पडावा एवढीच प्रार्थना करू शकतो. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाचे गांभीर्य कमी करण्यासाठी आतापासून दिवाळीपर्यंत चांगला पाऊस पडणे याशिवाय दुसरा कसलाही पर्याय नाही. म्हणजे आता सर्वांनाच आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय काही इलाज राहिलेला नाही. नांदेड जिल्ह्यात टंचाईपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने इतरही जिल्ह्यांमध्ये टंचाईसदृश्य स्थिती जाहीर केली आहे. मात्र अन्य जिल्ह्यांमध्ये ही घोषणा फक्त अवर्षणग्रस्त तालुक्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधून सगळ्याच तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

जलसाठ्यातले पाणी वाढले नाही तर मराठवाड्यातील कित्येक गावे केवळ पाणी नसल्यामुळे उठणार आहेत. दुष्काळामध्ये आता काही प्रमाणात चारा आणि पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्ध होत आहे. कारण चारा बाहेरून आणता येतो आणि धान्य सुद्धा आणता येते. पण पाणी असे बाहेरून आणता येत नाही. त्यामुळे चारा आणि धान्याची विपुल उपलब्ध असूनही केवळ पाणी टंचाईमुळे गावे उठू शकतात. मराठवाड्यातले होणारे असे स्थलांतर हा केवळ दुष्काळाचा विषय नसतो, तो एक गंभीर स्वरूपाचा सामाजिक विषय असतो हे कधीही विसरून चालणार नाही. कारण गावामध्ये दोन वेळा खायला मिळून सुद्धा हा दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या शहराच्या झोपडपट्ट्यात जाऊन राहतो आणि तिथे मानवतेला कलंक वाटेल अशा परिस्थितीत जगत राहतो. खेड्यातून शहरांकडे होणारे असे स्थलांतर शहरात तर नवे प्रश्‍न निर्माण करतेच पण ज्या खेड्यातून ते होत असते त्या खेड्यात सुद्धा अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण करते. ज्याचे चटके दुष्काळाचे निवारण झाल्यानंतर सुद्धा बसत राहतात.

पाऊस-पाणी चांगले होते आणि शेतातली कामे सुरू होतात तेव्हा कामाला माणसे मिळत नाहीत आणि सारे काही छान असूनही शेती कसली जात नाही. आज महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्यांमध्ये स्थलांतरामुळे निर्माण झालेला हा प्रश्‍न दिसत आहे आणि भेडसावतही आहे. १९७२ च्या दुष्काळामध्ये आणि त्यानंतर आलेल्या काही दुष्काळामध्ये भूकबळी पडले नाहीत, परंतु स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाले. आताच्या दुष्काळामध्ये स्थलांतर तर सुरू आहेच पण स्थलांतर ही सुद्धा एक मनाची कुतरओढ करणारी प्रक्रिया असते. ज्याच्याकडे शेतीवाडी नाही तो उठून शहरात जाऊ शकतो, परंतु ज्याच्या मालकीचा छोटामोठा जमिनीचा तुकडा आहे त्याचे स्थलांतर सोपे नसते. एक तर त्याचा जीव जनावरे आणि जमिनीत गुंतलेला असतोच, पण त्या दुष्काळी परिस्थितीत सुद्धा तो आपल्या जमिनीचा मालक असतो. स्थलांतर करून तो दुसर्‍या गावात जातो तेव्हा तिथे तो नोकर म्हणून काम करतो आणि तसे काम करणे त्याच्या मनाला वेदना देणारे असते. किंबहुना अशा वेदनांचा अंदाज आला तरी तो अस्वस्थ होतो. ही वेदना, नापिकी आणि कर्जबाजारीपणा या सगळ्या संकटांनी कोंडी होऊन काही शेतकरी आत्महत्येचा मार्ग आक्रमतात. आजवर अनेक दुष्काळ येऊन गेले पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत. या दुष्काळात मराठवाड्यात दररोज सरासरी दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही मोठी भयसूचक आकडेवारी आहे.

Leave a Comment