मौद्यातील एनटीपीसीच्या दोन संचांचे लोकार्पण

narendra-modi
नागपूर – मौद्यातील एनटीपीसीच्या दोन संचांचे लोकार्पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले. राज्य सरकारच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्वागत केले. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

आपल्या लोकार्पण भाषणात मोदी म्हणाले, तुमच्या शहरात, राज्यात वीज असेल तर उद्योग येतात. उद्योग आले की रोजगार मिळतात. पुढे विकासाचे चक्र सुरु राहते. वीज उपलब्धतेवर विकासाचा वेग ठरतो. देशात जिथून शक्य आहे तेथून वीज उत्पादन करण्याचा विचार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचे मोदींनी सांगितले.

त्याचबरोबर मी आतापर्यंत सर्वात जास्त उद्घाटने पायाभूत सुविधांच्या कामांची केली असून त्यातही वीज क्षेत्राची सर्वात जास्त आहेत. भूटानला गेलो, नेपाळला गेलो तेथेही वीज प्रकल्पाच्या कामांना प्राधान्य दिले. देशातही वीजेचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व प्रकारची वीज, ऊर्जा उत्पादन करणे माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात लोकांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, वीजेच्या बचतीचीसाठी लोकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मोदींनी नागरिकांना केले.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ज्या राज्यात कोणत्याही समारंभाला जातात तेथे राज्याचे मुख्यमंत्री एक शिष्टाचार म्हणून उपस्थित राहतात. शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची ही जुनी परंपरा आहे. मात्र या परंपरेला प्रथमच छेद दिला आज दिला गेला आहे. देशाच्या संसदीय इतिसात एखाद्या मुख्यमंत्र्यांने पंतप्रधानाच्या कार्यक्रमावर असा बहिष्कार टाकण्याची पहिलीच वेळ आहे. मात्र, याला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.