
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील मागासवर्गीय डॉक्टरने वरिष्ठांकडून वारंवार जातीवरून होणार्या हेटाळणीला कंटाळून आत्महत्या केली. किरण जाधव हे त्याचे नाव आणि तो कोल्हाटी समाजाचा होता. मात्र समाजातले मागासवर्गीय घटक पुढे येत आहेत आणि प्रगती करत आहेत. ही वस्तुस्थिती ज्यांना देखवत नाही, सहन होत नाही अशा काही हिणकस वृत्तीच्या डॉक्टरांनी त्याच्या लहान सहान चुकांवरून त्याला जातीचा उल्लेख करून टोमणे मारायला सुरूवात केली. ही वागणूक सहन न झाल्याने त्याने आपले आयुष्य संपवून टाकले. ही आत्महत्या तर चिंताजनक आहेच पण ती त्याला सातत्याने जातीवरून त्रास दिल्यामुळे निराश होऊन केली आहे ही बाब अधिक चिंताजनक आहे. या रुग्णालयातल्या दोघा डॉक्टरांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे आणि तिसर्या एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच रुग्णालयात अशाच कारणावरून एका डॉक्टरने आपले जीवन संपवले होते. त्याला त्याच्या वरिष्ठांकडून त्रास होत होता पण किरण याला तो खालच्या जातीचा असल्यामुळे त्रास होत होता.
उच्चवर्णीय मानसिकतेचा निषेध
डॉक्टर किरण जाधव याची आई तमाशात नर्तिका म्हणून काम करत होती. परंतु या समाजातून पुढे येऊन तो डॉक्टर झाला. हा कोल्हाटी समाज कसा जगतो याची कोणाला माहिती असेल तर या समाजातून पुढे येऊन डॉक्टर होणे हे किती अवघड आहे याची त्याला कल्पना येईल. ज्याचे आई-वडील नोकर्या करतात आणि भरपूर पैसा कमवून आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून मुलाला डॉक्टर करतात त्या समाजातल्या माजोरी लोकांना किरण जाधव सारख्या व्यथा-वेदना कधीच कळणार नाहीत आणि त्यांना अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर होणार्यांचे कौतुक सुद्धा वाटणार नाही. परंतु ज्यांना काही सामाजिक संवेदनशीलता असते त्यांना डॉक्टर किरण जाधव याच्या कष्टाची किंमत कळू शकते. मात्र अशी संवेदना गमावलेले लोक दलित समाजातून पुढे येऊन मोठे झालेल्यांची टिंगलच करत राहतात आणि अशा कार्यालयातून, रुग्णालयातून गरिबीची पार्श्वभूमी असणार्या लोकांची सतत हेटाळणी होत राहते. या समाजातून पुढे येऊन एखादा मुलगा डॉक्टर झाला आणि काम करताना काही चूक झाली की, त्याच्या आरक्षणावरून त्याला टोमणे मारले जातात आणि बर्याच कार्यालयांमध्ये हे वातावरण आहे. एखादा मुलगा चुकला की, हे लोक चुकाच करणार, कारण सरकारचे जावई आहेत अशी भावना तिथल्या काही आरक्षणविरोधी उच्चवर्णियांची असते.
त्यातून अशा मुलांची सतत टिंगल-टवाळी होत राहते. डॉक्टर किरण जाधव याचा असाच अनुभव होता. त्यामुळे त्याचा एवढा छळ झाला की, त्याला आत्महत्या करणे श्रेयस्कर वाटले. हे वातावरण केवळ दवाखान्यातच आहे असे नाही तर काही कार्यालयातून आणि कंपन्यांतून सुद्धा अशीच स्थिती दिसते. खेड्यामधून आलेला एखादा मुलगा शहरातून आलेल्या मुलांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून अधिकारी म्हणून काम करायला लागतो तेव्हा त्या शहरी मुलांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. कोणी तरी खेडवळ माणूस येऊन आपल्यासोबत काम करतो हेच त्यांना मुळात सहन होत नाही. मग त्याची भाषा, त्याचे काही उच्चार किंवा त्याची धार्मिक प्रवृत्ती याची सतत टिंगल होत राहते. एखाद्यावेळी छोट्या-मोठ्या फरकाबद्दल टोमणे मारणे साहजिक आहे, परंतु सातत्याने त्याच्या पार्श्वभूमीची अशी टिंगल व्हायला लागली आणि तो एकटा पडला की, त्याला ही नोकरी नकोशी होऊन जाते. खरे म्हणजे खेड्यातला एक मुलगा अधिकारी होतो याचे त्याच्या सोबत्यांना कौतुक वाटायला पाहिजे. कारण भारतात घडत असलेल्या सामाजिक परिवर्तनाचे ते द्योतक आहे. परंतु असे कौतुक वाटण्याऐवजी वैषम्य वाटणे हे मानसिक रोगाचे लक्षण आहे आणि देशातल्या परिवर्तन विरोधी उच्चवर्णीय मन:स्थितीच्या लोकांमध्ये हा रोग अजूनही अस्तित्वात आहे.
अमेरिकेमध्ये निग्रोंच्या संबंधात अशा गोष्टी होत असत. तिथले गोरे लोक निग्रोंना निग्गर म्हणून हिणवत असत. डॉक्टर किरण जाधव याच्यावर जी परिस्थिती ओढवली तशी ती अमेरिकेत पूर्वी होती. निग्रोंनी त्याच्या विरोधात मोठा लढा उभारला. आज निग्रो लोक गोर्यांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत आणि अमेरिकेतल्या गोर्या लोकांचीही मन:स्थिती आता बदलली आहे. एखाद्या निग्रोला त्याच्या काळ्या रंगावरून कोणी हिणवले तर त्या गोर्या लोकांनाच आवडत नाही. भारतात ही मन:स्थिती का निर्माण होत नाही, असा प्रश्न आहे. समाजातली डॉक्टर, इंजिनिअर अशी मानाची पदे मागासवर्गीयांना मिळताच कामा नयेत, ते त्या लायकीचेच नाहीत अशी भावना अजूनही मोठ्या वर्गात आहे. त्यातून असे प्रकार घडतात. पुण्याच्या एका आय.टी. कंपनीमध्ये नगर जिल्ह्यातला एक तरुण कामाला लागला होता. परंतु तो ग्रामीण भागातून आला असल्यामुळे त्याचे इतर शहरी सहकारी आणि तो यांच्यातला सांस्कृतिक फरक नेहमीच जाणवत असे. मात्र त्याला आपल्या संस्कृतीत सामावून घेण्याऐवजी त्याची सतत कुचेष्टा केली जायला लागली. त्यामुळे कंटाळून त्याने आत्महत्या केली. डॉ. किरण जाधव याचाही प्रकार असाच होता.
