सरकारी योजनांचे बारसे

modi
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी इंदिरा आवास योजना या योजनेचे बारसे नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतल्या नावातले इंदिरा हे नाव आता बाद केले जाईल आणि तिचे नाव आता ग्रामीण घरबांधणी योजना असे असेल. सत्ताधारी पक्ष बदलला की, तो विविध योजनांना आपल्या नेत्यांची नावे देतो पण याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांनी अगदी अतिशयोक्ती केली असून सरकारच्या बहुसंख्य योजनांना गांधी नेहरू परिवारातल्या नेत्यांची नावे दिली आहेत. अशी नावे देण्याला काही मर्यादा असायला हवी पण ती ओलांडली गेली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशात आपल्या हातात सत्ता येताच असा प्रकार केला होता. त्यांनी आपले स्वत:चे आणि कांशीराम यांचे पुतळे करून घेतले होते आणि त्यावर सरकारचे करोडो रुपये खर्च केले होते. त्यावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली पण कॉंग्रेसचे नेते एवढ्या सरकारी योजनांना गरज नसताना गांधी आणि नेहरू यांची नावे देत असतील तर त्यांना मायावती यांच्यावर टीका करण्याचा काय अधिकार?

केन्द्र सरकारने आता इंदिरा गांधी यांचे नाव घरकुल योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव आता ग्रामीण गृह निर्माण योजना असे करण्यात येणार आहे. येत्या आठ वर्षात देशातल्या प्रत्येक कुटुंबाचे स्वत:च्या मालकीचे पक्के घर असेल असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यापूर्वीच्या सरकारने या योजनेसाठी दारिद्य्र रेषेखालच्या कुटुंबांना ७५ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते पण आता मोदी सरकारने हे अनुदान १.५० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. या घरकुलासाठीपूर्वी १५ चौरस मीटर जागा दिली जात होती पण आता ही जागा ३० चौरस मीटर करण्यात आली आहे. तिच्यात त्या कुटुंबाचे स्वत:चे स्वच्छता गृह असेल आणि न्हाणी स्वतंत्र असेल. या दोन सोयी पूर्वीच्या योजनेत नव्हत्या. या बदलात नावातला बदल मोठा महत्त्वाचा तर आहेच पण तो गेल्या काही दिवसांत वादाचा विषय झालेला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांंनी गांधी आणि नेहरू या दोन घराण्यातल्या सर्वांच्याच नावांचा एवढा गवगवा केला आहे की, ते जमेल त्या योजनेला या घराण्यातल्या कोणाचे तरी नाव देत राहतात. आपल्याला सगळ्याच गोष्टींची कल्पना येत नाही कारण सरकारच्या कित्येक योजना आपल्याला माहीतही नसतात. अनेक योजना कागदावर राहतात म्हणून त्यांची माहिती आपल्याला होत नाही. पण ज्यांची माहिती होते त्यांच्या नावांचा आढावा घेतला तर त्यातल्या अनेकांना इंदिरा, राजीव, नेहरू यांची नावे दिलेली आढळतात.

गावागावात तर ज्या ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता असते त्या ठिकाणी बागा, रस्ते, चौक आणि बाजार संकुले यांना यातल्या कोणाचे तरी नाव दिल्याशिवाय त्यांना रहावत नाही. एकदा एक परदेशी माणूस भारतातल्या एका गावात फिरत होता. त्याला एका महाविद्यालयाचा पत्ता शोधायचा होता. त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मुलाला तो पत्ता विचारला. त्या महाविद्यालयाचे नाव इंदिरा गांधी महाविद्यालय होते. तेव्हा त्या मुलाने पत्ता सांगितला. या स्त्याने म्हणजे महात्मा गांधी रोडने सरळ जा. तिथे तुम्हाला राजीव गांधी चौक लागेल. त्या चौकातून सरळ पुढे गेल्यास तिथे संजय गांधी मार्केट लागेल. डावीकडे वळलात की तुम्हाला सोनिया गांधी शासकीय रुग्णालय लागेल. त्याच्याजवळ प्रियंका ब्यूटी पार्लर लागेल. तिथून सरळ जा मग राहूल गांधी उद्यान आहे. त्याच्या जवळ हे इंदिरा महाविद्यालय आहे. पत्ता विचारणारा हैराण झाला. एवढी नावे देत बसण्यापेक्षा या देशातल्या लोकांनी देशाचे नावच बदलून गांधी कंट्री असे करून टाकावे असे तो म्हणाला. तसे या लोकांंनी पक्षाला इंदिरा गांधी कॉंग्रेस नाव दिले होत. अर्जुनसिंग आणि एन.डी. तिवारी यांनी सोनिया कॉंग्रेस काढली होती. कॉंग्रेसच्या आत राहूल ब्रिगेड आहेच.

आणीबाणीच्या काळात डी. के. बारुआ हे कॉंग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा, असे जाहीर केलेच होते. आताही सलमान खुर्शीद आणि शिवराज पाटील यांनी सोनिया गांधींना देशाच्या मातोश्री करून टाकलेच आहे. एक दिवस हे लोक देशाचे नाव बदलायला कमी करणार नाहीत. केन्द्र सरकारच्या शेकडो योजना आहेत. त्यातल्या सुमारे ६०० योजनांना राजीव, इंदिरा किंवा नेहरू अशी नावे आहेत. एखाद्या नेत्याचा सन्मान करावा असे कोणाला वाटू शकते. त्याच्या सन्मानार्थ एखाद्या योजनेला त्याचे नाव दिले तर ते साहजिक मानता येईल पण ऊठसुट सगळ्याच योजनांना या घराण्यातल्या कोणाचे तरी नाव देण्याच्या वृत्तीतून सन्मान नाही तर लाचारी स्पष्ट होते. सारा देश हेच घराणे चालवते की काय असा प्रश्‍न पडतो. एवढीही लाचारी चांगली नाही. गांधी आणि नेहरू यांच्या नावाची विद्यापीठे आहेत. एखाद्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायचे तर किती गोंधळ घातला जातो. सावित्रीबाई फुले यांच्या नावाला हरकती येतात पण इंदिरा आणि नेहरू विद्यापीठांना कोणाची हरकत आली तरी ती मानली जात नाही. या नावांतून या देशात जे काही चांगले झाले आहे ते या दोन घराण्यांमुळेच झाले आहे असे भासवण्याचा प्रयत्न होत असतो. हा इतिहासाचा विपर्यासही आहे.

Leave a Comment