हत्त्येचे राजकारण

dabholkar
अंध:श्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला आता वर्ष पूर्ण होत आले आणि त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जे कार्यक्रम झाले ते कार्यक्रम म्हणजे श्रद्धांजली होती की हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात राळ उठविण्याची मोहिम होती हे कळत नाही. इतका या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांविरुद्ध निष्कारण आवाज उठविण्यात आला. दाभोळकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत असे एका बाजूला म्हणत असतानाच दुसर्‍या बाजूला ते मारेकरी हिंदुत्ववादीच आहेत अशीही खात्री दिली गेली. एखाद्या हत्येचा असा राजकीय वापर करणे हे सभ्यतेचे लक्षण नाही. पण या निमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न करणार्‍या या समाजवादी मंडळींना सांगणार कोण? कारण ते स्वत:ला फार मोठे पुरोगामी आणि विद्वान समजत असतात. दाभोळकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. महाराष्ट्र सरकार आणि त्याचे पोलीस खाते त्यांच्या मारेकर्‍यांना शोधण्यात अयशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्रात दाभोळकरांच्या कामांविषयी आस्था असलेला मोठा वर्ग आहे.

दाभोळकरांचे मारेकरी सापडले नाहीत याचे सर्वांनाच वैषम्य आहे. पण काही समाजवादी नेते आणि कार्यकर्ते दाभोळकरांच्या हत्येच्या प्रत्येक मासिक श्राद्धाच्या दिवशी मारेकरी सापडलेले नाहीत याची सरकारला आठवण देत आले आहेत. त्यांना आज तर या गोष्टीची आठवण होणे साहजिक आहे. कारण एक वर्ष झाले तरीही मारेकरी सापडलेले नाहीत. हे लोक दु:खी आहेत हे साहजिक आहे. सरकारने आपल्या परीने हे आरोपी शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. त्यावर आता दाभोळकरांच्या या पहिल्या स्मृतिदिनाला टीका होणेही साहजिक आहे. या सगळ्या प्रकारात ही सारी समाजवादी मंडळी काहीसा उथळपणा करीत आहेत. एखादा माणूस दु:खाच्या भरात काही बाही बोलला तर त्याच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले जाते कारण दु:खी मनस्थितीत असताना माणसाचा आपल्या मेंदूवर पूर्ण ताबा नसतो. तो त्या मनस्थितीत उलट सुलट बोलला तरी ते त्याच्या मनातले नसते. तो अनवधानाने तसे बोललेला असतो. आता दाभोळकरांच्या मारेकर्‍यांचा शोध लागत नाही म्हणून हे लोक काही उथळ विधाने करीत आहेत. त्यांची ती विधाने दु:खाच्या भरात काढलेली आहेत दुर्लक्षित करण्याच्या लायकीची नाहीत. त्यांचा हिंदुत्ववादी संघटनां विषयीचा विखार या विधानांतून प्रकट होत आहे. समाजवादी मंडळी अगदी टोकाला जाऊन हिंदुत्ववादी संघटनांचा द्वेष करीत असतात हे काही नवे नाही.

किंबहुना ते त्यांनी घेतलेले व्रतच आहे इतक्या प्रामाणिकपणाने हिंदुत्वद्वेष सतत उगाळत असतात. येता जाता जमेल त्या प्रसंगाला ते काही ना काही निमित्त काढून हिंदुत्ववादी संघटनांना झोडपून काढत असतात. त्यांचा काही संबंध असो वा नसो त्यांना झोडपण्याची संधी ही समाजवादी मंडळी कधी सोडत नाहीत. समाजात हिंदुत्ववादी आणि समाजवादी यांच्यात एक वैचारिक संघर्ष चाललेला आहे असे म्हणून अशा समाजवादी प्रलापांकडे दुर्लक्ष करावे तर त्यात कसलाही वैचारिक मुद्दा चुकूनही आढळत नाही. आता काही समाजवादी जिभा दाभोळकरांच्या निमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात वळवळायला लागल्या आहेत. दाभोळकरांची हत्या हिंदुत्ववादी संघटनेनेच केली आहे अशा या सर्वांची खात्री आहे. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हाही या लोकांनी श्रद्धांजलीपर लेख लिहिले तेव्हा दाभोळकरांचा श्रद्धांजली कमी आणि हिंदुत्ववादी मळमळच जास्त व्यक्त केली. या लोकांनी दाभोळकरांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांनीच घडवली असे ठोकून दिले आहे. हत्येला वर्ष झाले तरीही मारेकरी पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत मग हे सारे भोचक विचारवंत गप्प का बसले आहेत. ज्यांनी हत्या केली असे त्यांना खात्रीशीर वाटते त्यांची नावे ते पोलिसांना का सांगत नाहीत ?

आता तर बाबा आढाव यांनी नवाच शोध लावला आहे. मारेकर्‍यांची नावे पोलिसांना माहीत आहेत पण ते ती नावे दाबून ठेवीत आहेत असे आढाव यांचे म्हणणे आहे. बाबा आढाव यांना एवढीच जर खात्री आहे तर ते ही नावे स्वत:च जाहीर का करीत नाहीत? की त्यांचाही ही नावे जाहीर न करण्यात काही हितसंबंध गुंतला आहे. काही माहीत नसताना हा सारा वावदूकपणा चालला आहे आणि त्यातून हिंदुत्ववादी संघटनांना हिंसाचारी ठरवण्याची हौस भागवून घेतली जात आहे. आमच्या मते ही हत्या हिंदुत्ववादी संघटनांनी केली असण्याची सुतराम शक्यता नाही कारण तसे असते तर महाराष्ट्र सरकारने ही गोष्ट अजीबात लपवून ठेवली नसती. या संघटनांचा हात असल्याचा तिळाएवढा पुरावा सापडला असता तरी या सरकारने सुताने स्वर्ग गाठला असता. हिंदुत्ववादी संघटनांनी एवढ्या मोठ्या माणसाची हत्या केली असूनही ती हत्या करणारांची नावे लपवून ठेवायला काही महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार नाही. समाजवादी पंडितांना हे समजत नसेल पण सारासार विचार करणार्‍या कोणालाही ते कळते. तरीही ही मळमळ का व्यक्त होत आहे ? यामागे मत्सराची भावना आहे. कारण राजकारणामध्ये समाजवाद्यांपेक्षा हिंदुत्ववादी अधिक यशस्वी ठरले आहेत.

Leave a Comment