सोलापुरात सुशीलकुमार यांची इभ्रत पणाला

sushilkumar-shinde
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या काही मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाची आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची अब्रू पणाला लागणार आहे. अशा मतदारसंघात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येचा प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ सवार्र्ंचे लक्ष वेधून घेणार आहे कारण विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे तिथे पराभवाच्या छायेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा दणदणीत पराभव झाला. ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांचा सोलापूरवर प्रभाव आहे त्यामुळे कितीही जोरदार मोदी लाट आली तरीही शिंदे काही पडायचे नाहीत असे मानले जात होते कारण त्यांच्याविरोधातला भाजपाचा उमेदवार त्यांच्या मानाने फारच किरकोळ होता. सुशीलकुमार शिंदे निसटत्या मताधिक्याने का होईना पण निवडून येतील असे वाटत असतानाच ते तब्बल दीड लाख मतांनी पडले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात शहर मध्य मतदारसंघात भाजपाचे उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा ३१ हजार जादा मते मिळवली ही बाब शिंदे यांच्या पराभवापेक्षा अधिक धक्कादायक ठरली. कारण या मतदारसंघात २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या तब्बल ४० हजारांनी निवडून आल्या होत्या. अशा मतदारसंघात खुद्द शिंदे यांना ३१ हजार मते कमी मिळाली याचा अर्थ या मतदारसंघातल्या ७१ हजार मतदारांनी कॉंग्रेसकडे पाठ फिरवली आहे. २००९ सालचा प्रणिती शिंदे यांचा विजय चांगलाच होता, कारण त्यांनी तीन वेळा आमदार असलेले प्रभावशाली कामगार नेते नरसय्या आडम यांना पराभूत केले होते. अर्थात हा विजय कसा झाला हे अनेकांना माहीत आहे. तो अपघाताने झालेला विजय होता. दरम्यान पुलाखालून भीमेेचे पाणी वाहून गेले आहे आणि प्रणिती शिंदे यांचा प्रभाव ओसरला. यावेळी त्यांना लढत सोपी नाही. कारण त्यांना आता कॉंग्रेसमधूनच आव्हान निर्माण झाले आहे.

सोलापूरच्या राजकारणातला सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव घटण्यास त्यांचे परममित्र विष्णुपंत कोठे हेच जबाबदार आहेत. त्यांनीच २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांचा पराभव घडवून आणण्यात सिहाचा वाटा उचलला होता. श्री. कोठे हे गेल्या २५ वर्षांपासून शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत. त्यांनी हे कार्यालय चालवता चालवता महानगर पालिकेच्या राजकारणावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या मुलाला महापौर केले. हाच मुलगा महेश कोठे हा मनपात कॉंग्रेसचा नेता होता. आपल्या या कामाबद्दल आपल्याला आमदार किंवा खासदार होण्याचेे बक्षिस मिळाले पाहिजे अशी कोठे पिता पुत्राची मागणी आहे. पण ती शिंदे यांना मान्य नाही. २००४ साली शिंदे यांनी लोकसभेला आपल्या पत्नीला उभे केले तेव्हा विष्णुपंत कोठे नाराज झाले. त्याचे फळही उज्ज्वलाताईंना भोगावे लागले. कोठे आणि शिंदे यांच्यात अंतर वाढत चालले.

आपल्याला खासदारपद नाही मिळाले. निदान आता आपला पुत्र महेश याला आमदारपद मिळावे अशी मागणी विष्णुपंतांनी केली. पण सुशीलकुमार शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या कन्येला पुढे केले. महेश कोठे याला शेजारच्या मतदारसंघात म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघात उभे केले. म्हणजे तो निवडून येऊ नये. तिथून तो चुकून माकूनही निवडून येता कामा नये यासाठी शिेदे यांनी त्याला एका बाजूला तिकिट दिले आणि त्याच्या विरोधात एका राष्ट्रवादीच्या उमेदवारालाही उभे करून कॉंग्रेसच्या मतात स्वत:च फूट पाडली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराला सहज विजय मिळाला. त्यामुळे कोठे आणि शिंदे यांच्यातले मतभेद वाढत चालले आहेत. महेश कोठे यांना आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा गप्प बसू देत नाही. त्यांनी आता पक्षांतर केले असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला येणारी शहर मध्य ही जागा आता महेश कोठे लढवणार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत शहर उत्तर ही शेजारची जागा लढवून पराभव पत्करला होता. आता त्यांना शिवसेनेत जाण्याने शहर मध्य मतदारसंघात उभे राहून प्रणिती शिेदे यांना आव्हान द्यावे लागणार आहे. म्हणजे आता शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे (कॉंग्रेस), महेश कोठे (शिवसेना) आणि नरसय्या आडम (माकपा) यांच्यात कॉंटे की टक्कर होणार आहे. ही लढत फार लक्षणीय ठरणार आहे.

सोलापूर शहराच्या या दोन मतदारसंघात पद्मशाली आणि लिंगायत या दोन समाज घटकांचे मतदान फार निर्णायक ठरते. शहर मध्य मध्ये पद्मशाली समाजाचे महेश कोठे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहणार असून शहर उत्तरला लिंगायत समाजाचे विजयकुमार देशमुख हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत. या दोन जातींनी एकमेका साह्य केले तर महायुतीचे हे दोन उमेदवार विजयी होतील आणि शहर मध्य मध्ये प्रणिती शिंदे या पराभूत होतील. कॉंग्रेसला आधीच वातावरण चांगले नाही. त्यातच कॉंग्रेसला अतर्ंगत मतभेदांनी पोखरले आहे. त्याचा फटका बसल्या खेरीज राहणार नाही.

Leave a Comment