फादरविरूद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार करणारी विद्यार्थिनी बेपत्ता

kidnapped
पुणे – सुमारे दीड वर्षांपूर्वी डॉन बास्को स्कूलच्या फादरविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार करणारी 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली असून संबंधित मुलगी 7 दिवसापासून गायब आहे आणि तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोर्टात संबंधित फादरविरोधात खटला सुरू असताना ही मुलगी गायब होण्यामागे काही कट तर नाही याची शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी येरवडा पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

जानेवारी 2013 मध्ये या विद्यार्थिनीने डॉन बास्को स्कूलचे फादर इज्यू फलकाऊ यांनी त्यांच्या कार्यालयात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर फादर ज्यू यांना अटक करण्यात आली होती. पण न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. सध्या हा खटला न्यायालयात सुरु असताना संबंधित विद्यार्थिनी 3 ऑगस्टपासून घरातून गायब झाली आहे. या मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात येत आहे. मात्र ती अद्याप न सापडल्याने अखेर तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

येरवडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, मुलीच्या आई-वडिलांनी काहींवर संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार चौकशी सुरु केली आहे. मुलीचे अपहरण झाल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर संशयित आरोपींच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. दरम्यान, या घटनेमागे फादर किंवा स्कूलच्या हितसंबंधांचा हात तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Leave a Comment