राणीच्या बागेत अडीच कोटीचे सहा ‘पेंग्विन’ !

penguin
मुंबई – लवकरच परदेशी पाहुणे मुंबईतल्या राणीच्या बागेत कायमच्या वास्तव्यासाठी येणार असून सामान्यत: अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातील ‘पेंग्विन’ हे प्राणी चार महिन्यानंतर राणीच्या बागेत दिसणार आहेत.

सहा पेंग्विन खरेदी करून मुंबई महापालिका राणीच्या बागेत आणणार असून या सहा पेंग्विन खरेदीसाठी तब्बल २ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहेत. तसेच त्यांच्या देखभालीसाठी आणखी १९ करोड रुपयांच्या तरतूदीलास्थायी समिती सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनना येथे आणल्यानंतर त्याच्या प्रकृतीला मानावणारे वातावरण, पाणी तयार केले जाणार असून प्राणिसंग्रहालयात नव्याने बांधण्यात आलेल्या एस्क्प्लोरेशन सेंटरच्या तळमजल्यावर विशेष पक्षीगृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये पेंग्विनसाठी १०० चौ. मीटरचा पिंजरा बांधण्यात येणार असून त्यामधील निम्म्या जागेवर पाणवठा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या पक्ष्याला त्याच्या नैसर्गिक गरजा भागविण्यासाठी गुहा, बीळ व बसण्याकरीता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यासाठी, दोन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना परदेशात पाठवून पेंग्विनना हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय प्राणीसंगहालय प्राधिकरणाने २० पेंग्विन खरेदी करण्याची परवानगी दिली असली तरी सध्या केवळ सहा पेंग्विन म्हणजेच ‘हम्बोल्ट पेंग्विन’च्या तीन जोड्या खरेदी केल्या जाणार आहेत.

Leave a Comment